आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडूच्या रंगरेषांतून, शेरोशायरीतून सामाजिक सौहार्दाचा संदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत- खडूच्या रंगरेषांतून धार्मिक, सामाजिक सौहार्द वाढवणारे संदेश रयत शिक्षण संस्थेच्या राशीन येथील जगदंबा विद्यालयातील कलाशिक्षक मझहर सय्यद देत असतात. त्यांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. 


मजहर सय्यद यांनी आर्ट टिचर डिप्लोमा केला आहे. त्यांनी काही काळ अल्प मानधनावर एका खासगी स्टुडिओत कामही केले. के. के. आर्टस, पुणे, आग्रा येथे त्यांचे चित्र प्रदर्शन झाले आहे. सन २००३ मध्ये ते रयत शिक्षण संस्थेत कलाशिक्षक म्हणून रूजू झाले. विद्यालयात राष्ट्रीय सण असो, धार्मिक सण असेल किंवा थोरांची जयंती, पुण्यतिथी असेल तेव्हा सय्यद फळ्यावर खडूच्या साह्याने सुंदर चित्र रेखाटतात. चित्राला समर्पक असे काव्यलेखन, शेरोशायरी ते करतात. चित्र पाहणारे सर्वजण त्यांची वाहवा करतात. 


सय्यद हे आपल्या चित्रातून समाज प्रबोधनही करतात. जगदंबा विद्यालयाच्या दर्शनी भिंतीवरील फळ्यावर त्यांनी बाल कामगार या सामाजिक प्रश्नावर चित्रांतून प्रबोधन केले होते. निरागस बालकाच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू कामाला लावता बाळा, डोळ्यात येती अश्रू, बाल कामगार कायदा नका विसरू या पंक्तींनी अधोरेखीत केले होते. त्याच्याच बाजुला तंबाखू सेवनाने कर्करोग होतो, अशा हे सांगणारे चित्र होते. तरूणाच्या चेहऱ्यावर कर्करूपी राक्षस मजकुरासह अधोरेखित केला होता.आषाढी एकादर्शी, रमजान ईद, दिवाळी अशा निमित्ताने सय्यद राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागून सर्व समाजाला अंतर्मुख करणारे संदेश देतात. राष्ट्रपुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला त्यांचे चित्र रेखाटून त्यांच्या महान कार्य शब्दांत व्यक्त करतात. 


मुख्यमंत्री थक्क झाले... 
छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जतला आले होते. सय्यद यांनी त्यांचे हुबेहुब चित्र पेन्सिलीने काढले होते. मुख्यमंत्री त्यांची कला पाहून थक्क झाले. सय्यद यांच्या चित्रांची प्रदर्शने ग्रँड हॉटेल (आग्रा), वाय. बी. चव्हाण आर्ट गॅलरी (मुंबई), बालगंधर्व रंगमंदिर (पुणे), रोटरी क्लब (नगर) येथे झाली आहेत. कॅनव्हास पेंटिंग, सिरॅमिक लॅँडस्केप, सिरॅमिक पॅट्रीज, स्टेन ग्लास, फायबर म्युरल, रिफोरेक्स म्युरल, ऑईलपेंट लँडस्केप, वॉटर कलर पोट्रेट आदी माध्यमे त्यांनी हाताळली आहेत. बोलक्या भिंती प्रकल्प व बॅल्क बोर्ड पेंटींग त्यांनी केले आहे. शासकिय ग्रेड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे. अनेक हौशी मंडळी त्यांच्याकडून आपले पेन्सिल चित्र काढून घेतात. 

बातम्या आणखी आहेत...