आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळंदीमध्ये रंगणार माउलीच्या संजीवन समाधीचा सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा सोहळा (कार्तिकी यात्रा) यंदा ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान आळंदी येथे रंगणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी श्रींची दिंडी पंढरपूर येथून २९ नोव्हेंबरला श्रीक्षेत्र आळंदी येथे दाखल होणार आहे. कार्तिकी यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून आळंदी संस्थान समिती, प्रशासनातर्फे भाविकांच्या दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्तिकी यात्रेनिमित्त परंपरेनुसार आळंदी येथे नित्योपचार, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून भाविकांसाठी कीर्तन, हरिकथा, गजर, नामस्मरण, पारायणाचे उपक्रमही होणार आहेत, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांनी दिली.    

 

- रोज पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान - पवमान अभिषेक, दुधारती   
- पहाटे ५.३० ते ११.३० वाजेदरम्यान - भाविकांच्या महापूजा  
- दुपारी १२.३० वाजता- महानैवेद्य   
- दुपारी ४ ते ८ वाजेदरम्यान- वीणामंडपात कीर्तन   
- रात्री ८ वाजेनंतर धूपारती   
- रात्रीपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत जागर   
- ३ डिसेंबरला दुपारी एक वाजता श्रींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून प्रस्थान ठेवणार आहे   
- ४ डिसेंबरला पालखीचा रथोत्सव आयोजित केला आहे.  
- ५ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळा 
कीर्तन होईल.
- ७ डिसेंबरला श्रींची नगरप्रदक्षिणा आणि छबीना मिरवणूक

 

सुमारे ५ लाख भाविक अलंकापुरीत एकवटले

कार्तिक वद्य अष्टमी ते अमावास्या या काळात आळंदीत होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा सोहळ्याचे ७२३ वे वर्ष आहे. यासाठी सुमारे ५ लाख भाविक अलंकापुरीत एकवटले आहेत. राज्यभरातून अनेक संतांच्या पालख्या माउलींना भेटण्यासाठी आळंदीत दाखल होत आहेत.  
- अॅड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान

बातम्या आणखी आहेत...