आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Me Too: बीसीसीआय सीईओ जोहरींवरही आरोप, ओळख लपवत महिलेने सोशल मीडियाद्वारे केला आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मी टू मोहिमेची धग चित्रपट आणि राजकीय क्षेत्रानंतर आता क्रिकेटपर्यंत पोहाेचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावर आता लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. डिस्कव्हरी वाहिनीवर दक्षिण आशिया विभागाचे एमडी म्हणून कार्यरत असतानाच्या काळात जोहरी यांनी आपले लैंगिक शोषण केले होते, अशी तक्रार एका महिलेने केली आहे. ही महिला आपली ओळख सांगू इच्छित नसल्याने सोशल मीडियावर इतरांच्या माध्यमातून तिने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. 


जून २०१६ मध्ये जोहरी बीसीसीआयचे सीईओ झाले. मात्र, आजवरच्या त्यांच्या प्रवासात या प्रकारचे आरोप झालेले नव्हते. जोहरी यांना २०१३ मध्ये ब्रॉडकास्टिंग क्षेत्राच्या वतीने सीईओ आॅफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर २०१२ मध्ये प्रोफेशनल ऑफ द इयर पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. जोहरी बीसीसीआयमध्ये दाखल होण्यापूर्वी डिस्कव्हरीचे काम पाहत. या काळात या वाहिनीला अनेक सन्मान मिळाले. आयपीएलच्या मीडिया राइट््समध्ये ५५०% वाढ झाली होती. 


ऑटो क्षेत्रालाही लागण : टाटा मोटर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप, सक्तीच्या सुटीवर पाठवले 
टाटा मोटर्सचे चीफ कम्युनिकेशन्स अॉफिसर सुरेश रंगराजन यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. याचे स्क्रीनशॉट इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या तक्रारीत रंगराजन यांनी महिला सहकाऱ्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप करण्यात आहे. तथापि, याची चौकशी करण्यात आलेली नाही. दरम्यान, टाटा मोटर्सने ट्विटमध्ये म्हटले आहे की, टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. विशेषकरून महिलांचा सन्मान आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण करण्यावर विशेष लक्ष दिले जाते. कोणत्याही तक्रारीची आधी चौकशी करण्यात येईल. दरम्यान, रंगराजन यांना कंपनीने तूर्त सक्तीच्या सुटीवर पाठवले आहे. 


आलोकनाथ यांचा नंदांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा 
अालोकनाथ व पत्नी आशू यांनी लेखिका- दिग्दर्शिका विनता नंदाविरुद्ध स्थानिक न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी विनीता यांनी अालाेकनाथ यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. नाहक आरोपांमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे विनीता यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अालोकनाथ दांपत्याने याचिकेत केली. 


20 वर्षांपूर्वीचे प्रकरण 
अालाेकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी आपल्यावर अत्याचार केल्याचे विनता यांनी म्हटले आहे. या आरोपांनंतर अभिनेत्री संध्या मृदुल व रेणुका शहाणे यांनीदेखील अालाेकनाथ यांच्या वागणुकीवर आक्षेप नोंदवले. 


शहा म्हणाले, आरोपांची सत्यता पडताळावी लागेल 
11 महिलांनी गैरवर्तनाचे आरोप केलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्याबाबत भाजप अध्यक्ष अमित शहांनी म्हटले आहे की, या आरोपांबाबत पडताळून पाहावे लागेल. आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या पोस्ट्सची सत्यता आधी पडताळून पाहावी लागेल. ज्यांनी आरोप केले आहेत ते माझ्या नावाचा वापर करून काहीही लिहू शकतात. मात्र आम्ही याबाबत नक्कीच विचार करू. 

 

 

बातम्या आणखी आहेत...