आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहबूबा फॅक्स-फोन-ईमेलने रात्री 8:30 पर्यंत सत्तेचा दावा करत राहिल्या,राज्यपालांनी 9 वाजता केली विधानसभा बरखास्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवटीच्या ५ महिन्यांनी बुधवारी सरकार स्थापण्याच्या हालचालींना वेग आला. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्तींनी राज्यपाल एस.पी. मलिक यांना लिहिले - काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर आमच्याकडे ५६ आमदार आहेत. सरकार स्थापू इच्छितो. यानंतर राज्यपालांनी विधानसभाच बरखास्त करून टाकली. म्हणजे आता ६ महिन्यांत निवडणुका घ्याव्या लागतील. पीडीपीने कोर्टात जावे, असा सल्ला काँग्रेसने दिला. जूनमध्ये पीडीपीचा पाठिंबा काढून भाजप सत्तेबाहेर गेली होती. राज्यपाल राजवट १९ डिसेंबरला संपणार होती. 

 

१९ तारखेला मोदी, २० ला शहांना भेटले होते राज्यपाल
१९ नोव्हेंबरच्या रात्री राज्यपाल एस.पी. मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि २० ला भाजपाध्यक्ष अमित शहांची भेट घेतली होती. दरम्यान, राम माधव हे सज्जाद लोन यांना भाजपचा पाठिंबा देऊ इच्छित होते. मात्र पक्षाने नकार दिला. इतर कोणत्याही पक्षाला जुळवाजुळव करून सरकार स्थापन न करू देण्याचा निर्णय झाला. बुधवारी पीडीपी, काँग्रेस आणि नॅ.कॉ.मध्ये आघाडीच्या हालचाली सुरू होताच त्यांचा सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले. 

 

कोर्टात गेल्यास राज्यपालांचा फैसला फिरवला जाऊ शकतो
२०१६ मध्ये उत्तराखंडात ३६ पैकी ९ काँग्रेस आमदार बंडखोर झाले होते. राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. मात्र शक्ती परीक्षणाच्या एका दिवसाआधी राष्ट्रपती राजवट लागू केली. सरकार बहाल करत हायकोर्ट म्हणाले, ही अराजकता आहे. असेच २००५ मध्ये बिहारमध्ये घडले होते. राज्यपाल बुटासिंह यांनी विधानसभा भंगची शिफारस केली. मात्र, सुप्रीम कोर्ट म्हणाले होते, विधानसभा भंग करणे असंवैधानिक हाेते.

 

९ तासांचा घटनाक्रम|पीडीपी-काँग्रेस-एनसी एकत्र येण्याची तयारी, मेहबूबांनी सरकार स्थापण्याचा केला दावा, पण सर्व निष्फळ

 

> दुपारी १२ वा. : अाघाडीची खलबते
पीडीपीच्या अल्ताफ बुखारी यांनी उमर अब्दुल्लांसोबत चर्चा केली व एक-दोन दिवसांत खुशखबरी देऊ, असे म्हटले. यानंतर सीपीएम नेते एम.वाय.  तारीगामी यांनी उमर यांच्यासोबत चर्चा केली. 

 

> ३ वा.: राज्यपालांचे वक्तव्य
राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, कुठल्याही पक्षाने सरकार स्थापण्याचा दावा केला नाही. काही वेळानंतर एनसी आणि काँग्रेस पीडीपीला समर्थन देण्यासाठी तयार झाले.

 

> ६ वा.: मुफ्तींचे राज्यपालांना पत्र
मुफ्तींनी राज्यपालांना पत्र लिहिले. त्यात काँग्रेस,नॅशनल कॉन्फरन्स समर्थनास तयार असल्याचे बातम्यांमधून कळले असेलच. मी सरकार स्थापण्याचा दावा करू इच्छिते. भेटण्याची वेळ द्यावी, असे नमूद केले. 

 

> ८ वा.: सज्जाद लाेन यांचा दावा
पीडीपीत बंड झाल्याच्या बातम्या समोर आल्या. दोन आमदारांचे पक्ष असलेल्या सज्जाद लोन यांनी भाजपच्या २५ आमदारांचे समर्थन असल्याचे सांगत सरकार स्थापण्याचा दावा केला.

 

> 8:30 वा. : मेहबूबांचे ट्विट
मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केले - ‘राजभवनाला पत्र पाठवण्याचा प्रयत्न करतेय. तेथे फॅक्स रिसीव्ह होत नाही आहे. ईमेलही झाले नाही. फोन करण्याचा प्रयत्न करतेय, तो कुणीच उचलत नाही.’

 

> 9 वा. : विधानसभा भंग केली
राजभवनाला मेहबूबांचे पत्र मिळाले नाही. राज्यपाल मलिकांनी कलम ५३ चे उपकलम -२ च्या ब तरतुदीअंतर्गत अधिकारांनुसार विधानसभा भंग करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...