आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर 2 दिवसांत बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जायकवाडीच्या पाण्याबाबत पुढाऱ्यांंनी राजकारण न करता जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र आले पाहिजे.त्यासाठी येत्या दोन दिवसांत नगर, नाशिक आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. 


मुळाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या दोन आवर्तनांच्या नियोजनासाठी सिंचन भवनामध्ये शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत कर्डिले बोलत होते. बैठकीसाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, कार्यकारी अभियंता आर. टी. मोरे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी मुळा धरणातील सध्याच्या उपलब्ध पाणी साठ्याच्या नियोजनाचा आराखडा बैठकीत मांडण्यात आला. राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव परिसराच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीत आवर्तन सोडले, तरच पिके वाचतील. धरणात पाणी कमी आहे. आवर्तने व्यवस्थित सोडल्यास पिके वाचतील त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व पाणी वापर संस्थांमध्ये समन्वय आवश्यक आहे. सध्या पाण्यासाठीचे राजकारण जोरात चालू आहे. प्रत्येकजण आपण शेतकऱ्यांंचे कैवारी असल्याचे भासवत आहे. परंतु यावर राजकारण करणे योग्य नसल्याचे मत सर्व उपस्थितांनी मांडले. जायकवाडीला पाणी सोडण्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झाला. आता तेच पाणी जाऊ द्यायचे नाही, असे म्हणत आहेत परंतु आता आरोप-प्रत्यारोप करण्यात काहीच अर्थ नाही. १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ असून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी पिके गमवावी लागली आहेत. त्यामुळे राजकारण न करता सर्व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भौगोलिक परिस्थिती सध्याचे पाणी याचा आढावा घेऊन शासन स्तरावर निर्णय व्हावा, असे मत या वेळी मांडण्यात आले. जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी नगर-नाशिकच्या लोकप्रतिनिधींचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा आहे, असेही कर्डिले म्हणाले. 


४० दिवस पुरेल इतकाच चारा 
पालकमंत्री राम शिंदे यांच्यासमवेत पाथर्डी तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर या तालुक्यात केवळ ४० दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याचे कळले. ५७ टँकर या तालुक्यात सुरू अाहेत. भविष्यात टँकर दिले जातील, त्याला डिझेल दिले जाईल, पण टँकरमध्ये भरण्यासाठी पाणी कुठून आणणार? असा प्रश्न आमदार कर्डिले यांनी यावेळी बोलताना केला. 


मुळा धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनासंदर्भात सिंचन भवन येथे आयोजित नियोजनाच्या बैठकीस उपस्थित आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, कार्यकारी अभियंता, आर.टी. मोरे आदी. 


नदीपात्रात सावधानतेचा इशारा 
मुळा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भंडारदरा, निळवंडे धरणातून ३ हजार क्युसेक्स वेगाने सांडव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. नदीतील उपसा इंजिन मोटारे काढावीत, तसेच प्रवाहात उतरू नये; अन्यथा जीवित हानी होऊ शकते. तसे झाल्यास जलसंपदा खाते जबाबदारी घेणार नाही. प्रवाहास अडथळा केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. जे. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 


पाणी वाया न जाण्याची काळजी घ्यावी लागेल 
पाणीवाटप कायदा झाला, त्यावेळी कोण मंत्री होते, ते काय बोलले हे करत बसण्यापेक्षा सध्या काय करावे,यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले पाहिजे. दुष्काळाच्या स्थितीत पाणी वाया जाणार नाही, याची काळजी पाणीवाटप संस्था व शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. शिवाजी कर्डिले, आमदार. 

बातम्या आणखी आहेत...