आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे अधिकारी काम करत नसतील त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, आमदार डॉ. देशमुखांनी सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात सध्याा अनेक मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र काही रस्त्यांवर सुरू असलेल्या कामांची गती अतिशय संथ आहे. अनेक रस्त्यांवर क्राँक्रिट दोन महिन्यांपूर्वी टाकले मात्र रस्त्याच्या आजूबाजूने पेव्हींग ब्लॉक बसवणे, वृक्षारोपण करणे हे महत्वाचे काम झालेले नाहीत. याबाबत आमदार देशमुख यांनी 'साबांविच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्या अधिकाऱ्यांकडेही समाधानकारक उत्तर नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार डाॅ. सुनील देशमुख यांनी 'साबांवि'चे मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांना सांगितले की, जे अधिकारी काम करत नसतील त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. यामुळे बैठकीला हजर असलेल्यांपैकी काही अधिकाऱ्यांना वातानुकूलित सभागृहातही घाम फुटला होता. आमदार देशमुख यांनी शनिवारी साबांवि, महावितरण, मजीप्रा, वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात घेतली त्यावेळी ते बोलत होते.

 

शहरात मागील दीड वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, जुना कॉटन मार्केट ते शेगाव नाका या रस्त्याचे अजूनही काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यांच्या कामाची गती संथ असल्यामुळे आमदारांनी संबधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी डिसेंबर १८ अखेरीस या मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण होऊन त्यानंतर दोन महिने रस्त्याच्या आजूबाजूच्या कामाला लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हमालपुरा ते रेल्वे पुलापर्यंतचा चारशे मीटर मार्गाचे दोन महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण झाले आहेत. मात्र अजूनही रस्त्याच्या आजूबाजूला पेव्हींग ब्लॉक आणि झाड लावलेले नाहीत. याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला विचारणा केली तर या मार्गाचा कंत्राटदार हजरच नव्हता. त्यावेळी 'साबांवि'च्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंत्राटदाराने पेव्हींग ब्लॉकची ऑर्डरच केली नाही. त्यावेळी उपस्थित कंत्राटदाराच्या प्रतिनिधीने सांगितले की, उद्याच ब्लॉक येणार म्हणजे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यातही एकवाक्यता दिसून आली नसल्यामुळे आमदार देशमुख यांनी 'वरातीमागून घोडं नको' या भाषेत समजावून कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांना शहरातील कामावर लक्ष देण्याची सूचना केली. अनेक अधिकाऱ्यांकडे कामाच्या प्रगतीबाबत समाधानकारक उत्तरं नसल्यामुळे आमदार अक्षरश: चिडले आणि म्हणाले, बैठकीला येताना किमान मागच्या बैठकीचे 'मिनिट्स' वाचून येत चला.

 

शहरातील मुख्य बाजारपेठेतील तसेच पंचवटी ते इर्विन रस्त्याबाबतही त्यांनी चर्चा केली. यावेळी साबांविचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी सांगितले की, आर्थीकदृष्ट्या तारकुंपण सर्वच ठिकाणी शक्य नाही. मात्र महत्वाच्या ठिकाणी जसे बसस्थानकासमोर, पोलिस पेट्रोल पम्प ते पोलिस आयुक्त कार्यालयासमोरील दुभाजकाला तार कुंपण करण्यात येणार आहे. या बैठकीला साबांविचे मुख्य अभियंता प्रशांत नवघरे, अधीक्षक अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, महावितरणचे कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड, उपअभियंता राजेंद्र मळसने, मजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार, उपविभागीय अभियंता किशाेर रघुवंशी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्यासह बीएसएनएलचेही अधिकारी व साबांविचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

इर्विन चौकातील विचित्र वाहतुकीवर 'माथापच्ची'
सद्यस्थितीत शहरातील मुख्य चौक असलेल्या इर्विन चौकातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. मात्र वाहतूक पोलिस त्यावर काही सुधारणा करण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यामुळे आमदारांनी उपस्थित वाहतूक शाखेचे अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना या चौकातील विचित्र वाहतुकीवर मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. मात्र पंधरा मिनिटे चर्चा करूनही कोणताही मार्ग निघाला नाही. वास्तविकता सद्या इर्विन चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत 'डेंजर स्पॉट' झाला आहे.

 

तर मी कंत्राटदाराविरुद्ध तक्रार देणार
कंत्राटदार आणि संबंधित विभाग यांच्यात एकवाक्यता नसल्याचे दोन तासांच्या बैठकीत अनेकदा आमदार डॉ. देशमुख यांच्या निदर्शनास आले. अखेर आमदार संतप्त झाले व त्यांनी उपस्थित कंत्राटदाराला खडसावून सांगितले की, काम जर वेळेत मार्गी लागले नाही तर मी स्वत: 'क्रिमिनल निग्लेजेन्सी' म्हणून पोलिसात तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे.

 

बैठकीला दांडी मारणाऱ्या कंत्राटदारांना समज द्या
बैठकीला नही काही कंत्राटदार बैठकीला गैरहजर राहतात. त्यांना तुम्ही समजावून सांगा अन्यथा मी समजावून सांगेल, कारण कंत्राट घेईस्तोवर शांत राहणे आणि एकदा कंत्राट मिळाला की, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणे, मग नागरिकांना काहीही त्रास होवोत, अशी काही कंत्राटदारांची पद्धती आहे. असे आमदारांनी मुख्य अभियंता नवघरे यांना सांगितले. दरम्यान, मुख्य अभियंता नवघरे यांनीही कार्यकारी अभियंता शेंडगे यांना आठवड्यात किमान दोन दिवस तरी प्रत्यक्षात 'साईट'वर जायचे, असे आदेश या बैठकीत दिले.

 

बातम्या आणखी आहेत...