expansion of cabinate / भ्रष्टाचाराच्या आराेपामुळे मेहतांना डच्चू; अकार्यक्षमतेमुळे ५ मंत्र्यांना घरचा रस्ता

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या सहा मंत्र्यांच्या हाती नारळ; नव्या चेहऱ्यांना दिली संधी

दिव्य मराठी

Jun 17,2019 09:44:00 AM IST

नागपूर - विधानसभा निवडणुकीला चार महिने बाकी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याच पक्षाच्या सहा मंत्र्यांना डच्चू देऊन अधिवेशनाच्या तोंडावर आक्रमक विरोधकांच्या भात्यातील हवाच काढून घेतली. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील असूनही प्रकाश मेहता या कॅबिनेट मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आराेपामुळे पद गमवावे लागले. तर राजकुमार बडाेले, विष्णू सावरा या ज्येष्ठ मंत्र्यांना अकार्यक्षमता भाेवली, असाच निष्कर्ष राजकीय वर्तुळातून काढला जात आहे. यापूर्वी भ्रष्टाचाराच्या आराेपावरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाचा पक्षाने राजीनामा घेतला हाेता, त्यापाठाेपाठ आता आणखी सहा जणांना फडणवीस यांनी घरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे, निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचाही प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केल्याचे मानले जाते. दरम्यान, ‘पक्षसंघटनेत काम करण्यासाठी या मंत्र्यांनी स्वत:हून राजीनामा दिले आहेत,’ अशी सारवासारव अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.


प्रकाश मेहता
गृहनिर्माण खात्याचे मंत्री प्रकाश मेहता हे पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील मानले जातात. गुजराती समाजातून प्रतिनिधित्व करत असलेले मेहता कायम वादात राहिले. अलिकडेच त्यांच्यावर मुंबईतील एमपी मिल कम्पाउंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवला. विरोधी पक्षांना त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आयते कोलीत मिळाले. त्यामुळे त्यांना बाजूला सारण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजकुमार बडोले
सामाजिक न्याय या महत्त्वाच्या खात्यावर बडोले यांना पकड निर्माण करता आली नाही. सरकारची भूमिका मांडताना डॉ. बडोले यांना फारशी आक्रमकता तर दाखवता आलीच नाही, शिवाय खात्याचे सचिव ऐकत नसल्याची अत्यंत हतबल भूमिका त्यांच्याकडून मांडली जायची. खात्यात नावीन्यपूर्ण योजनांचा विचारत होत नसल्याचीही ओरड सुरू होती. त्यामुळे बडोले यांना बाजूला सारण्यात आले.

अंबरीशराजे आत्राम
अत्यंत अकार्यक्षम मंत्री म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री अंबरीशराजे आत्राम यांची प्रतिमा निर्माण झाली होती. आदिवासी विकास व वन विभागाची जबाबदारी असलेल्या आत्राम यांच्याबद्दल स्थानिक स्तरावरही मोठी नाराजी होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने गडचिरोली जिंकले असले तरी आत्राम यांच्या अहेरी मतदारसंघात भाजपची मोठी पीछेहाट झाली. त्यामुळे आत्राम यांना वगळण्याचा निर्णय.


विष्णू सावरा
आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी सावरा यांच्याकडे हाेती. पक्षात ज्येष्ठ असूनही त्यांच्या कामगिरीबाबत मात्र पक्ष व मुख्यमंत्री समाधानी नव्हते. आदिवासी विकास खात्याच्या योजना आक्रमकपणे राबवून कामाचा ठसा उमटवण्यात सावरा यांना सातत्याने अपयश आल्याचे मानले जाते. विविध प्रसंगांमध्ये सरकारची बाजू खंबीरपणे मांडण्यातही त्यांना फारसे यश येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला.


दिलीप कांबळे
सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून दिलीप कांबळे वाइन शॉप परवान्याच्या जुन्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्याचे विरोधकांच्या रडारवर होते. नेमकी हीच बाब त्यांना डच्चू देण्यासाठी पुरेशी ठरली असली तरी कांबळे यांना खात्यात कामाची छाप पाडता आली नाही. याशिवाय या खात्याचे कॅबिनेट मंत्री डॉ. बडोले यांच्याशी त्यांचे सूर जुळत नव्हते. त्यामुळे या खात्यातील दाेन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी घरचा रस्ता दाखवला.


प्रवीण पोटे
उद्योग, खनिकर्म, सार्वजनिक बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेल्या प्रवीण पोटे यांना आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात संबंधित खात्यांच्या कारभारामध्ये कामाचा ठसा उमटवता आला नाही. त्यामुळे त्यांना वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे मानले जाते. पश्चिम विदर्भात त्यांच्या तुलनेत अनुभवी आमदार अनिल बोंडे यांना संधी देण्याचे निमित्तही मुख्यमंत्र्यांनी साधले, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


X