आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: मेटे यांचे गर्दीचे राजकारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे आपल्या पक्षाचा १७ वा वर्धापन दिन औरंगाबादमध्ये साजरा करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यानिमित्ताने ६ जानेवारीला ते शहरात राज्यभरातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा ‘निर्धार’ मेळावा घेणार आहेत. कसला निर्धार त्यांना या मेळाव्यात करायचा आहे? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मेटे यांची सध्याची नाराजीची भाषा लक्षात घेतली तर भाजपप्रणीत महायुती सोडण्याचा निर्धार ते या मेळाव्यात करतील, अशी शक्यता आहे. त्याआधी त्यांनी बीड जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला दिलेला पाठिंबा काढून घ्यायचा इशारा दिलाच आहे. उद्या, म्हणजे २५ डिसेंबरला दुपारी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबराेबर बैठक होते आहे. त्या बैठकीत मेटे यांचे समाधान झाले तर ते महायुतीत राहतील आणि बीड जिल्हा परिषदेतही भाजपचा टेकू कायम ठेवतील. पण ती शक्यता कमीच दिसते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते भाजप सोडण्याची घोषणा करू शकतात, असा अंदाज आहे.

 

भारतीय जनता पक्षाविरोधात देशभर समविचारी पक्षांना एकत्र करण्याची माेहीम जोरात सुरू आहे. त्या मोहिमेचा भाग म्हणून शरद पवार आणि इतरही नेते राज्यातल्या लहान मोठ्या नाराज पक्षांची मोट बांधण्याच्या कामाला लागले आहे. त्याच  मोहिमेत मेटे त्यांच्या गळाला लागले असण्याची शक्यता आहे. म्हणूनच २५ डिसेंबरच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून फारसे काही साध्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्या जरी मेटे यांनी बीड जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढलेला नसला तरी तो ते फार काळ टिकवून ठेवण्याची शक्यताही नाही. 

 

विनायक मेटे २०१६ मध्ये विधान परिषदेवर भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले आहेत. त्या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेस कडून आणि त्याआधी भारतीय जनता पक्षाकडूनच विधान परिषदेवर निवडून गेले होते. पण त्या त्या पक्षाची सत्ता जाताना दिसली की मेटे तो पक्ष सोडतात आणि ज्या पक्षाला चांगले दिवस येण्याची शक्यता असते तिकडे जातात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यांची एकूण राजकीय कार्यशैली आणि भविष्याचा अंदाज घेण्याचा वकूब पाहिला तर त्यांच्या या हालचालींनी काही संकेत मिळू लागले आहेत, असाही अर्थ काढता येतो. ज्या वेळी त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्या वेळी भाजपने सत्ता गमावली होती. तोच अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हाचा आहे. मेटे यांनी पक्ष सोडला आणि आघाडी सरकारचा पराभव झाला. त्यामुळे ते आता भारतीय जनता पक्ष सोडण्याचा विचार करीत असतील तर येत्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष सत्तेत राहणार नाही, अशी शक्यता वर्तवता येऊ शकते. मेटे यांना राज्यात मंत्रिपद हवे आहे. ते दिले जात नाही ही मेटे यांची सर्वात मोठी नाराजी आहे. आता तर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही राहिलेली नाही. त्यामुळे तसाही मेटे यांना भारतीय जनता पक्षात रस राहिलेला नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीसाठी आपली ताकद दाखवणे आणि जोखणे या कामाला मेटे लागले आहेत. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि महादेव जानकर यांच्या पक्षाला मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद दिले. तसे ते शिवसंग्राम पक्षाला मिळाले नाही. मेटे यांना हा राजकीय अन्याय वाटतो. आपली ताकद भाजपला शेट्टी आणि जानकरांपेक्षा कमी वाटते आणि म्हणून आपल्याला मंत्रिपद दिले जात नाही याची मेटे यांना खात्री झालेली दिसते. त्यामुळे आपली ताकद दाखवण्याचाच एककलमी कार्यक्रम मेटंेनी सध्या चालवला आहे. ऊसतोड मजुरांचा मेळावा घेऊन त्यांनी आपली त्या क्षेत्रातदेखील  शक्ती  आहे हे दाखवण्याचा प्रयत्न दोन महिन्यांपूर्वी केला. ऊसतोड मजुरांचे नेतृत्व गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्यानंतर पंकजा मुंडेंकडे आले आहे. त्यामुळे पंकजा यांना अस्वस्थ करण्याचाही हेतू त्यातून साधला गेला. बीड जिल्ह्याच्या राजकारणात पंकजा निर्णय घेताना विनायक मेटे यांना विचारत नाहीत. जे काही करायचे ते त्या स्वत:च निर्णय घेऊन करतात. यासंदर्भात मेटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून पाहिली. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यानंतर त्यांनी सुमारे १० हजार महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटण्याचा मोठा कार्यक्रम केला. आता औरंगाबादच्या निर्धार मेळाव्याला किमान लाखभर लोक उपस्थित राहावेत असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ही आपली ताकद पाहून विद्यमान सत्ताधारी असोत अथवा भावी सत्ताधारी असोत, आपल्याला कमी जोखणार नाहीत, असे मेटे यांना वाटत असावे. पण ते तितके खरे नाही. कारण शरद पवार यांच्याशी असलेले मेटे यांचे संबंध हा नेहमीच त्यांच्या राजकारणाला जोखण्यातला एक प्रमुख आधार राहिलेला आहे. शरद पवारांनी सांगितले तर मेटे काहीही करू शकतात, असे त्यांचे कार्यकर्तेही मानतात. ही प्रतिमा जोपर्यंत बदलवण्यात मेटे यांना यश येत नाही तोपर्यंत कितीही मोठी गर्दी गोळा केली तरी त्यांचा त्यांना लाभ होण्याची शक्यता नाही.  

बातम्या आणखी आहेत...