आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाणीची चित्रफीत देण्यास महापौरांचा नकार; विषय गंभीर, वादग्रस्त असल्याने ठराव देण्यास मनाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध केल्याने एमआयएम नगरसेवकाला १७ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्याचे पद रद्द करण्याचा ठराव घेऊन शासनाला प्रस्ताव पाठवला. सभागृहातील चित्रीकरण, प्रशासनाने नेमका काय ठराव घेतला याची माहिती काही नगरसेवक आणि नागरिकांनी मागितली. मात्र हा विषय गंभीर असून वादग्रस्त आहे. माझी खात्री झाल्याशिवाय सभेचा कोणताही दस्तऐवज कोणालाही देऊ नका, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी नगर सचिवांना दिले आहेत. 


मनपाने समांतर जलवाहिनीच्या कामाचे भवितव्य ठरवण्यासाठी शुक्रवारी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्यात सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव आला. यास एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध करताच भाजपच्या पाच नगरसेवकांनी त्यांना बेदम मारहाण केली. आता काही नगरसेवक आणि नागरिकांकडून नगर सचिव व महापौरांकडे सभागृहातील कामकाजाची माहिती देण्याची मागणी होत आहे. मात्र घोडेले यांनी नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांना कोणताही दस्तऐवज माझ्या पूर्वपरवानगी शिवाय देऊ नये, असे आदेश मंगळवारी दिले. 


महापौरांना अधिकार 
सभागृहाचे प्रमुख म्हणून महापौरांना काही विशेष अधिकार आहेत. या बैठकीत आयुक्त प्रशासनाचे प्रमुख असले तरी सदस्य म्हणूनच उपस्थित राहतात. त्यामुळे सभागृहातील कामकाजाचे कोणते दस्तऐवज कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार महापौरांना आहे. त्यांच्या परवानगीशिवाय ते कोणालाही मिळत नाही. 


महापौरांच्या परवानगीने नगर सचिवांना अधिकार 
महापौरांना सर्वस्वी अधिकार असले तरी सभेचे कामकाज चालवण्याचे काम नगर सचिव करतात. त्यामुळे नगर सचिव कार्यालयातूनच सभागृहातील कामकाजाचे दस्तऐवज वितरित करण्यात येतात. मात्र, महापौरांच्या परवानगीने नगर सचिवांना दस्तऐवज, ठराव, कारणपूर्ती अहवाल देता येतो. 


न्यायालयाची भीती...
कुणीही या दस्तऐवजाची माहिती मागत असून यातून पुरावा घेऊन न्यायालयात जाण्याची भीती आहे. त्यामुळे या सभेची माहिती देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोणत्या वेळी काय झाले याची सर्व माहिती महापौर स्वत: घेत आहेत. त्यानंतरच ती माहिती इतरांना मिळणार आहे. 


मी सर्व चित्रीकरण पाहणार 
हा विषय गंभीर आहे. त्यामुळे अगोदर मी स्वत: सर्व चित्रीकरण पाहणार आहे. त्यानंतरच ते इतरांना देण्याचा निर्णय घेण्यात येईल. 
- नंदकुमार घोडेले, महापौर 

बातम्या आणखी आहेत...