आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेची आठवण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


डिसेंबर महिना संपला की संक्रांतीची चाहूल लागते. मला बालपणीची एक गोष्ट आठवते. संक्रांतीच्या वेळी आम्ही दोघीतिघी मिळून हलव्याचे दागिने तयार करत होतो. मुरमुरे, लवंग, तीळ, साबुदाणा आदी वस्तूंचा वापर करून त्याचा हलवा बनवत होतो. नंतर पुठ्ठे आणून त्याचे विविध आकार कापून ठेवत होतो. कंबरपट्टा, टोप, बाजूबंद, फुलांच्या पाकळ्या अशा प्रकारचे दागिने यापासून तयार करत होतो. हे दागिने ज्यांनी मागितले त्यांना भाड्याने अथवा विकत देत होतो. पूर्वी या दागिन्यांना फार महत्त्व होते. नवीन लग्न झालेल्या लेकीचे अथवा सुनेचे कोडकौतुक होत असे. ओळखीपाळखीच्या लोकांकडे जाऊन दागिन्याने त्यांच्या लेकीसुनांना सजवत होतो. काळी साडी नेसलेल्या लेकीसुना पांढ-या शुभ्र हलव्याच्या दागिन्यात फार खुलून दिसत.

मला दागिने बनवताना जी मेहनत, काही वस्तूंचा कलात्मक वापर करताना मैत्रिणीबरोबर सहकार्याची भावना निर्माण झाली. तो अनुभव आजही संक्रांतीचा सण आला की आठवतो. सातवी-आठवी वर्गात असल्यापासून आम्ही तिघी मैत्रिणी मिळून हलव्याचे दागिने बनवत होतो. माझे लग्न झाले तेव्हा माझ्यासाठी विविध प्रकारचे दागिने मी स्वत:च तयार केले होते. हे सर्व दागिने घालून फोटोही काढले.आता माझ्या मुलांचे लग्न झाले तेव्हा माझ्या सुनेसाठीही हलव्याचे दागिने मी स्वत: मेहनत घेऊन बनवले.कित्येक वेळा लोकांनी तातडीची गरज भासल्याने माझ्याकडे येऊन दागिने बनवून देण्याविषयी आग्रह केला. मीही त्यांची निकड ओळखून सहकार्य केले.माझी कला लोकांच्या उपयोगी येते हा आनंद औरच असतो.