आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी लैंगिक समानतेचा आदर करावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रीतीश नंदी (ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट निर्माता) भारतात मुलींसाठी आयुष्य सोपे नाही. कर्तृत्व गाजवणारी महिला होणे तर आणखीच कठीण आहे. तुम्ही पुरुष नसाल तर हे जग म्हणजे सर्वात धोकादायक जागा आहे, असेही अनेकदा म्हटले जाते. भारतात लैंगिक विभाजन खूपच जास्त आहे. अर्थात, हळूहळू ते बंद होऊ शकते. जेथे लैंगिक गुन्ह्यांच्या बातम्या रोज सकाळी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर असतात अशा देशात हजारो महिला अपमान गिळून राहण्यास शिकल्या आहेत. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्यांना वाटते. पुरुष सैनिक महिलांना स्वीकारण्यास तयार नसल्याने त्या कमांडिंग पदांसाठी उपयुक्त नाहीत, असे अलीकडेच सरकारने लष्करात महिलांना जास्त समानता देणाऱ्या याचिकेवर उत्तर देताना सुप्रीम कोर्टात म्हटले होते. वेगवेगळ्या शारीरिक मानदंडांमुळे आघाडीवर तैनातीसाठी महिला आणि पुरुष यांना समान मानता येत नाही, असाही तर्क देण्यात आला. कुटुंबाला असणारी गरज, युद्धकैदी होण्याची भीती आणि युद्धकाळात महिला अधिकारी ही जबाबदारी पार पाडू शकतील की नाही याबाबतचा संशय अशा अनेक कारणांमुळे त्या या कामासाठी उपयुक्त नाहीत, असे म्हटले गेले. सुदैवाने न्यायालयाने हे लैंगिक भेदभाव करणारे तर्क फेटाळून लावले आणि आता पुरुषांप्रमाणेच महिलाही कायमस्वरूपी कमिशन मिळवू शकतील, असा आदेश दिला. न्यायमूर्तींनी म्हटले की, ‘लैंगिक आधारावर क्षमतांबाबत संशय व्यक्त केल्यामुळे फक्त महिला म्हणून नव्हे, तर भारतीय लष्कराच्या सदस्य म्हणूनही त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का बसला आहे.’ या ऐतिहासिक निकालामुळे आपल्या लष्करात महिलांच्या संख्येत सध्याच्या चार टक्क्यांच्या तुलनेत चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात शोपीस म्हणून सादर होण्याऐवजी महिला अधिकाऱ्यांना पुरुषांंप्रमाणेच पदोन्नती, रँक, फायदे, पेन्शन मिळू शकेल. पण आपले पूर्वग्रह सोडतील तर ते पुरुष कसले? त्यामुळेच एक जागतिक महाशक्ती होण्याच्या मार्गावर आहोत असा दावा करूनही भारत यूएनडीपीच्या लैंगिक असमानता निर्देशांकात १६२ देशांत १२२ व्या स्थानी आहे. चीन, म्यानमार आणि श्रीलंकाही आपल्या पुढे आहेत. आपण महिलांबाबत कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतो हे रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या अलीकडच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. त्यांच्या मते, घटस्फोट जास्त शिकलेल्या आणि संपन्न कुटुंबात होतात ‘कारण शिक्षण आणि पैशामुळे अहंकार येतो आणि त्यामुळे कुटुंबं विभाजित होतात.’ ही मानसिकता बदलायला हवी. ज्या समाजात महिलांना सर्वार्थाने कमी लेखले जाते तेथे शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य यामुळे महिलांना बरोबरीच्या दर्जावर दावा करता येणे शक्य होते. भागवत त्याला संपन्नता म्हणतात. गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो महिला सामाजिक टीकेचा भडिमार होईल या भीतीमुळे एका प्रेमहीन आणि असमाधानी विवाह संबंधांत अडकलेल्या आहेत. लग्न कोणाशी करायचे हे ठरवण्यात महिलांच्या इच्छेचा विचार केला जात नाही अशी परंपरा असलेल्या भारताच्या भागांत हे घडत आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यच लग्न ठरवतात, त्यात प्रेमाला स्थान नसते. लग्नानंतरच प्रेम व्हावे अशी आपल्याकडे सर्वसाधारण मान्यता आहे. आता बहुतांश महिला आपला अधिकार दाखवून देत आहेत हे खरे आहे. त्या आपल्या पसंतीचा जोडीदार निवडत आहेत तसेच जात, समुदाय, गोत्र यांचा विचार करून लग्न करण्यासही नकार देत आहेत. एवढेच नाही तर लग्न करणे आवश्यकच आहे ही भूमिकाही त्या नाकारत आहेत.   स्वत:बद्दल अभिमान वाटावा म्हणून जास्तीत जास्त महिला करिअरची निवड करत आहेत. ज्यांना वैवाहिक आयुष्य पुढे सुरू ठेवायचे नाही त्या त्याचा त्याग करून आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करत आहेत आणि ज्या आनंदापासून आणि बरोबरीचा दर्जा मिळण्यापासून वंचित करण्यात आले होते तो त्या मिळवत आहेत. समाज काय म्हणेल या गोष्टीची भीती त्यांना वाटत नाही. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे  जोडीदार निवडण्याचा अधिकार त्यांना मिळाला आहे. त्याला दंभ म्हणता येणार नाही.   घटस्फोट होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण ज्या वैवाहिक आयुष्यात आता मुळीच रस उरला नाही असे संबंध तोडून टाकण्याची भीती महिलांना वाटत नाही हे त्याचे कारण. त्यांच्या दृष्टीने घटस्फोट म्हणजे स्वातंत्र्याचा एक मार्ग आहे. ज्या नोकरीत समाधान मिळत नाही ती सोडून यशस्वी होण्याच्या जास्त संधी असलेली दुसरी नोकरी मिळवण्यासारखा हा प्रकार आहे. स्वत:ला वाचवण्याच्या भावनेतून हा प्रकार होतो, दंभामुळे नाही.  मासिक पाळीचे वय असलेल्या महिलांना मंदिरात जाण्यापासून पुरुष रोखतात त्याला दंभ म्हणतात. विधवांचा सामाजिकदृष्ट्या तिरस्कार केला जातो त्याला दंभ म्हणतात. हुंडा न आणल्याने विवाहितांना जाळले जाते त्याला दंभ म्हणतात. एका आधुनिक कार्यस्थळी संधी आणि वेतनात असमानता आणि महिलांबाबतची वर्तणूक म्हणजे दंभ. अमेरिकन निर्माता-दिग्दर्शक विन्सटीनचे प्रकरण हे त्याचे उदाहरण आहे.  लैंगिक समानतेचा लढा पुढेही सुरू राहील. वास्तवात त्याला आणखी गती येईल. पुरुषांना आता समानतेची वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. जी कामे पुरुष करू शकतात ती महिलाही करू शकतील आणि तीही आपल्याला जाब विचारला जाईल किंवा शिक्षा मिळेल अशी भीती त्यांना वाटणार नाही असा सामाजिक बदल आपल्याला घडवावा लागेल. 

बातम्या आणखी आहेत...