आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशातील खाम्बरा गँगच्या सदस्यास पुसदमधून केले जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- अनेक राज्यातील ट्रक चालक व वाहकाचा खून करून ट्रकमधील मुद्देमाल लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील कुख्यात खाम्बरा गँगच्या एका सदस्याला पुसदमधून अटक केली. ही कारवाई रविवार,९ सप्टेंबर रोजी एलसीबी पथकाने पार पाडली. जितेंद्र उर्फ पिंटू किसन राठोड, वय ४७ वर्षे रा. कोपरा, ह. मु. ग्रीन पार्क, पुसद अशी आरोपीचे नाव आहे.  


मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ट्रक चालक व वाहकाचा खून करून त्यांचे मृतदेह फेकून ट्रकमधील मुद्देमालाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी आजपर्यंत २२ खुनाचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात नोंदवले आहेत. अशीच काहीशी घटना काही महिन्यापूर्वीच पुण्यात घडली. पुण्यावरून निघालेला ट्रक गायब झाल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील मिसरोट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.


 या प्रकरणात कुख्यात टोळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी ह्या कुख्यात टोळीचा प्रमुख आदेश खाम्बरा रा. खिरीजा मोहल्ला, भोपाल, जयकिसन प्रजापती रा. बारीगड, भोपाल आणि तुकाराम राठोड रा. कापरा पुसद जी. यवतमाळ यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती. 


त्यावेळी ह्या प्रकरणातील आरोपींनी जवळपास १२ गुन्ह्यातील १४ ट्रक चालक व वाहकाचे खून केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली होती. तर मध्य प्रदेशात घडलेल्या जवळपास सहा गुन्ह्यात सहभाग असलेला ह्या कुख्यात टोळीचा सदस्य जितेंद्र उर्फ पिंटू राठोड हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी असल्याने तो मध्य प्रदेश पोलिसांना त्यांच्या गुन्ह्यात आवश्यक होता. त्यावरून मध्य प्रदेश पोलिस महासंचालक यांच्याकडून यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना माहिती मिळाली होती. दरम्यान, एलसीबी प्रमुख मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक नीलेश शेळके यांच्या पथकाने रविवार, ९ सप्टेंबर रोजी पुसद गाठून जितेंद्र उर्फ पिंटू राठोड याला ताब्यात घेतले. 


तद्नंतर आज, १० सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील मिसराट पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक संजीव चौकशे यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव, एलसीबी प्रमुख मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पथकातील गोपाल वास्टर, मुन्ना आडे, यांनी पार पाडली. 


अशा पद्धतीने करत होते ट्रक चालकाचा खून: मध्य प्रदेशातील कुख्यात आदेश खाम्बरा याची टोळी ट्रक चालकाला सर्वप्रथम त्याचा माल विकून देण्याचे आमिष दाखवून त्यांना जेवणाची पार्टी देऊन जेवणात झोपेच्या गोळ्या टाकत होते. त्यानंतर त्यांना ट्रकमध्ये सोबत नेऊन त्यांचा खून करून ट्रक पळवून नेत असल्याची विश्वसनीय माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...