आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

  लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे अनु मलिकला 'इंडियन आयडॉल'मधून पुन्हा एकदा दाखवला जाणार बाहेरचा रस्ता!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनु मलिकची पुन्हा एकदा ‘इंडियन आयडॉल’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  सध्या ‘इंडियन आयडॉल’चा 11 वा सिझन सुरु असून अनु मलिक या शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत आहे. यापूर्वी याच शोच्या दहाव्या सिझनमधून अनु मलिककला परीक्षकपदावरून हटवण्यात आले होते. खरं तर वर्षभरानंतर मीटूचे वादळ शांत झाले आणि अनु मलिक इंडियन आयडॉल या शोमध्ये परतला. पण आता पुन्हा एकदा हे वादळ घोंघावू लागले आहे. त्यामुळेच अनु मलिकवर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोनी वाहिनीकडून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

व्यक्त केला जातोय निषेध... 
अनु मलिकला इंडियन आयडॉल या शोमध्ये परीक्षक म्हणून पाहिल्यावर सोशल मीडियावर अनेक महिलांनी रोष व्यक्त केला आहे.  गायिका सोना मोहापात्रा हिने अलीकडेच अनु मलिकवरील आरोपांच्या बातम्यांचे फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली. ‘जोपर्यंत निर्भयासारख्या घटना आपल्या देशात घडत नाही, तोपर्यंत लोक जागे होणार नाहीत का? अनु मलिकवर केलेल्या आरोपांमुळे मला शो सोडावा लागला होता. मी केलेल्या आरोपांमुळे अनु मलिकला प्रसिद्धी मिळाली त्यासोबत त्याच्या कार्यक्रमाला मोफत प्रसिद्धी मिळाली असा आरोपही माझ्यावर करण्यात आला. या आरोपानंतर वर्षभरताच लैंगिक शोषणाचे आरोप झालेला हा व्यक्ती छोट्या पडद्यावर अगदी सहज परतला’ असे ट्वीट तिने केले.

सोना मोहापात्राच्या या ट्वीटला गायिका नेहा भसीन हिने पाठिंबा दर्शवला आणि तिच्यासोबत घडलेला प्रसंग शेअर केला.  'मी तुझ्याशी सहमत आहे. अनु मलिक लैंगिक शोषण करणाराच आहे. अनु मलिकच्या विचित्र वागण्यामुळे मी वयाच्या 21 वर्षी स्टुडिओतून पळ काढला होता. स्टुडिओत सोफ्यावर आडवं पडून माझ्या डोळ्यांविषयी बोलत विचित्र हावभाव करायला लागल्यावर मी खोटं बोलून तिथून कसाबसा पळ काढला. माझी आई स्टुडिओखाली वाट पाहत थांबली आहे असे मी सांगितले. त्यानंतर त्याने मला मेसेज, फोन करण्याचेही प्रयत्न केले पण मी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.' असेही तिने लिहिले आहे.

यावर आता सोनी वाहिनी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.