आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिको : सरकार गँगवॉर रोखण्यात अयशस्वी झाल्याने 16 गावांतील 500 पेक्षा जास्त मुलांच्या हाती शस्त्रे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी - ड्रगमाफिया व गँगवॉरसाठी कुप्रसिद्ध मेक्सिकोमध्ये सध्या सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे. देशातील हिंसाचार लोकांना असह्य झाला आहे. गुन्हेगार राजरोसपणे कोणाचेही अपहरण करून हत्या करतात. गेल्या आठवड्यात गुरेरोमध्ये २ मुलांसह ९ जणांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या बाबतच्या तक्रारीनंतरही प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी लहान मुलांनी गुन्हेगारांच्या विरोधात रणशिंग फुंकत हाती शस्त्रे उचलली आहेत. त्याचे आई-वडीलही या मोहिमेत त्यांच्या सोबत आहेत.  ड्रग माफियाशी मुकाबला करण्यासाठी गुरेरोमध्ये १६ गावांतील ५०० हून जास्त मुले शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. स्थानिक बास्केटबॉल मैदानावर त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे ड्रग माफियाच्या विरोधात लोकांनी आपली टीम तयार केली आहे. या टीममध्ये सैन्यातून निवृत्त लोकांचाही समावेश आहे. या मुलांना सैन्यासारखे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान त्यांना शस्त्र सांभाळणे, सफाई करणे, गरज भासल्यास त्याचा वापर कसा करायचा, हे शिकवले जाते. मुले दर आठवड्याला अनेक तास विविध रायफल, हँडगन किंवा मेकशिफ्ट शस्त्रांसह ड्रीलमध्ये सहभागी होतात. आता या मोहिमेत परिसरातील गावातील ६०० लोकही सहभागी झाले आहेत. मुलांना प्रशिक्षण देणारे बर्नांडिनो सांचेज म्हणाले, प्रशिक्षणात सहभागी झालेल्या अनेक मुलांनी हिंसाचारात आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. आता त्यांना आपल्या इतर नातेवाइकांना गमवायचे नाही.   अफीम व मारिजुआनाच्या व्यवसायामुळे आणि गँगवॉरमुळे गुरेरो हा देशातील सर्वात हिंसाग्रस्त भाग ठरला आहे. सर्वाधिक हत्येच्या घटनाही याच भागात झाल्या. लहान मुलांनी हिंसाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकले असल्याची बातमी गुरेरोचे गव्हर्नर हेक्टर एस्टुडिआे यांच्यापर्यंत पोहोचली. तेव्हा पदाची सूत्रे घेऊन चार वर्षे लोटल्यानंतर हेक्टर पहिल्यांदाच या भागात घाईघाईने आले. परंतु, मुलांना प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांनी टीका केली. 

‘माझी मुले अनाथ झाली तर स्वत:ला सावरू तरी शकतील....’
स्थानिक नागरिक लुईस दोन्ही मुले गुस्तावो (१३), गेरार्डो (१५) यांना प्रशिक्षण देत आहेत. ते भावुक होत म्हणाले, एखाद्या दिवशी माफियांच्या हल्ल्यात माझा मृत्यू होईल. मुले अनाथ झाल्यानंतरही ते प्रशिक्षणामुळे स्वत:ला सावरू शकतील. मुलांमध्ये भीतीपेक्षा जास्त साहसी वृत्ती आहे. ते शस्त्रे चालवण्यात निपुण आहेत.