आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेक न्यूज का जमाना है...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मयूर देवकर

सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या सर्रास शेअर केल्या जातात. सामान्य वाचक आणि युजर अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून बळी पडतात. खरी बातमी कोणती? खोटी बातमी कोणती? हे कसं ओळखायचं?
राहुल गांधी यांचा “इधर से आलू डालो, उधर से सोना निकलो’ हा व्हिडियो आठवतो? तो पाहून किती जणांना राहुल गांधी खरंच अशी मशीन आणणार असं सांगत आहेत असं वाटलं? किंवा अब्दुल कलाम यांचा बालपणी सायकलवर पेपर टाकतानाचा कथित फोटो आपल्यापैकी कोणी कोणी शेयर केला? एवढंच कशाला, पॅरासिटेमॉल गोळ्यांमध्ये ‘माचुपो’ नावाचा अत्यंत धोकादायक विषाणू असल्याचाही मेसेजवर विश्वास ठेवला आणि फॉरवर्डही केला? याचे उत्तर “हो’ असेल तर तुम्ही “फेक न्यूज’ला बळी पडला असं समजा.

व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या/फोटो/व्हिडियो सर्रास शेअर केले जातात. सामान्य वाचक आणि युजर अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून बळी पडतात. तसेच फॉरवर्ड करून फेक न्यूज आणखी पसरविण्यात हातभारही लावतात. एका दृष्टीने ही आपली  फसवणूकच आहे. मग अशी फसवणूक होऊ नये म्हणून कसं सावधान राहिलं पाहिजे? खरी बातमी कोणती?  खोटी बातमी कोणती? हे कसं ओळखायचं? सजग नागरिक म्हणून मी “फेक न्यूज’ला आळा घालण्यासाठी काय करू शकतो याचे उत्तर या लेखात मिळेल. चला तर मग जाणून घेऊया...

“फेक न्यूज’ म्हणजे काय?

खोटी बातमी म्हणजे “फेक न्यूज’. अशी बातमी किंवा माहिती जिचा कोणताही विश्वासार्ह स्रोत नाही, जिच्यामध्ये तथ्य नाही किंवा जी धादांत खोटी आहे. त्या बातमी/माहितीला फेक न्यूज म्हणतात.“फेक न्यूज’चे प्रकार

“फेक न्यूज’चे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक आहे मिसइन्फॉर्मेशन (Misinformation) आणि दुसरा आहे डिसइन्फॉर्मेशन 

(Disinformation). मिसइन्फॉर्मेशन म्हणजे चुकीने किंवा अनावधानाने खोटी बातमी तयार करणं किंवा पसरवणं. यामध्ये फसवण्याचा हेतू नसतो. उदाहरणार्थ, अब्दुल कलाम यांच्या बालपणीचा फोटो. 
मात्र, डिसइन्फॉर्मेशनमध्ये मुद्दामहून खोट्या बातम्या तयार केल्या जातात. एखादी व्यक्ती/समुदाय/पक्षाविषयी मत दुषित किंवा गैरसमज पसरवण्यासाठी फेक न्यूज पेरल्या जातात. उदाहरणार्थ, राहुल गांधी यांचा “आलू डालो, सोना निकालो’ हा व्हिडियो किंवा जेएनयूमधील विद्यार्थ्यांचे म्हणून आक्षेपार्ह फोटो.

“फेक न्यूज’ची लक्षणं

फेक न्यूजची काही ठळक लक्षणं असतात. ती अशी-


१) 5W अँड 1H नसणे... बातमीत एखादी घटना कुठं झाली, त्यामध्ये कोण सहभागी होतं, ती कधी झाली, तिचे कारण काय, नेमकं काय आणि कसं झालं ही सर्व माहिती देणं अपेक्षित असतं. खोट्या बातमीत यापैकी काहींची उत्तरे दिलेली नसतात. म्हणजे घटनेचं ठिकाण तरी लपवलं जाईल किंवा वेळ तरी चुकवला जाईल जेणे करून उलट तपासणी करता येणार नाही.


२) लिखाणातील दोष - फेक न्यूजमध्ये बहुतांश वेळा भाषेच्या सोप्या-सोप्या चुका असतात. नावांचे चुकीचे स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका असतात.


३) आकर्षक शीर्षक - युजर्सला आपल्याकडं खेचण्यासाठी रंजक, भडक आणि सनसनाटी मथळे दिले जातात. अनेकदा तर मथळ्याचा आणि बातमीचा काही संबंध नसतो. केवळ वाचकांनी लिंकवर क्लिक करण्यासाठी असं क्लिक-बेट शीर्षक दिलेलं असतं. ४) फोटो/व्हिडियोची क्वालिटी - फेक फोटोची क्वालिटी ओरिजनलपेक्षा खूप कमी असते. तीच गोष्ट व्हिडियोलासुद्धा लागू पडते.  मोठ्या व्हिडियोतून काही सेकंदाची क्लिप फिरवली जाते. ६) भावना भडकावणे - फेक न्यूज वाचून भीती, राग, चीड उत्पन्न होते. शिवाय त्यात अत्यंत भावनिक आवाहन, दुसऱ्या विचारधारेचा तिरस्कार असतो. त्यामुळं अशा मेसेजवर शांतपणे विचार करावा.

“फेक न्यूज’ची पडताळणी

तुमच्याकडे असणारा फोटो/व्हिडियो किंवा मेसेज खरा आहे की खोटा हे तपासण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारा की, या माहितीचा सोर्स काय, ही माहिती कोणी दिली, देणाऱ्याची पात्रता काय, ही माहिती मला चुकीचा संदेश तर देत नाही ना?सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी (CAA) देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर हिंसक व्हिडियो पसरत आहेत. यापैकी कित्येक तर जुने आणि काही तर आपल्या देशातीलसुद्धा नाहीत. त्यामुळे विश्वास ठेवण्यापूर्वी व्हिडियो ज्या शहरातील सांगितला जात आहे, त्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधा. कारण तशी घटना घडली असेल तर नामांकित वृत्तपत्र नक्कीच बातमी देणार. जर काही सापडली नाही तर विश्वास ठेवू नका.उदाहरणार्थ : जर मेसेज आला की, पुण्यात आंदोलनकर्त्यांनी दंगल केली. याची सत्यता तपासण्यासाठी आधी गुगलवर याविषयी शोध घ्या. बघा की, एखाद्या क्रेडिबल वेबसाईटने याची बातमी दिली आहे का? तुम्ही माहिती कुठे वाचता हे खूप महत्त्वाचे आहे. इंटरनेटवर प्रत्येक वेबसाईट विश्वासार्ह नसते. त्यामुळे बातमीचा सोर्स कोण आहे त्याकडे लक्ष द्या. अनेक फॅक्ट-चेकिंग वेबसाईट्स आहेत. त्यांना भेट देऊन तुम्ही खरी माहिती जाणून घेऊ शकता. किंवा फॅक्ट चेकर्सना मेसेज पाठवून त्याची सत्यता जाणून घेऊ शकता.क्विक टिप्स 

> आलेला प्रत्येक मेसेज पुढे पाठवण्याची घाई करू नये
> एखाद्या व्यक्तीची बदनामी करणारा मजकूर, एकांगी व हिंसक माहिती, आपत्तीजनक भाषा असेल तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका.
> स्वतः खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका.

संपर्क - 9049043487
(लेखक Fact Crescendo वेबसाईटसाठी फॅक्ट चेकर म्हणून काम करतात)

बातम्या आणखी आहेत...