आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दंगलीपूर्वीचे भयनाट्य...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणपणे 1986-87 वर्ष असावे. मी नोकरी करत असलेल्या खात्यामार्फत सात दिवसांच्या कार्यशाळेसाठी पुण्याला गेलो होतो. कसब्यात एका ठिकाणी खोली घेतली होती. त्या दिवशी गुरुवार होता. सायंकाळी सहा वाजता कार्यशाळा संपली.अगोदर ठरविल्याप्रमाणे धनकवडीला जाऊन सद्गुरू शंकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. रात्री आठच्या सुमारास शनिवारवाड्याजवळ बसने उतरलो. बालगंधर्व नाट्यगृहात कीर्ती शिलेदार यांचे संगीत शारदा हे संगीत नाटक लागले होते, त्याची जाहिरात सकाळी पाहिलेली असल्याने ते नाटक पाहायचे ठरवले होते.

बालगंधर्वकडे चालत गेलो. नाट्यगृहावर आलो तर काय? नाटक हाऊसफुल्ल झाले होते. मी बराच निराश होऊन परतणार तितक्यात एका वृद्ध व्यक्तीने मला अडवून,नाटक पाहायचे आहे काय, असे विचारले. मी म्हणालो, होय पण तिकीट मिळाले नाही. त्यावर त्या वृद्धाने त्याचे तिकीट मला विकत दिले आणि म्हणाला, मी नेहमीच पाहतो, आज तुम्ही पाहा. मी त्यांचे आभार मानून नाटक पाहिले. नाटक रात्री दोन वाजता सुटले. रिक्षाला दीडपट भाडे देऊन जाणे परवडण्यासारखे नव्हते. तेव्हा तेवढ्या रात्री चालत शनिवार वाड्याला वळसा घालून कसबा पेठेत शिरलो.तेव्हा एका चबुत-यावर पूजास्थान होते. त्यावर मंडप घालण्यात आला होता. दिव्याच्या माळा होत्या, पण त्या शॉर्टसर्किटने पेटल्या होत्या. त्यामुळे मंडपाच्या कापडानेही पेट घेतलेला होता. मी धावत जाऊन पेटलेली कापडाची झालर काढली आणि पुढचा अनर्थ टाळला. पुन्हा पहाटे पाहिले. कुणीतरी सारे आवरून ठेवले होते. सायंकाळी परत त्याच परिसरात आलो तर काय? तेवढ्याच परिसरात दंगल झाली असावी. कारण परिसरात गाड्यांच्या फुटलेल्या काचा पसरलेल्या होत्या. चोहीकडे पोलिसांच्या गाड्या होत्या. ते पाहून मी पहाटेच या परिसरातील आग विझविलेली मला आठवले आणि काळजात धस्स झाले. बरे, मी वाईट काहीच केले नव्हते. पोलिसांच्या दक्षतेने वातावरण निवळले आणि जनजीवन पूर्ववत सुरू झाले.