आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद ते गुगल प्रवास यशाचा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मयूरी कांगो   आंतरराष्ट्रीय महिला दिन काही दिवसांवर आला आहे. तो साजरा होताना महिलांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीची दखलही घेतली जाईल. पण, काळ बदलतो, तशी आव्हानेही बदलतात. रणांगण बदलले की युद्धाचे स्वरूपही बदलते... नव्या जमान्यातील नव्या आव्हानांना सामोरे जायचे, तर त्यासाठीची सारी सिद्धता हवीच!   इंटरनेटचा वापर तसंच ऑनलाइन अन् सोशल मीडियातील वावर आजच्या घडीला प्रत्येकासाठी महत्त्वाचा विषय ठरला आहे.  इथं स्वातंत्र्य आहे, तसा संघर्षही आहे... संधी आहेत, तशी संकटेही आहेत... मैत्रीची आश्वासक साथ आहे, तसा गाफिलपणातून होणारा घातही आहे... पारध व्हायचं नसेल, तर इथं सतत सावध राहावं लागतं... एकूणच, या डिजिटल विश्वाचे काही नियम-संकेत आहेत, ते पाळून जो हातातली माध्यमे कौशल्यानेे वापरतो, तोच इथं टिकतो.. पुढंही जातो... ‘ती’ या विश्वावरही ठसा उमटवतेय. नवं काही शिकतेय, वेगळं काही करतेय.. धडपडताना सावरतेय अन् सवयीने सरावतेयही..नव्या जमान्यातल्या या ‘डिजि’वुमनच्या वाटचालीचा हा वेध खास तुम्हा सर्वांसाठी.. महिला दिनाच्या शुभेच्छांसह..!

माझ्या आयुष्याचा प्रवास प्रत्येक टप्प्यावर काहीतरी शिकवणारा आणि समृद्ध करणारा ठरला. परदेशात राहिल्यावर एक स्त्री म्हणून जो आत्मविश्वास आणि खंबीरपणा गरजेचा असतो, तो मला मिळालाच; शिवाय तिथल्या कार्यसंस्कृतीमुळे मी खूप प्रगल्भ झाले. ‘गुगल’सारख्या कंपनीत काम करताना तुम्ही महिला आहात, हा विचार केला जात नाही. तिथं तुमची क्षमता आणि बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरते...
मी सध्या गुगलमध्ये भारताची इंडस्ट्री हेड म्हणून काम करते. बॉलीवूड आणि मग मल्टिनॅशनल कंपनी या दोन्ही ठिकाणी काम करताना आव्हानं होतीच. पण दोन्ही ठिकाणी असलेले चॅलंेजेस हे वेगवेगळे होते त्याची तुलना नाही करू शकत. चित्रपटात काम करणे ही एक कला आहे आणि मल्टिनॅशनल कंपनीत काम करणे हे एक प्रकारचे सायन्स आहे. जेव्हा मी चित्रपटात काम करायचे त्या वेळी मी त्या क्षेत्रात अगदी नवीन होते. फारशी कुणाला ओळखत नव्हते किंवा माझी कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती त्यामुळे अशा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करणे किंवा टिकवून ठेवणे खूप अवघड असते. शिवाय, चित्रपट क्षेत्रात काम करताना तुम्हाला मार्केटिंग, पब्लिसिटी या सगळ्या गोष्टींचेही नॉलेज असावे लागते. पण, त्या काळात मला त्या गोष्टी फारशा कळायच्या नाहीत. मी ज्या काळात काम करत होते तेव्हा चित्रपटसृष्टीत समोरून जी संधी यायची तीच स्वीकारायला लागत होती. पण मल्टिनॅशनल कंपनीत काम करत असताना कुठं काम करायचं हे ठरवण्याची माझ्याकडे संधी होती. आता बॉलीवूडमध्ये मोठे बदल झाले आहेत, पण माझ्यावेळी परिस्थिती वेगळी होती. मल्टिनॅशनल कंपनीत काम करताना वेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. तिथं तुम्ही कुठून शिक्षण घेतलं आहे, तुम्हाला अनुभव किती आहे, तुम्हाला एखाद्या विषयाचे किती सखोल नॉलेज आहे, तुम्ही मुद्दे कसे मांडता, कसे बोलता या सगळ्या गोष्टी इथं काम करताना महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे बॉलीवूड आणि मल्टिनॅशनल कंपनी ही दोन्ही क्षेत्रं खूप वेगळी आहेत. इथं कामाच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. त्यामुळे इथं काम करताना येणारी आव्हानंदेखील खूप वेगळी आहेत. 

