आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदुरीकर आणि रामतीर्थकर प्रभृतींना बळ कोण पुरवतं आहे?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बायका म्हणजे पायातली चप्पल’
‘प्रेम करणाऱ्या पोरींचं कानफाड फोडलं पाहिजे’
‘जीन्स घालणारी मुलगी मागून कॉइनबॉक्ससारखी दिसती’
‘बाईला भाकरी करता आलीच पाहिजे’
‘बायकोनी नवऱ्याला चहा देतानाही थरथर कापलं पाहिजे, 
तीच खरी संस्कृती’ 

ही आणि अशा अर्थाची एकोणिसाव्या शतकातली वाटावी अशी मतं अत्यंत चलाखीने आणि पटतील अशी मांडणारी व्याख्यानं देणारी काही मंडळी गेल्या काही वर्षांत चर्चेत येत आहेत. हे कसं बरोबर आहे किंवा हा काय वैताग आहे, अशी दोन्ही प्रकारच्या टिप्पणीसह ही व्याख्यानं फाॅरवर्ड केली जात आहेत. त्यातला धोका मात्र फार कुणाच्या लक्षात येत नाही, अशी भीती व्यक्त करणारी कव्हर स्टोरी.


कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर या दोन व्यक्तिमत्त्वांच्यात काय साम्य आहे, असा विचार कधी केला आहे तुम्ही? 

ही नावं मी दहा वर्षांपूर्वी घेतली असती, तर या मंडळींचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग वगळता इतर कुणालाही काहीच सांगता आलं नसतं. आज मात्र तसं होत नाही. ही मंडळी काहीतरी चलाख आणि चपखल बोलतात आणि त्यांचे व्हिडिओ इंटरनेट नि स्मार्टफोनवर व्हायरल होतात, हे आता बहुतांश महाशहरी आणि कॉस्मोपॉलिटन वर्गालाही ठाऊक झालेलं आहे. यांचे व्हिडिओ एकमेकांना पाठवण्यामध्ये वा शेअर करण्यामध्ये शहरी तरुण वर्गाचाही हातभार लागलेला आहे. काहीच नाही, तर निदान ‘हे किती हास्यास्पद बोलताहेत!’ इतकं म्हणण्याइतका नि त्यावरून आपल्या वर्तुळात कुणाशी तरी कडाडून वाद घालण्यापुरता संबंध तरी आला आहेच. 

तर, आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ. काय साम्य आहे या व्यक्तिमत्त्वांच्यात? 
ही दोन्ही मंडळी प्रेक्षकांसमोर आपलं चलाख बोलणं पेश करतात आणि विकतात, तोच त्यांचा पेशा आहे. टायमिंग, आवाजाची फेक, पट्टी, बोलण्याची लय आणि बोलण्यातला आशय यांचं त्यांचं स्वतःचं असं अनोखं रसायन आहे. ते लोकप्रिय आहे. मुख्यत्वेकरून निमशहरी भागांतून - जिथे अद्याप जगण्याचा पारंपरिक तरीका सुटलेला नाही, पण स्मार्टफोन्स आणि इंटरनेट, बुलेट्स आणि टमटम, लेज आणि पिझ्झाबर्गर इत्यादी भौतिक गोष्टींचा संपर्क येऊ लागला आहे, अशा भागांतून - ही मंडळी गर्दी खेचतात. वरकरणी पाहता त्यांचा प्रेक्षकवर्ग निरनिराळ्या आर्थिक-सांस्कृतिक वर्गांतला आहे. पण पुरुषप्रधान-परंपराप्रधान-चातुर्वर्ण्याधारित भारतीय संस्कृतीवरचं प्रेम आणि त्यापायी बायकांचा - प्रसंगी पातळी सोडून केलेला - अपमान मनापासून पटणं-आवडणं हे या दोघांच्याही प्रेक्षकवर्गांमधलं सामाईक सूत्र आहे. इंटरनेट-स्मार्टफोन-यूट्यूब या त्रयीवर स्वार होऊन या लोकांची लागण शहरी कॉस्मोपॉलिटन भागालाही झालेली आहे. बोलता-बोलता प्रेक्षकांना सतत नमस्कार करणारे आणि सदऱ्याची पुढची तीन बटणं उघडी टाकून आपल्या जानव्याचं आणि छाताडाचं प्रदर्शन मांडणारे इंदुरीकर ‘बायका म्हणजे पायातली चप्पल’, ‘प्रेम करणाऱ्या पोरींचं कानफाड फोडलं पाहिजे’, ‘जीन्स घालणारी मुलगी मागून कॉइनबॉक्ससारखी दिसती’ या पातळीची विधानं करतात आणि लोक त्या विधानांना दाद देतात. तेच रामतीर्थकरांचं. ‘बाईला भाकरी करता आलीच पाहिजे’ हे पेटंट वाक्य फेकणाऱ्या आणि ‘बायकोनी नवऱ्याला चहा देतानाही थरथर कापलं पाहिजे, तीच खरी संस्कृती’ अशा आशयाचे विचार मांडणाऱ्या रामतीर्थकर बाई काय बोलतात ते ऐकायला लोक गर्दी करतात, त्यांना दाद देतात. 


