आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखतीचा दिवस !

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेघना धर्मेश ज्या दिवसासाठी आपण मनापासून तयारी केली, तो महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रत्यक्ष मुलाखतीचा दिवस! ह्या मुलाखतीच्या दिवसाला सकारात्मकपणे कसं सामोरं जायच ते ह्या लेखात बघूया. मुलाखतीच्या आदल्या दिवशी शांत झोपा. मुलाखतीच्या दिवशी घरून नीट खाऊन निघा. आपल्यातला उत्साह आणि चैतन्य दिवसभरासाठी टिकवून ठेवायचा आहे, हे विसरू नका. मुलाखतीसाठी फॉर्मल  कपडे (पोशाख )निवडा. गडद ,चमकदार असे कपडे टाळावेत. नीट इस्त्री केलेले कपडे आणि त्यानुसार शूज/सँडल्स असावेत. आपले मोजे स्वच्छ आहेत ह्याची पण खात्री करून घ्या. आपण आता कॉर्पोरेट जगात प्रवेश करणार आहोत हे लक्षात ठेवा.आपली सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे आणि बायो-डेटा फाइल /फोल्डरमध्ये नीट क्रमाने लावून घ्या. आपले पासपोर्ट आकाराचे ३-४ फोटोसुद्धा सोबत ठेवा. महत्त्वाच्या गोष्टींच्या झेरॉक्स ठेवायला विसरू नका. रहदारी आणि इतर गोष्टींचा विचार करून मुलाखतीच्या दिवशी कसं जायचं हे  निश्चित करा. मुलाखतीच्या वेळेच्या १५-२० मिनटे आधी तिथे पोचा. हवं असेल तर जरा फ्रेश व्हा. रिसेप्शन डेस्कला आपण आल्याची माहिती द्या. त्यांच्याकडे मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची यादी असते. त्यात आपले नाव आहे की नाही हे तपासून घ्या. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा ताण न घेता शांतपणे प्रतीक्षा क्षेत्रात बसा. हल्ली बऱ्याच ऑफिसमध्ये सीसीटीव्ही असल्यामुळे तुम्ही जेव्हा आपला नंबर येईपर्यंत बाहेर प्रतीक्षा करता, तेव्हा तुमच्या नकळतपणे मुलाखत घेणारे तुमचे /तुमच्या देहबोलीचे निरीक्षण करत असतील. तुम्हाला पारखण्याची ती पण एक युक्ती असेल. तेव्हा फोन वर गप्पा मारणे, गेम्स खेळणे  असं न करता स्वतःला रिलॅक्स कसं करता येईल ते बघा. आपला सेलफोन बंद ठेवा. आपल्याला मुलाखतीसाठी बोलावल्यावर आपले कपडे व्यवस्थित करून महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर एक स्मित घेऊनच केबिनमध्ये प्रवेश करा. केबिनमध्ये उपस्थित असणाऱ्यांना अभिवादन करून, आपल्याला बसण्यास सांगितल्यावर धन्यवाद म्हणून खुर्चीत बसा. आपल्या बसण्यात ताठपणा असूदे, घरी खुर्चीत आरामात बसलोय असं पण आपल्याला बसायचं नाही आहे. इथे लक्षात घ्या की आपल्याला चेहऱ्यावर  कोणताच ताण (जरी प्रत्यक्षात मनात प्रचंड टेन्शन असलं तरी) दाखवायचा नाही तर हलकंसं  हसू  राहू द्यायचं आहे.  मुख्य म्हणजे आपण  रिलॅक्स आहोत हे आपल्या देहबोलीतून कळलं पाहिजे. त्यासाठी आपल्या हाताशी, बोटांशी खेळणं, पाय हलवणं हे सगळं टाळावं. ज्या कंपनीत आपण मुलाखतीसाठी जातोय त्या कंपनीची आधीच व्यवस्थित माहिती करून घ्या.आपल्या कामाच्या स्वरूपाची कल्पना असेल तर उत्तम.आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर शांतपणे, न घाबरता, ताण न घेता स्पष्ट शब्दात उत्तर द्या. आपला आत्मविश्वास बोलताना दिसला पाहिजे. आय-कॉन्टॅक्ट करून मुद्द्याला धरून  उत्तर द्या. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास तसं स्पष्ट सांगा. प्रश्न नीट ऐका. प्रश्न विचारात असताना मध्येच त्यांना काहीतरी विचारून व्यत्यय आणू नका. कारण नसताना जास्त बोलू नका.त्यामुळे आपल्याबद्दल चुकीचा संदेश जाऊ शकतो. जर एखादा प्रश्न आपल्याला कळला नसेल तर तसं सांगा. कृपया, प्रश्न परत  सांगता का असं न घाबरता पण नम्रपणे सांगा. मुलाखतीच्या शेवटी तुम्हालासुद्धा संधी मिळते कंपनीबद्दल प्रश्न विचारायची. तेव्हा अगदी थोडक्यात प्रश्न विचारा. पगाराबद्दल पहिल्याच भेटीत चर्चा करू नका. कामाच्या वेळा, सुट्ट्या हे सर्व लगेच विचारलं तर त्यांना असं वाटू शकतं की कामापेक्षा हे जरुरी आहे का? प्रश्न विचारायचे नाही असं सांगू नका, कारण तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला  कंपनीमध्ये आणि कामासाठी स्वारस्य आहे हे त्यांना कळतं. मुलाखत  झाल्यानंतर  धन्यवाद  म्हणायला विसरू नका. संपूर्ण मुलाखतीत  आपण सकारात्मक राहणं जरुरी आहे. मुलाखतीच्या वेळेस दाखवलेला आपला आत्मविश्वास, व्यावसायिकपणा (Professionalism), नम्रता आणि  सच्चेपणा हे गुण नोकरी मिळवण्यासाठी  नक्कीच मदत करतील. तर, मित्रांनो, वाट कसली बघताय? लागा तयारीला. शुभेच्छा !!

संपर्क-९८२१५७११६१

बातम्या आणखी आहेत...