मी बॉलीवूडमध्ये आठ-दहा वर्षे काम केले. माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. मी खूप एन्जॉय केलं. मला अभिनय करणे खूप आवडते. आताही आवडते पण त्यापेक्षा आता जे मी काम करते ते जास्त आवडते. औरंगाबाद इथं माझं बालपण गेलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात औरंबादचं स्थान हे जवळचं  आहे. त्यानंतर मी मुंबईत शिकले तर तिथलं आयुष्य हे मला खूप काही शिकवणारं होतं. खूप वेगवेगळे मित्र-मैत्रिणी झाले आणि मुंबईतला काळ मला खूप काही शिकवणारा होता. त्यानंतर मी न्यूूूयॉर्कला गेले. तिथं शिक्षण घेतलं, नोकरी केली. परदेशात राहिल्यावर एक स्त्री म्हणून जो आत्मविश्वास आणि खंबीरपणा येणे गरजेचे असते तो मला परदेशात मिळाला. तिथल्या संस्कृती, कामाचे कल्चर यामुळे मी खूप प्रगल्भ झाले. त्यानंतर मी भारतात येण्याचा विचार केला. पण हा निर्णय घेण्यामागे दोन कारणं होती. एक म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करत होते त्या क्षेत्राशी संबंधित अधिक चांगल्या संधी या भारतात होत्या म्हणून २०१२ ला मी भारतात येण्याचा निर्णय घेतला. दुसरं कारण म्हणजे, माझे आई-बाबा आणि सासू-सासरे हे भारतात राहतात. त्यामुळे माझ्या मुलाला माझ्या कुटुंबासोबत राहता यावं, असा विचार केला. पूर्वी मी भारतात असताना दिल्लीबद्दल माझे खूप पूर्वग्रह होते की दिल्ली महिलांसाठी सुरक्षित नाही किंवा तिथलं कल्चर चांगलं नाही. पण आता दिल्लीत राहण्याचा अनुभव खूप चांगला आहे. मला खूप चांगले लोक भेटले तसेच वेगवेगळ्या संस्कृतीचे आणि धर्माचे लोक दिल्लीत राहतात. त्यामुळे इथलं वातावरण मला खूप आवडतं. त्यामुळे औरंगाबाद ते दिल्ली हा माझ्या आयुष्याचा प्रवास माझ्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मला शिकवणारा आणि समृद्ध करणारा ठरला आहे. गुगलसारख्या कंपनीत काम करत असताना इथं तुम्ही महिला आहात हा विचार केला जात नाही. या कंपनीमध्ये तुमच्या क्षमता आणि तुमची बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरते .इथं तुमचे स्त्री असणे किंवा पुरुष असणे याला महत्त्व दिले जात नाही. फिल्म इंडस्ट्री हे क्षेत्र खूप पुरुषी आहे. तिथं वेगवेगळ्या टप्प्यांवर सतत महिलांना दुय्यम मानलं जातं. त्यामुळेच मी विचार करून या क्षेत्राची निवड केली आहे. मी जिथं काम करते तिथं फक्त तुमची बुद्धिमत्ता तपासली जाते. शिवाय जात, धर्म, लिंग याच्या पलीकडे विचार करणारे सहकारी आणि वरिष्ठ आहेत. पण मला माझ्या कामात कधीच अडचणी आल्या नाहीत. अडचण जाणवली ती माझ्या वैयक्तिक आयुष्यात, जेव्हा आपण एक वर्किंग वुमन असतो आणि आई ही भूमिका पार पाडत असतो त्या वेळी  अशी एक फेज होती की घरी बाळाला आपण जास्त वेळ देऊ शकत नाही, आपलं काही चुकतंय  का, असं वाटू लागतं. पण मला वाटतं की प्रत्येक काम करणाऱ्या स्त्रीला असं वाटतच असेल. काम करणाऱ्या महिलांची ही एक अवस्था असतेच आणि ही वस्तुस्थिती ही आहे ज्यावर काही उत्तर नाहीये. मला असं वाटतं की मुलींनी खूप शिक्षण घ्याव आणि आपलं क्षेत्र स्वत: निवडावं. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावं. बऱ्याचवेळा असं होतं की आपण निवडलेलं क्षेत्र हे दुसऱ्यांना आवडेलचंअसे नाही किंवा ते क्षेत्र दुसऱ्यांना कमी महत्त्वाचं वाटू शकतं  त्यासाठी तुम्हाला सहकार्य मिळेलचं असे नाही पण त्या क्षेत्रात तुम्हाला आवड असेल आणि ती तुमची चॉईस असेल तर तुम्ही त्याच क्षेत्रात काम केलं पाहिजे. मग चुकलं तरी ठीक आहे पण मी ठरवेण आणि निर्णय घेईन हा आत्मविश्वास मुलींमध्ये असणे गरजेचं आहे. शेवटी मला जे हवं ते मी केलं पाहिजे हे मुलींना स्वत: ठरवता येणं महत्वाचं आहे. माझं कुटुंब हे नेहमीच डाव्या चळवळीशी संबधित राहिलं आहे. मी ही त्याच विचारांसोबत मोठी झाली आहे. पण मी विचार करते की आपली कोणतीही विचारसरणी असो शेवटी माणुसकी आणि नेहमी दुसऱ्यांचा विचार करत आयुष्य जगलं पाहिजे हेच मला खूप महत्त्वाचं वाटतं.

शब्दांकन : मिनाज लाटकर

बातम्या आणखी आहेत...