आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाला एकदाचा "हॅप्पी वुमन्स डे'...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मयूर लंकेश्वर

महिला दिन आला की वंडरवुमन, सुपरवुमन, नारीशक्ती, मातृशक्ती अशा लादलेल्या व्याख्यांची तोरणे लावणे, बाईच्या संदर्भाने येणाऱ्या विविध कौटुंबिक नात्यांची उजळणी करून तिला थोर सांस्कृतिकपणाचा मुलामा चढवणे, कुटुंबव्यवस्थेतल्या तिच्या दुय्यम ठरवलेल्या स्थानाचे नात्यांची माळ घालून उदात्तीकरण करणे असे प्रकार समाजमनावर बिंबवले जातात. 
‘नेमेची येतो पावसाळा’ म्हटल्याप्रमाणे ८ मार्चला दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जागतिक महिला दिन थाटामाटात साजरा झाला. भांडवलशाही जगात कुठल्याही मोठ्या चळवळीचे अंतर्बाह्य बाजारीकरण करण्याची अफाट क्षमता असणारी अनेक इंजिने सतत कार्यरत असतात. भारतासारख्या विषमतेचा मापदंड असणाऱ्या देशात तर अशी इंजिने सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत धडाडीने धूर सोडत असतात. त्यातूनच मग कोट्यवधी रुपये खर्चून विविध सोहळे साजरे केले जातात. कॉर्पोरेट क्षेत्रात जोरदार सेलिब्रेशन राबवले जाते. अॅमेझोन, फ्लिपकार्टसारख्या शॉपिंग पोर्टल्सवर महिला दिनानिमित्त खास डिस्काउंट मोहिमा राबवल्या जातात. बीजेपीचे आयटीसेल प्रचारक #SheInspiresUs सारख्या हॅशटॅग मोहिमा राबवतात. एका दिवसासाठी काही महिलांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे ट्विटर हँडल चालवायला दिले जाते. हॅशटॅग चालवला की अर्धे काम फत्ते झालेले असते अशा जमान्यात आपण वावरत असतो.  एरवी हेच आयटीसेल प्रचारक अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या, बेधडक लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, चालणाऱ्या कित्येक महिलांचे अगणित ट्रोल अकाउंट्सद्वारे चारित्र्यहनन, खच्चीकरण आणि प्रतिमाभंजन करण्यात पुढे असतात. गौरी लंकेशपासून ते स्वरा भास्कर, दीपिका पादुकोणपर्यंत कित्येकींचा धसका आयटी सेलच्या हजारो अकाउंट्सने नेहमीच घेतलेला असतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे ट्विटर हँडल अशा विष पेरणाऱ्या काही ट्विटर हँडलला फॉलो करत असते... ही बाब अशा पवित्र दिवशी मात्र विसरून जायची असते.  महिला  दिनाच्या  निमित्ताने  नारीशक्तीचा  भोंगा देशभरात वाजवला जातो.  जाहिरातबाजीवर तग धरून राहिलेल्या सरकारला असे भोंगे वारंवार वाजवणे भागच असते. ‘देश की बेटी खडी तो जीत बढी’सारख्या टॅगलाइन्स मंत्रालयाद्वारे चालवल्या जातात.  त्यातही राजकीय पक्षाचा प्रचार कसा नीट होईल हेच आधी बघितले जाते. आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय दिवे लावले आहेत याचे सरकारी टेंभे दरवर्षी मिरवले जातात. सारे काही आलबेल असल्यासारखे रंगबेरंगी कोलाजवाले चित्र उभे केले जाते. भांडवलशाही आणि पितृसत्ताक व्यवस्था एक चळवळ अशी सहजपणे मारून टाकतात. ती मेलेली फारसे कुणालाही लक्षात येत नाही. एका दिवसाचा ते एका आठवड्याचा महोत्सव साजरा होतो.  नुसते हॅप्पी वुमन्स डेचे मेसेज केले की इथल्या समाजाचे परमकर्तव्य पार पडलेले असते. धर्म-जातिव्यवस्थेने पोसलेल्या, विषमतेच्या गुणसूत्रांनी बरबटलेल्या सामाजिक मुळापर्यंत जायचे धाडस ना इथला समाज करतो ना इथला मीडिया ना इथले राज्यकर्ते कधी तसे धाडस दाखवतात.युनायटेड नेशन्सने १९७५ सालापासून ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला तेव्हा महिलांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक शोषणाबद्दल जगाला जाणीव करून देणे आणि सर्वंकष समानतेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणे हा त्यामागचा मूळ उद्देश होता. