आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधी व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद, रुग्णांची गैरसोय, उलाढालही ठप्प! कोट्यवधींचे व्यवहार कोलमडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ऑनलाइन औषध विक्रीला परवानगी तसेच थेट परकीय गुंतवणुकीला मुभा देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ केमिस्ट आणि ड्रगिस्टनी पुकारलेल्या बंदला मराठवाड्यातील सर्वच शहरांत चांगला प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या रुग्णांची औषधींअभावी गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयाशी संलग्नित औषधी दुकाने तसेच काही दुकानांतून औषधी देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. 


परभणीत कडकडीत बंद 
शुक्रवारच्या(दि.२८) देशव्यापी बंदमध्ये जिल्हा व्यापारी महासंघाने सहभाग नोंदवल्यामुळे बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार कोलमडले. त्याच वेळी औषधी विक्रेत्यांनीही या बंद मध्ये सहभाग नोंदवल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात तीव्र निदर्शने केली. सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. नव्या भागात काही प्रमाणात हॉटेल्स व अन्य व्यवसाय सुरू होते. मात्र मध्यवर्ती बाजारपेठेत शुकशुकाट होता. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांना या संदर्भातील निवेदन दिले. महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिव सचिन अंबिलवादे, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, नंदकिशोर अग्रवाल सायकलवाले, मोती जैन, पवन झांझरी, पांडुरंग वट्टमवार, प्रल्हाद कानडे, विजय कुचेरिया, रमेश पेकम, श्री शर्मा आदींसह व्यापाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत निवेदन दिले. 


९५० औषध विक्रेते सहभागी 
देशव्यापी बंदमध्ये अखिल भारतीय औषधी विक्रेत्या संघटनेने आपला पाठिंबा देत सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९५० औषधी विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, अनिल हराळ, पवन झांझरी, अजित वट्टमवार, दिलीप दुधाटे, दिलीप देशमुख, राजेंद्र सोनी, सुजित काबरा, सुनील खरवडे, सुनील जोशी आदींनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना याबाबतचे निवेदन दिले. 


लातूर : मोर्चात व्यापारी महासंघाचा सहभाग 
लातूर येथे बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा देत मूक मोर्चातही सहभाग घेतला. या बंदमुळे शहरात तुरळकच व्यवहार सुरू होते. केंद्र सरकारच्या परकीय गुंतवणुकीमुळे देशातील पारंपरिक व्यापार संपुष्टात येईल. किरकोळ व्यापाऱ्यांवर कोट्यवधींचे संसार अवलंबून आहेत. हे सर्व घटक आणि व्यापारीही रस्त्यावर येतील. ग्राहकांना भुरळ घालण्याचे काम सरकार करीत आहे. फोनवरून घरपोच डिलिव्हरी दिली जाईल. मालाची गुणवत्ता काय, हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. तसेच सामान्य ग्राहक मॉलमध्ये जाऊन खरेदी करू शकत नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र सरकारने बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मूक मोर्चात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी, भारत माळवदकर, मनीष बंडेवार, विश्वनाथ किनीकर, रामदास भोसले, बसवराज वळसंगे, निजाम हुच्चे, निसार इंदानी, कमल जोधवानी, विनोद गिल्डा, दत्तात्रय पत्रावळे, विशाल ईटकर उपस्थित होते. 


मोठ्या शहरांत चांगला प्रतिसाद 
केमिस्ट आणि ड्रगिस्टनी पुकारलेल्या बंदला औरंगाबाद जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड, जालना, नांदेड, हिंगोली आदी शहरांतही चांगला प्रतिसाद मिळाला. औषधी दुकानदारांनी कडकडीत बंद पाळल्याने काही ठिकाणी रुग्णांची गैरसोय झाली. 

बातम्या आणखी आहेत...