पोलिसांच्या तावडीतून पळून / पोलिसांच्या तावडीतून पळून मनोरुग्णाची विहिरीत उडी

divya marathi team

May 28,2011 04:49:57 PM IST

राजापूर - घातक मनोरुग्णाला रत्नागिरीतील मनोरुग्णालयात घेऊन येत असताना ओणी येथे गाडीतून पळून जाऊन त्याने पन्नास फुट विहिरीत बेधडक उडी मारली. यामध्ये मनोरुग्ण गंभीर जखमी झाला.

राजेंद्र वसंत माळवदे (वय 42, रा. तळेबाजार, देवगड, जि. सिंधुदुर्ग) असे मनोरुग्णाचे नाव आहे. त्याला देवगड न्यायालयाने घातक मनोरुग्ण जाहीर करून त्याला तत्काळ रत्नागिरी मनोरुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. महामार्गावर वाहनांसह प्रवाशांचीही वर्दळ होती. त्यामुळे देवगड पोलिसांनी गाडीचा वेग कमी केला. त्याचा फायदा घेत मनोरुग्ण राजेंद्रने गाडीतून उडी मारत पळ काढला.

मनोरुग्णाला पकडण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. त्याचा पाठलाग सुरू झाला. नेमके काय चालले आहे हे पाहण्यासाठी अनेकांनी त्यांच्यामागून धाव घेतली. तलाठी कार्यालयाच्या दिशेने धावणाऱ्या मनोरुग्णाने या कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सुमारे पन्नास फूट उंचीच्या सार्वजनिक विहिरीमध्ये बेधडक उडी मारली मनोरुग्ण गंभीर जखमी झाला.

मनोरुग्ण राजेंद्र माळवदे याला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू केल्यानंतर त्याला शुद्ध आली. तेव्हा त्याने जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना दिलेले उत्तर मजेशीर होते. "मला इकडे का आणले. तुम्हाला मी काय वेडा वाटलो! वेड्यासारखे वागू नका, मला सोडून द्या.''

X
COMMENT