आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझी यशस्वी पाककृती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक महिलांनी आयुष्यात कधी तरी एखादा नवीन पदार्थ मनापासून तयार करून पाहिलेला असतो. बक्षिस मिळो अथवा न मिळो एखाद्या पाककला स्पर्धेत भाग घेतलेला असतो. अशाच एका पाककला स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसाव्यतिरिक्त खूप काही शिकायला मिळाल्याचा आनंद साजरा करणारा एक अनुभव.

 

थंडी सुरू झाली. बाजारात भाज्या व फळांची रेलचेल झाली तशी आमच्या  ब्राम्हण सखी महिला मंडळाने पाककला स्पर्धा जाहीर केली. हिरवेगार मटार, लालगुलाबी गाजरं, आणि बहुगुणी आवळे यांपासून तयार केलेले पदार्थ बनवायचे होते. माझ्या डोक्यात लखकन एक पदार्थ घुसला आणि वयाचा, तब्येतीचा कसलाच विचार न करता पहिलंच नाव स्पर्धेसाठ दिलं. बक्षीस मिळण्याची १०० टक्के खात्री असलेला एकदम वेगळा पदार्थ. 

 

झालं. बाजारात खेटे झाले. आठवडाभर डोक्यात तेच. गाजरमटार गाजरमटार गाजरमटार. जमवाजमव झाली. मटार सोलून ठेवले. घरातही कोणाला काही सांगितलं नाही. मी करणार होते, गाजरमटारचे खमंग चटपटीत सारण भरलेलं सुरळीच्या वड्या. हा पदार्थ कोण्णीसुद्धा करणार नाही याची खात्री होती. शिवाय स्पर्धेच्या अटीत ती बसणारी होती. तळलेलं नाही, मसालेदार नाही. मी या वड्या कशा सजवायच्या तेही ठरवलं होतं. मधोमध एक मोठी दंडगोलासारखी वडी ठेवून त्यावर जोकर ठेवायचा. आणि काय स्वप्नात रंगून गेले की बस. पण म्हटलं, एकदोनदा करून पाहावा पदार्थ, ऐन वेळी फजिती नको. यजमान बाहेर गेल्यावर भराभरा सारण केलं.

बेसनात प्रमाणशीर ताक आणि पाणी घालून शिजवलं. ताटात पसरून त्यावर सारण घातलं आणि गुंडाळी करायला सुरुवात केली. पण ती काय होईना. घामाघूम झाले. कशाबशा चारपाच ढकलत नेल्या. नाइलाजाने पदार्थ जाहीर करावा लागला. मुलगा, सून, नातू, यजमान तेवढ्यात आलेच. चव पाहायची म्हणून प्रत्येक जण एकेक वडी उचलू लागला तर वडीची छकलं होऊ लागली. मनात धस्स झालं. नातवाने धीर दिला. आजी, जरा कोरडं करून पाहा सारण. मग तेही करून पाहिलं. पण मग खाताना वडी हातात आणि सारण अंगावर. पीठ जरा जाडसर पसरून पाहिलं. पण वड्या काही त्या सारणाचा स्वीकार करेनात. डोळे भरून आले. नाव तर अगदी पहिल्यांदा दिलंय, माघार कशी घ्यायची. मुलगा म्हणाला, आधी शांत होत. तुला झेपेल असाच पदार्थ कर, पण पूर्ण प्रयत्न नक्की कर. मग काय होईल ते होऊ दे. कोणीतरी सुचवलं म्हणून यूट्यूब उघडलं मोबाइलवर. त्यावरचे हजारो प्रकार पाहून चक्रावलेच. शेवटी म्हटलं, गाजरमटार मिश्र भरलेला पराठा करायचा. 

 

स्पर्धेचा दिवस उजाडला. मनानेच चवदार सारण केलं. पारीचं पीठ भिजवलं. प्रत्येक पराठा जीव ओतून केला. मनासारखे खुसखुशीत पराठे तयार झाले. आता त्यांना सजवायचं होतं. जोकर बनवण्यासाठी काकडीटोमॅटो आणले. त्या काकडीनेही जीव खाल्ला. सगळीकडे कमरेत वाकलेल्या काकड्या. शेवटी एका गाडीवर अंगाने बरी असलेली काकडी मिळाली. ती उभी केली. त्यावर टोमॅटो ठेवला. पण तो उभट असल्याने थोडा कापून ठेवला. मग त्यातनं रस गळायला लागला आणि काकडी भिजून गेली. कणकेची शिजवून पेस्ट केली, ती काकडीला लावून टोमॅटो ठेवला तर तो जास्तच घसरायला लागला. शेवटी रागाने दाबून बसवला. त्याच्या डोक्यावर बीटचा शेंडीकडचा भाग कापून टोपीसारखा ठेवला आणि लगेच फ्रिजमध्ये रवानगी केली. जोकरला हात म्हणून संत्र्याच्या फोडी लावायला घेतल्या तर त्या पाझरायला लागल्या. विचार सोडून दिला. फ्रिजमुळे निदान जोकर तरी पक्का झाला. एकूण सकाळी नऊ वाजल्यापासून स्वयंपाकघरात झुंजत होते. जोकरचे डोळे आणि तोंडासाठी एक टिकल्यांचं पाकीट आणलं. सगळ्या वस्तूंची यादी केली. पिशवीत सर्व पदार्थ भरले आणि हाशहुश करत हाॅलवर पोचले. थोड्या वेळात इतर स्पर्धक आले. पदार्थ मांडायला सुरुवात केली. माझी सजावट केव्हाच झाली होती. कचोरी, समोसे, कटलेट, ट्रफल वगैरे पदार्थांच्या गदारोळात माझं काय होणार, या विचाराने पुन्हा मनावर मळभ दाटलं. परीक्षक आले. अर्धापाऊण तास झाला. निकालाची वेळ आली.

उत्तेजनार्थ, तृतीय अशी नावं पुकारली गेली. आणि द्वितीय क्रमांकावर माझं नाव. अखेर झुंज यशस्वी झाली. सगळ्या सख्यांनी एकएक घास करत पराठे फस्त केले. एका सखीने घास भरवून अभिनंदन केलं. तोच क्षण मोठ्या आनंदाचा होता. व्हाॅट्सअॅपवर मैत्रीवर रकानेच्या रकाने भरून पोस्ट येत असतात. पण या सखीचे विशाल अंतरंग बक्षिसापेक्षा मोलाचं वाटलं. एखादी गोष्ट विशुद्ध मनाने केली की, छोट्या गोष्टीतही विशालता येते. कोणतीही छोटीमोठी गोष्ट असो, मेहनत केली आणि त्याचा ध्यास घेतला की यश दूर नसतं, हे मला कळलं.