IT Department / बेहिशेबी मालमत्ता: मायावतींच्या भावाचे नोएडातील 400 कोटी रुपयांचे प्लॉट आयकर विभागाकडून जप्त

एकेकाळी नोएडा प्राधिकरणात क्लार्क होते मायावतींचे भाऊ आनंद

दिव्य मराठी वेब

Jul 18,2019 03:40:00 PM IST

नोएडा - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कारवाई करताना आयकर विभागाने गुरुवार नोएडातील 7 एकरचा एक प्लॉट जप्त केला आहे. या प्लॉटची बाजारातील किंमत 400 कोटी रुपयांच्या घरात आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, या प्लॉटचे मालक बसप अर्थात बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींचे भाऊ आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नी विचित्र लता आहेत. काही दिवसांपूर्वीच मायावतींनी बसपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आनंद कुमार यांची नियुक्ती केली. नियमानुसार, बेनामी मालमत्ता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी सापडल्यास 7 वर्षांपर्यंतची कैद आणि संबंधित मालमत्तेच्या बाजारभावाची 24 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली जाते.


आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी बेनामी बेहिशेबी मालमत्ताविरोधी समितीने हे प्लॉट जप्त करण्याचे आदेश दिले होते. आनंद कुमार यांनी ही संपत्ती कथितरित्या बेकायदेशीररित्या एका जवळच्या व्यक्तीच्या नावे खरेदी केली होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका तपासात याचे ठोस पुरावे सापडले होते. आनंद कुमार यांना यापूर्वी देखील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती.


क्लार्क ते कोट्यधीश
मायावतींचे भाऊ आनंद कुमार नोएडा प्राधिकरणात एक क्लार्क म्हणून कार्यरत होते. उत्तर प्रदेशात बसपची सत्ता आणि मायावतींना मुख्यमंत्री पद मिळाले. तेव्हापासूनच आनंद कुमार यांची मालमत्ता झपाट्याने वाढली. बनावट कंपन्या बनवून त्यांच्या नावे कर्ज उचलण्याचे देखील आनंद यांच्यावर आरोप लागले होते. 2007 मध्ये मायावतींची सत्ता आल्यानंतर आनंद यांनी एकानंतर एक 49 कंपन्या उघडल्या होत्या.

X
COMMENT