आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरे म्‍हणतात, डीजे अॅडजस्ट करा; पोलिस आयुक्त : ...तर गुन्हा दाखल होणारच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कावड यात्रा आणि दहीहंडीदरम्यान ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून डीजे वाजवणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचाही समावेश आहे. गणेशोत्सवात गुन्हे दाखल न करता डीजेला थोडे अॅडजस्ट करा, अशी विनंती खासदार चंद्रकांत खैरे यांनी गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत शनिवारी (९ सप्टेंबर) केली. त्यावर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले, डीजेपेक्षा पारंपरिक वाद्यांचा वापर करा. फारच आग्रह असेल तर टुवे वाजवा. ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडाल तर गुन्हा दाखल होईल. हा गुन्हा किरकोळ स्वरूपाचा आहे असे अनेकांना वाटत असेल मात्र सध्या सीसीटीएनएस पद्धत आहे. त्यामुळे येथे दाखल गुन्ह्याची माहिती देशातील पोलिसांच्या कुठल्याही संगणकात दिसते. त्याचा फटका बसू शकतो.

 

पोलिसांकडे ध्वनिप्रदूषण मोजण्याचे यंत्र आहे का, असा प्रश्न दानवे यांनी केला. त्यावर प्रत्येक पोलिस ठाण्यात आवाज मोजण्याचे यंत्र आहे, असे प्रसाद म्हणाले. तोच मुद्दा पकडत खैरे म्हणाले की, दिल्लीत रात्री ११.३० नंतरही गणेशोत्सवाचे कार्यक्रम चालतात. आपल्याकडे मात्र कारवाई होते. एक भाग एक गणपती उपक्रमावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी गणेश स्थापना झाली तर एका ठिकाणी गर्दी कमी होते, असे ते म्हणाले. बजाजनगर परिसरातील भक्तांसाठी घाणेगाव, जोगेश्वरी तलावात विसर्जनाला बंदोबस्त द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

 

गणेशभक्तांच्या सूचना
- ११ सप्टेंबर रोजी गांधी पुतळा, शहागंज येथे मोहरम सवारी आणि गणेशोत्सव साजरा होणार आहे. तेथे वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे. कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करावी.
- मनपाने परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करावी.
- छावणी गणेश उत्सवासाठी शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत वेळ द्यावा.
- मिरवणूक मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवावेत.
- गणेशोत्सवात वीजप्रवाह खंडित होऊ नये.
- उघड्यावरील मांस विक्री रोखावी. दहा दिवस दारूबंदी करावी.
- महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असावी.
- मोकाट जनावरे आणि कुत्रे यांचा बंदोबस्त करावा.


पोलिसांनी केले आवाहन
- गणेश मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करावेत. गेल्या वर्षीचे परवानगीपत्र जमा करावे.
- समाजात तेढ निर्माण होईल असा कार्यक्रम आयोजित करू नये.
- संस्थान गणपती येथून विसर्जन मिरवणूक वेळेवर सुरू करावी.
- ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मंडपामुळे वाहतुकीला अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी.

 

हिंदुत्वाच्या राज्यातही
छावणीत गणेश विसर्जन एक दिवस उशिरा होते. त्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी द्या, अशी मागणी चार वर्षांपासून आम्ही करतो आहोत, असे माजी महापौर अशोक सायन्ना सांगितले. शहरात चार दिवस बारा वाजेपर्यंत परवानगी आहे. त्यातील एक दिवस कमी करून तो छावणीला द्यावा, असेही ते म्हणाले. खैरे, आमदार शिरसाट यांना उद्देशून ते म्हणाले, हिंदुत्वाचे राज्य आहे तरी आम्हाला परवानगी मिळत नसेल तर काय अर्थ आहे?

 

यांची होती उपस्थिती
आमदार अतुल सावे, सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे, मनपा अतिरिक्त आयुक्त डी.पी कुलकर्णी, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, हनुमंत भापकर, ज्ञानोबा मुंढे, डॉ. अनिता जमादार, माजी महापौर बापू घडमोडे, रशीदमामू, अशोक सायन्ना, पंजाबराव वडजे पाटील, बबन डिडोरे, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष डी. एन. पाटील, विशेष शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक गोरख चव्हाण, दीपक परदेशी.

 

गुन्हे दाखल झालेले नेते मंचावर
गेल्या काही महिन्यांत दंगलीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले अनेक नेते शनिवारी शांतता समितीच्या मंचावर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बसले होते. विशेष म्हणजे हे गुन्हे राजकीय स्वरूपाचे नसून भारतीय दंड संहितेनुसार दाखल झाले आहेत. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, १९८८-८९ मध्ये दंगल झाली. त्यानंतर शांतता समितीची बैठक झाली. त्या वेळी मी शांतता समितीत असणाऱ्यांना जेलमध्ये टाका, शहर शांत होईल, असे म्हटले होते. शिरसाटांचे हे वक्तव्य ऐकून अधिकारी, नेत्यांचे चेहरे अस्वस्थ झाले होते.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...