आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊसग्रस्तांना मदत न दिल्याने विरोधकांचा सभात्याग; ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नियम २९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या चर्चेत अवकाळी पाऊसग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला नसल्याचा निषेध करीत विरोधी पक्ष भाजपने सभात्याग केला. विरोधी पक्षाने नियम २९३ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा विषय उपस्थित करताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडवाहू पिकासाठी २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी तर अजित पवार यांनी एक लाख आणि दीड लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे काय झाले या प्रश्नासह अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर सभात्याग केला.

सरकारतर्फे कुणीही बोलले नाही

सरकारतर्फे या विषयावर काहीही भाष्य केले नाही. त्यावर बोलताना विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी, अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही २५ हजारांची मदत देण्यात आलेली नाही. त्यांना पैसे कधी देणार असे प्रश्न आम्ही विचारले परंतु त्याबाबत सरकारने आश्वासनही दिले नाही. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी आहे. या कर्जमाफीने शेतकरी कर्जमुक्त सोडाच, चिंतामुक्तही होऊ शकत नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. या कर्जमाफीवर मंत्र्यांचाच आक्षेप आहे. बच्चू कडू म्हणतात, ही कर्जमाफी एक बुजगावणे आहे. जखम गुडघ्याला आणि उपचार ढोपराला, असेही ते म्हणालेत. असे म्हणत सरकारचा निषेध विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.