आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या 'शिरोज’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मयूर डुमणे

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यामुळे देशभर असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली पोलिस एका तरुणाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या वेळेस त्या तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसांशी दोन हात करणारी महिला या आंदोलनाचा चेहरा ठरली. 


सार्वजनिक कार्यक्रमात महिलांचा सहभाग कायमच कमी राहिला आहे. आजही सार्वजनिक कार्यक्रमात महिलांचे प्रमाण पाहिजे तितक्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. समाजातील असुरक्षित वातावरणामुळे तर महिलांवर अनेक बंधनं येतात. मात्र आता नवीन पिढी ही बंधनं तोडून पुढे येत आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मोर्चा, आंदोलनात पुरुषच आघाडीवर असताना दिसतात, मात्र आता महिलादेखील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत. याचा प्रत्यय नुकताच आला. 

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यामुळे देशभर असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली पोलिस एका तरुणाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या वेळेस त्या तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसांशी दोन हात करणारी महिला या आंदोलनाचा चेहरा ठरली. पोलिसांना आक्रमकपणे बोट दाखवत असल्याचा तिचा फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानिमित्ताने पोलिसांचा  अत्याचारी चेहरा तर समोर आलाच, पण अत्याचारविरुद्ध धाडसाने उभा राहणारा, भारताच्या बंडखोर महिलेच प्रतिनिधित्व करणारा चेहरादेखील समोर आला. आयेशा रिना हे त्या तरुणीचे  नाव. आयेशासोबत लदीदा फरजानाही पोलिसांविरुद्ध लढत होती. २२ वर्षीय आयेशा रिना इतिहासाची विद्यार्थिनी आहे, तर लदीदा बीए अरेबिकची विद्यार्थिनी आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर सुरुवातीला फक्त जामिया मिलिया विद्यापीठातील चार विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी होत्या. रिना आणि लदीदाने पुढाकार घेतला आणि होस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. आंदोलनाचे नेतृत्व करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. रिनाचे वडील रशीद म्हणतात, माझ्या मुलीने आंदोलनात पुढाकार घेतला म्हणून पोलिसांनी तिला लक्ष्य केले. पण माझी मुलगी घाबरली नाही. अन्यायाविरुद्ध ती लढत आहे.

एका मुलाखतीत या दोन मुली म्हणतात की, आम्ही सरकारला घाबरत नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. रिना म्हणते, काश्मीरविषयी असंच घडलं. आम्ही शांत राहिलो. बाबरी मशीद प्रकरणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. आम्हाला खात्री आहे की ते पुढील वेळेस संपूर्ण भारताला लक्ष्य करतील.

या दोघी धाडशी विद्यार्थिनी केरळ राज्याच्या रहिवासी आहेत. या आंदोलनासाठी पुढाकार घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबांनीदेखील त्यांना साथ दिली. दोघीही विवाहित असून त्यांचे पतीदेखील त्यांच्यासोबत आहेत. पुरुषप्रधान व्यवस्थेत महिलांनी घेतलेल्या अशा प्रकारच्या पुढाकाराला कुटुंबाची साथ मिळणं हे फार महत्त्वाचे आहे.

रिना महिलांना उद्देशून म्हणते, समाजामध्ये अन्याय होत असेल तर तुम्ही महिला आहात म्हणून शांत बसू नका. रस्त्यावर उतरा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. पुरुष तुम्हाला घरी बसवून ठेवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही शांत बसू नका, अन्यायाविरुद्ध बोलत राहा.

पुरुषप्रधान व्यवस्थेत कोणताही कार्यक्रम असला की नेहमीप्रमाणे पुरुष पुढे आणि महिला मागे हे ठरलेलं, मात्र आता रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. अन्यायाविरुद्ध बोलत आहेत.  संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हाऊ डेअर यू?’ असा प्रश्न विचारणारी १६ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग असो की अत्याचारी पोलिसांना धाडसाने विरोध करणारी रिना, महिला पुढे येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत ही आश्वासक गोष्ट आहे.

लेखकाचा संपर्क -  ७०२०९८९३७

बातम्या आणखी आहेत...