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात तिथल्या पुरोगामी स्त्रीवादी चळवळींनी वेळोवेळी या मूळ उद्देशाबाबत विविध स्तरावर मंथन घडवून आणले. ही प्रक्रिया केवळ एका दिवसापुरती नव्हती तर त्याबद्दल वारंवार तिथल्या समाजाने  प्रगल्भतेने आपल्या जाणिवा-नेणिवांच्या कक्षा रुंदावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. महिलांचे शोषण आजही जगभरात सुरूच आहे. मात्र युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात त्या शोषणाच्या वास्तवाची किमान दखल तरी घेतली जाते. भारतीय समाजमन मात्र याबाबतीत अद्यापही प्रचंड मागासलेले आणि भयंकर सुस्तावलेले आहे. त्यातूनच महिला दिन हा महिलांच्या सामाजिक अवकाशाबद्दल मंथन घडवून आणण्याचा दिवस न ठरता तो वंडरवुमन, सुपरवुमन अशा शब्दांच्या सुशोभीकरणाचा दिवस ठरतो. महिला दिन आला की नारीशक्ती, मातृशक्ती अशा लादलेल्या व्याख्यांची तोरणे लावणे, बाईच्या संदर्भाने येणाऱ्या विविध कौटुंबिक नात्यांची उजळणी करून तिला थोर सांस्कृतिकपणाचा मुलामा चढवणे, कुटुंबव्यवस्थेतल्या तिच्या दुय्यम ठरवलेल्या स्थानाचे नात्यांची माळ घालून उदात्तीकरण करणे असे प्रकार समाजमनावर बिंबवले जातात. अशा तऱ्हेेने बाईला आधी माणूस म्हणून कधी बघणार हा प्रश्नच इथली पितृसत्ताक जाती-धर्मव्यवस्था मोडीत काढते. महिलांच्या होणाऱ्या शोषणाला असंख्य भरजरी विशेषणांचा मुलामा फासून एका दिवसापुरते बाईचे दैवतीकरण करणे आणि शोषणाची व्यवस्था जैसे थे टिकवून ठेवणे हे भारतीय पुरुषी  विकृतीचे राजकारण आहे. भारतासारख्या देशात महिलांचे शोषण हे बहुपदरी आहे. त्याला धार्मिक आणि जातीय संदर्भ आहेत. भारतातली माध्यमे सरकारच्या सोबतीने विविध क्षेत्रातल्या  महिलांच्या प्रगतीबद्दल आलेख हिरीरीने मांडत असले तरी या सोहळ्यात दलित आणि बहुजन महिलांचे स्थान नेमके काय आहे? प्रगतीबद्दल बोलताना शोषणाबद्दल बोलणे मात्र टाळले जाते. त्याबद्दल इथला समाज आणि माध्यमे कुठवर मूग गिळून गप्प बसणार आहेत? पितृसत्ताक धर्मसंस्कृतीच्या उतरंडीत सर्वात तळाशी असणाऱ्या दलित महिलांचे प्रश्न टीव्ही चॅनलवर, रेडिअो शोवरच्या पॅनलमध्ये चर्चेला कधी येणार आहेत? जागतिक महिला दिन म्हणजे फक्त कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांच्या सत्काराचा दिवस झालेला आहे काय? कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या, तथाकथित आर्थिक स्वातंत्र्य मिळवलेल्या महिलासुद्धा खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत काय? त्यांच्या सामाजिक स्वातंत्र्याचे काय? पुरुषप्रधान अर्थव्यवस्थेत जास्त पगारावर काम करणाऱ्या बाईचे सामाजिक स्थानसुद्धा कमी पगारावर वा अगदीच बेरोजगार असणाऱ्या पुरुषापेक्षाही दुय्यम ठरवणारी संस्कृती भारताने राजरोस पोसलेली आहे हे वास्तव आहे. महिला दिन साजरा होत असताना वा होत नसतानाही - महिलांच्या बाबतीत घडणारा घरगुती हिंसाचार, हुंडाबळी, लैंगिक अत्याचार, आर्थिक कुचंबणा, मुलीने जातीबाहेर लग्न केले म्हणून सडक्या प्रतिष्ठेच्या मानसिकतेतून, पुरुषी मालकी हक्काच्या विकृतीतून घडणारा हिंसाचार, जातपंचायतीचे फतवे,  पोरीच्या जातीने जास्त शिकून काय करायचंय म्हणत बळजबरी लग्नाला भाग पाडणारा सामाजिक दबाव - या आणि अशा अनेक प्रश्नांवर सातत्याने मंथन व्हायला हवे. नुसताच आमची संस्कृती महिलांचा सन्मान करते हा पोकळ अभिनिवेश बाळगून उपयोग नाही. ८ मार्च २०२० चा जागतिक महिला दिन साजरा होताना पाकिस्तानात त्यानिमित्ताने निघालेल्या ‘औरत मार्च’वर इस्लामी कट्टरवाद्यांनी दगडफेक केली. किर्गिझस्तानात निघालेल्या मोर्चावर किर्गिझस्तानी कट्टर राष्ट्रवाद्यांनी मोर्चात घुसून महिलांना मारहाण केली. इस्लामी राष्ट्रात महिलांवरील शोषणाच्या तुलनेत भारताचा इतिहास आणि वर्तमान फार उदार आहे असे तर अजिबातच नाही. शोषणाचा इतिहास आणि वर्तमान इथे अधिक धारदारच आहे. महिला दिनाच्या एकदिवसीय वा साप्ताहिक डामडौलापेक्षा त्या क्रूर इतिहासाबद्दल आणि भीषण वर्तमानबद्दल सातत्याने लिहिणे, बोलणे, सजग राहणे अधिक गरजेचे आहे.

लेखकाचा संपर्क - 9970028408

बातम्या आणखी आहेत...