आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मराठवाड्यातील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६०० कोटींचा अपहार झाल्याचा आरोप शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केला. त्यानंतर सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली. पंकजा मुंडे समर्थक आदित्य सारडा हे सध्या या बँकेचे चेअरमन आहेत.
आमदार विनायक मेटे गुरुवारी म्हणाले, बीड जिल्हा बँकेत शेतकऱ्यांकडून पीक कर्ज भरून घेण्यात आले.
मात्र शेतकऱ्यांनी जमा केलेले कर्जाचे पैसे बँकेने कर्ज खात्यात जमा केलेले नाहीत. पीक कर्ज बँक खात्यावर तसेच असून शेतकरी कर्जमाफीतून ते कर्ज बँक अधिकारी माफ करून घेण्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
हा घोटाळा किमान ५०० ते ६०० कोटींच्या घरात आहे. मोठी अनियमितता झाली आहे, हे बँक व्यवस्थापकांनी मान्य केलेले पत्र आपल्याकडे आहे, असे सांगून मेटे यांनी पत्र सभागृहात दाखवले. एसआयटी चौकशीची मागणीही केली. त्यावर याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करू, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.
तूर विक्रीचीही होणार चौकशी
बीड जिल्ह्यातील काही सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना त्यांच्या तुरी विकलेले पैसे परस्पर सोसायटीत जमा केले होते. हा प्रकार बेकायदा होता. या प्रकाराचीसुद्धा बीड जिल्हा बँकेतील घोटाळ्याबरोबरच संयुक्त चौकशी करण्यात येईल, असे मंत्री पाटील म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.