मला या लोकप्रियतेची भीती वाटते. 
या लोकांना हसण्यावारी नेण्याइतकंही महत्त्व माझ्या आजूबाजूच्या कोणत्याही शहाण्या माणसानं यांना दिलं नसतं. पण आज मात्र चित्र वेगळं आहे. समाज जसजसा प्रगती करत जाईल, तसतसा या प्रकारच्या विचारांचा जनाधार कमी होत जातो, या सर्वसाधारण निरीक्षणाशी विसंगत अशी लोकप्रियता यांना मिळताना दिसते आहे. या लोकप्रियतेची बऱ्यावाईट कारणांनी चर्चा होते आहे. 


मार्गारेट अॅटवूड या कॅनडामधल्या लेखिकेची, १९८५ साली प्रकाशित झालेली ‘हँडमेड्स टेल’ नावाची एक कादंबरी आहे. अमेरिकेतल्या कडव्या धार्मिक विचारांच्या एका पक्षाने सरकार उलथवून आपली सत्ता आणली आणि त्या सत्तेमध्ये स्त्रियांना फक्त मुलं जन्माला घालणारे यंत्रवजा गुलाम म्हणून स्थान आहे, अशी त्या कादंबरीतली मध्यवर्ती कल्पना. या कादंबरीवर आधारित याच नावाची एक मालिका ‘हुलू’ नामक कंपनीने तयार केली. त्यात अॅटवुडच्या कादंबरीचा काळ आजच्या काळाला आणून भिडवला आणि अर्थात काही कथाभागाची भर घातली. त्या मालिकेत सेरेना नावाची एक व्यक्तिरेखा चितारली आहे. ही सेरेना म्हणजे सनातनी ख्रिस्ती धर्मविचारांचा प्रसार करणारी एक विदुषी. स्त्रियांनी न शिकतासवरता पतिसेवेत परायण झालं पाहिजे, तरच निसर्ग तिच्या ओटीत मुलांचं दान घालेल अशा विचारांचा प्रसार करत ती आपल्या नवऱ्याला बळ पुरवताना दिसते. तिचे हे असले आचरट विचार ऐकताना कॉलेजातल्या मुली तिची हुर्यो उडवताना दिसतात. तिचा नवरा ज्या पक्षासाठी काम करतो, त्या पक्षाला पुढे उठावात यश मिळतं आणि त्या पक्षाची सत्ता येते. कॉलेजं बंद होतात. स्त्रियांना बळजबरीनं घरात बसवलं जातं. मुलं पैदा करण्याच्या कामी जुंपलं जातं. सत्तेमध्ये तर त्यांना स्थान नसतंच, पण साधं अक्षरवाचनही करण्याची परवानगी नसते. ते केल्यास अमानुष छळ, अवयव कापण्यासारख्या निर्घृण शिक्षा इत्यादी परिणाम भोगावे लागतात. या सर्वंकष सत्तेच्या स्थापनेत मोलाची कामगिरी बजावलेली सेरेना एकदा जाहीरपणे बायबल वाचते. त्याची शिक्षा म्हणून तिची एक करंगळी छाटण्यात येते. इंदुरीकर आणि रामतीर्थकर या लोकांची चेष्टा करताना आणि इतरत्र फिरणारे त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ खिदळून डीलीट करताना मला ही सेरेना आठवल्यावाचून राहत नाही. 


पार्श्वभूमीला आज - एकविसाव्या शतकाची वीस वर्षं झाली, तरीही - ‘मुलगा हवा’ या अट्टाहासापायी ढासळलेलं भारतातलं - तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रातलंही - लिंगगुणोत्तर असतं. पाळीच्या काळात देवळात प्रवेश करण्यासाठी आजही द्यावा लागणारा न्यायालयीन लढा आणि तो लढा जिंकूनही आलेलं हताश अपयश असतं. बलात्कार होऊन नको असतील, तर वेळेत घरी यावं अशा आशयाचे, वरकरणी माझ्या सुरक्षिततेची चिंता केल्याचं दाखवणारे, पण माझ्या स्वातंत्र्यावर संभावितपणे गदा आणू पाहणारे तथाकथित सुशिक्षित पुरुषांनी दिलेले सल्ले असतात, शहाबानो असते, रूपकुंवर असते, पर्युषणकाळात जीव गमावलेली आराधना असते.
मला वाटते भीती. 


