आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीची शिस्त लागू दे गणेशा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिपरिचयात् अवज्ञा' असे म्हणतात, पण अतिपरिचयानेही अवज्ञा न होणारी गणपती ही एकमेव देवता आहे. गणेशाइतका कौटुंबिक जिव्हाळा, आपुलकी क्वचितच कोणा देवादिकाच्या वाट्याला येत असेल. दहा दिवस मुक्कामी राहिल्यानंतर गुरुवारी गणेशाला पापण्यांवर पाऊस पेरून निरोप देण्यात आला. अर्थात, पुढील वर्षी लवकर येण्याचे आश्वासन घेऊन...जाताना गणेशाच्या कानात मन की बात' करायची असते. म्हणजे आपली इच्छा सांगायची असते. मग गणेशा या इच्छांची पूर्ती' करतो म्हणे! पण केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढीव दंडाच्या तरतुदींची पूर्ती' काही होताना दिसत नाही. दरवर्षी अपघातात लाखो लोक मृत्युमुखी पडतात. लोक वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत, हेल्मेट घालीत नाहीत, सिग्नल तोडणे तर नित्याचेच झाले आहे, स्टाॅपलाइन सोडून उभे राहणेही नवीन नाही. लोकांना काही धाकच राहिलेला नाही. याला कारण दंडाची रक्कम खूपच कमी आहे. म्हणून आमच्या नितीनभाऊंनी दंड एकदम दुप्पट-तिप्पट करून टाकला. निदान यामुळे तरी लोकांना वाहतुकीची शिस्त लागेल असा त्यांचा कयास होता. पण झाले उलटेच. यावरून सध्या देशात गदारोळ सुरू आहे. अनेक राज्यांनी नवीन वाढीव दंड आकारणीस चक्क नकार दिला आहे. बरे, ममतादीदींनी नाही म्हटले तर एकदाचे समजू शकते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातनेही दंडाची रक्कम अर्धी केली. मग महाराष्ट्र मागे कसे बरे राहील. लागलीच दिवाकर रावते यांनी महाराष्ट्रात स्थगिती देऊन टाकली. दंडाची वाढीव रक्कम आणि शिक्षा याचा फेरविचार करावा, असे पत्र दिवाकर रावतेजी यांनी लिहिले. शिवसेनेच्या या बाणाने (पक्षी बाण्याने) नितीनभाऊ पहिले घायाळ आणि नंतर एकदम उद्विग्न झाले. तुम्हाला जीवांचे मोल नाही काय?' असा प्रश्न गडकरींनी विचारला. खरे म्हणजे हे काय भलतेच खूळ नितीन गडकरी घेऊन बसले हे कळायला मार्ग नाही. वाढीव दंड आकारणीबद्दल जनतेत प्रचंड रोष आहे. त्याची अंमलबजावणी केली तर सत्तेचा मार्ग सुकर होत नाही आणि सत्तेबाहेर राहण्याची सवय तर सोडाच, कल्पनाही राजकारण्यांना सहन होत नाही. त्यामुळे सत्तेच्या मार्गातील खड्डे बुजवण्याला प्राधान्य असते. वाढीव दंड आकारणी हा तर मोठा खड्डा! त्यात सत्तेला अपघात होण्याची शक्यताही मोठी. म्हणून त्यास स्थगिती देण्यात आली. नियम हे तोडण्यासाठीच असतात. राजकारण्यांनीच हे दाखवून दिलेले असते. यथा राजा तथा प्रजा' असे म्हणतात. राहिला प्रश्न नियमांचे पालन करण्याचा, तर प्रत्येकाने ते केलेच पाहिजे. वाहतुकीची शिस्त लागावी याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी वाढीव दंड हा एकमेव उपाय खचितच नाही. या देशाला वाहतुकीची शिस्त लागू दे गणेशा... हेच आम्ही निरोप देताना गणेशाच्या कानात सांगितले. गणेशा त्याची पूर्ती करील हे नक्की!