आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसंमेलन सदा घडो!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'हवा,पाणी आणि तुळजाभवानी 'अशी ओळख असलेल्या उस्मानाबादेत यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे या ९३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. साहित्य महामंडळाने गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या नव्या अध्यक्ष निवड पद्धतीने निवडलेले दिब्रिटो हे दुसरे अध्यक्ष. अलीकडच्या काळात मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे. यंदाचे अधिवेशन यास अपवाद ठरते आहे, असे वाटत असतानाच दिब्रिटो यांच्या भागातून अनेक पाद्री संमेलनास येणे, संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांना संमेलनस्थळी जाऊ नका, अशा धमक्या येणे, सावरकरांच्या संदर्भातील ठरावावरून राजकीय पक्ष व हिंदुत्ववादी संघटना आमनेसामने येणे, असे काही वादग्रस्त प्रसंग समोर आले. पण, संमेलनातील वादाचा इतिहास लक्षात घेता हे तसे किरकोळच. या वादाचं खरं मूळ आहे, ते सुसंवादाच्या अभावात. आक्षेप घेणारे व ज्यांच्यांवर तो घेतला त्यांच्यात योग्य संवाद झाला असता, तर हे निश्चितच टळले असते. संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांनीही अध्यक्षीय भाषणात सुसंवादावर भर दिला. 'बंदुवर्ग ऐसे मानोमी मनी,' असा दाखला देत दिब्रिटो यांनी एकविसाव्या शतकात सर्व धर्मांशी सुसंवाद राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या छापील भाषणात मराठीच्या चिंतनाबरोबरच अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत, तसेच पर्यावरणाच्या संवर्धनापर्यंत अनेक बाबींवर परखड भाष्य केले आहे. आपल्या मुलाला अगदी ९५ टक्केच गुण मिळाले पाहिजेत, अशी आग्रही मानसिकता असणाऱ्या पालकांनाही दिब्रिटो यांनी दटावले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील त्यांचे भाष्य अत्यंत मौलिक आहे. संविधानासारखे धन आपल्याकडे असताना आपण त्याची वैचारिक उधळपट्टी कशी चालवली आहे, याकडे अंगुलीनिर्देश करत त्यांनी सरकारचे कान पिळले आहेत. गाय जगली तसा माणूस जगला पाहिजे, हे सांगत असताना, आपण माणूसपण कसे विसरत चाललो आहोत, हे त्यांनी उदाहरणांसह दाखवून दिले आहे. देशभरात झालेल्या २०८ पत्रकारांच्या हत्या, कलबुर्गी, दाभोलकर या विचारवंतांच्या हत्यांचा निषेध करतानाच त्यांनी सुसंवादाचे महत्त्वही विषद केले. कुराण, बायबल, मराठी मातीतील संत, मराठी कवी, पाश्चिमात्य दार्शनिकांचे विचार यांचा समर्पक वापर करत दिब्रिटो यांनी वाद उकरून काढणाऱ्यांना भाषणातून एक प्रकारे उत्तरच दिले आहे. धर्मसंवादातून आलेल्या माणूसपणाकडे लक्ष वेधत दिब्रिटोंनी मानवधर्माचे महत्वच अधोरेखित केले आहे. मात्र, हे करत असताना सुसंवादी भाषेच्या वापरावर त्यांनी दिलेला भर अत्यंत महत्वाचा आणि तितकाच आश्वासक व दिलासा देणारा आहे. कारण देशातील सध्याच्या परिस्थितीत अशाच सुसंवादी भाषेची गरज आहे. वादविरहित सामाजिक- सांस्कृतिक व्यवहारासाठीही हा सुसंवाद अधिक महत्त्वाचा, आशादायी वाटतो. अशा प्रकारच्या संवाद प्रक्रियेतूनच साहित्य संमेलनातील वादही टाळले जातील. त्यामुळे उस्मानाबादमधील उत्सवात उत्साहाने सहभागी झालेल्या आणि दूरवरून हा सोहळा पाहणाऱ्या तमाम मराठी भाषाप्रेमींच्या मनात अशी 'सुसंमेलने सदा घडो,' ही भावना निर्माण झाली तरी पुरेसे आहे.  

बातम्या आणखी आहेत...