आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑनलाइन बाई’ला त्रास ‘ऑफलाइन’सारखाच

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मयूर देवकर

महिलांसाठी ऑनलाइन वावर ‘ऑफलाइन’ जगासारखाच कठीण होत चालला आहे. त्यांच्याकरिता सुरक्षित ऑनलाइन एक्स्पीरिअन्स निर्माण केला पाहिजे. सध्या त्यांना कोणकोणत्या प्रकारे ऑनलाइन हिंसेला सामोरं जावं लागतं, यावर दृष्टिक्षेप...
 


ऑनलाइन हिंसा हा एक गंभीर, परंतु तितक्याच गांभीर्याने  न पाहिला जाणारा प्रकार आहे. विशेष करून महिलांसाठी ऑनलाइन वावर आता ‘ऑफलाइन’ जगासारखाच कठीण होत चालला आहे. ट्रोलिंग आणि शेरेबाजी सहन करणं तर महिलांच्या दैनंदिन जगण्याचा जणूकाही भागच बनला आहे. पण तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळं कंटकांना आता महिलांच्या खासगी आयुष्यातही प्रवेश मिळत आहे. 
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुलीसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं. इतकं की, त्यांच्या मुलीने तो फोटो डिलीट करण्याची त्यांना विनंती केली. ‘अ‍ॅम्नेस्टी’च्या रिपोर्टनुसार, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ९५ टक्के महिला उमेदवारांना ट्विटरवर  शिवीगाळ आणि तिरस्कारयुक्त मेसेजेस, कमेंट्स आणि शेरेबाजी सहन करावी लागली.
त्यामुळे महिलांसाठी सुरक्षित ऑनलाइन एक्स्पीरिअन्स निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी महिलांना कोणकोणत्या प्रकारे ऑनलाइन हिंसेला सामोरं जावं लागतं हे समजून घेऊया.

१. डॉक्सिंग : सोशल मीडिया किंवा ईमेल अकाउंटवरून महिलांची खासगी माहिती जसे – पत्ता, संपूर्ण नाव, मुलांची माहिती, आर्थिक तपशील – अशी माहिती मिळवून ती सार्वजनिक केली जाते. तिचा गैरवापर होण्याचा धोका असतो. डॉक्युमेंट या शब्दावरून डॉक्सिंग हा शब्द आला आहे. महिलांची अशी खासगी माहिती चोरून त्यांच्या नावे खोट्या प्रोफाइल तयार करून त्यांची बदनामी केली जाण्याची शक्यता असते.२.  स्टॉकिंग : महिलांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिवसरात्र पाळत ठेवली जाते. म्हणजे प्रत्येक हालचालीवर स्टॉकर्सची नजर असते, काय पोस्ट केले, काय स्टोरी-स्टेटस ठेवले, कुठे कुठे मेन्शन आहे, काय कमेंट केले, कोण मित्र आहेत अशी बारीक नजर ठेवली जाते. हा प्रकार तसाच आहे जसे खऱ्या आयुष्यात कोणी कायम नजर ठेवणं, किंवा पाठलाग करणं. फोटोंवर कमेंट करणं, प्रायव्हेट मेसेज करून करून  त्रास देण्याचे प्रकार स्टॉकिंगमध्ये मोडतात. 
हैदराबाद येथील सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर  पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं होतं की, महिलांचे स्टेटस वारंवार पाहणाऱ्यांवर विनयभंगाच्या ३५४ कलमांनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. ३. ग्रुमिंग : फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यासह आता टिक-टॉकचे वेड प्रचंड आहे. खासकरून तरुणांमध्ये या व्हिडिअो प्लॅटफॉर्मविषयी आकर्षण जास्त आहे. दुसऱ्यांच्या मतांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व  देणाऱ्या या पिढीला व्हॅलिडेशनची गरज भासते. आणि त्याचाच फायदा काही लोक घेतात. युनेस्कोच्या रिपोर्टनुसार, १८ ते २४ वयोगटातील महिला सर्वाधिक ऑनलाइन हिंसेला बळी पडतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान वयातील मुलींचा विश्वास संपादन करून त्यांना वाममार्गाला लावणं, त्यांच्याकडून चुकीच्या गोष्टी करून घेतल्या जातात. या प्रकाराला ग्रुमिंग म्हटलं जातं. शाळकरी/कॉलेजवयीन मुलींशी चॅटिंगद्वारे जवळीक वाढवून खासगी क्षणांतील फोटो आणि व्हिडिअो पाठवण्यास राजी केलं जातं. त्यामुळे मुलींनी अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे.

४. सायबर एक्स्प्लॉयटेशन : मॉल, कपड्याच्या दुकानातील  चेंजिंग रूम्स आणि सार्वजनिक  स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे लावून महिलांचे व्हिडिअो रेकॉर्ड करण्याचा विकृतपणादेखील केला जातो. अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत. 


खासकरून महिलांना याद्वारे टार्गेट केले जाते. सायबर एक्स्प्लॉयटेशनच्या पीडितांपैकी  ९५ टक्के महिलाच असतात. सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने सायबर पोर्टेलही सुरू केले आहे.  याच ठिकाणीही आपण आपल्या बाबतीत झालेल्या गुन्ह्यासंदर्भात तक्रार नोंदवू शकतो.   

संपर्क - ९०४९०४३४८७


(लेखक Fact Crescendo वेबसाइटसाठी फॅक्ट चेकर/रिसर्चर म्हणून काम करतात)

बातम्या आणखी आहेत...