तुम्हांला माझी भीती अनाठायी वाटते आहे? तुम्ही स्वतःला सुसंस्कृत आणि सुधारलेले मानता? तुमच्या घरात स्त्रीचा अपमान होत नाही, स्त्रीपुरुषसमानता पाळली जाते, असं मानता? 
मग मी काही प्रश्न विचारते. ते प्रश्न तुम्हांला कदाचित अतिरेकी आधुनिक वाटतील. पण क्षणभर थांबून असा विचार करा, की याच प्रश्नात स्त्रीच्या जागी पुरुष असता, तर तुम्हांला तसं वाटलं असतं का? कदाचित असं वाटेल, की ही काही स्त्रीवादाची लक्षणं नव्हेत. तर ही स्त्रीवादाची व्यवच्छेदक लक्षणं नव्हेत, हे मलाही ठाऊक आहे. मलाही ठाऊक आहे, की लिंगभेद विसरून अस्सल-जिवंत-न्यायी माणूसपणाकडे प्रवास करायला मदत करतो, तो स्त्रीवाद. तो आत्मसात करायचा असेल, तर स्वतःला अनेक सखोल प्रश्न विचारावे लागतात. त्यांची निर्भय आणि खरीखरी उत्तरं द्यावी लागतात. असंही वाटेल, की हे प्रश्न तद्दन वरवरचे आणि ढोबळ आहेत. वा ग्रामीण वा दलित स्त्रीला याहून कितीतरी भयानक तीव्रतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. हे सगळं खरंच आहे. पण तितक्या सर्वस्पर्शी मांडणीकडे जाण्यापूर्वीची एक लहानशी चाचणी म्हणून या प्रश्नांकडे पाहा. त्यांची कोणतीही आदर्श अशी उत्तरं नाहीत. या प्रश्नांची उत्तरं स्वतःला देताना, तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारा - की आपलं उत्तर स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही बाबतीत समान न्याय करणारं आहे का? जर नसेल, तर का नाही? 
तुमच्या घरी पाळीबद्दल मोकळेपणानं बोललं जातं का? की ती लपवाछपवी करण्याची बाब आहे?
तुमच्या घरी दुचाकी वा चारचाकी कुणाच्या मालकीची आहे, तसंच ती कोण चालवतं आणि कोण शेजारी वा मागे बसतं?


तुमच्या घरी पोळ्या किंवा भाकऱ्या कोण करतं?
तुमच्या घरी बॅंकेबाबतचे, आर्थिक गुंतवणुकीबाबतचे निर्णय कोण घेतं? 
तुमच्या घरी मुलं असतील, तर मुलांच्या प्रगतिपुस्तकावर सही कोण करतं? 
तुमच्या घरी ‘नवरा भांडी घासतोय’ हे वाक्य ऐकून हसू येतं का तुम्हांला? 
तुमच्या घरी जेवायला कोण कुणाला वाढतं? 
तुमच्या घरी  सकाळचा पेपर आधी कोण वाचतं?
तुमच्या घरी बायका मैदानी खेळ खेळतात का? 
तुमच्या घरातल्या बायका हॉलमध्ये किंवा पुढच्या खोलीत संध्याकाळी लोळत टीव्ही बघतात का? 
तुमच्या घरी बायकांनी घरी येण्याची आणि पुरुषांनी घरी येण्याची सर्वसाधारण आणि योग्य वेळ कोणती मानली जाते? इंदुरीकर महाराज आणि रामतीर्थकर बाई यांना हसता-हसता नकळत तुम्हीही त्यांच्या विचारसरणीला थोडा पाठिंबा तर देत नाही ना?  असो. पाहा बा आपापल्या उत्तरांचा विचार करून. मला जसं या समाजात वावरायचं आहे, तसं तुम्हांला, तुमच्या कुटुंबातल्या स्त्रियांना-मुलींना, तुमच्या जीवश्च-कंठश्च मैत्रिणींना आणि तुमच्या पोराबाळांनाही याच समाजात वावरायचं आहे. सगळे मिळून विचार करू या.

 

मेघना भुस्कुटे, ठाणे

meghana.bhuskute@gmail.com

बातम्या आणखी आहेत...