मायक्राेसाॅफ्ट बनली एक लाख काेटी डाॅलरचे बाजारमूल्य असलेली चाैथी कंपनी

वृत्तसंस्था

Apr 26,2019 11:00:00 AM IST

रेडमंड (वॉशिंग्टन) - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकेची मायक्राेसाॅफ्ट ही अग्रेसर कंपनी एक लाख काेटी डाॅलरच्या (जवळपास ७० लाख काेटी रुपये) बाजारमूल्याच्या आकड्याला स्पर्श करणारी चाैथी कंपनी ठरली आहे. क्लाऊड सेवेच्या यशस्वितेमुळे कंपनीने तिसऱ्या तिमाहीमध्ये चांगल्या आर्थिक कामगिरीची नाेंद केली. त्यामुळे बुधवार शेअर बाजारात एक लाख कोटी डाॅलरचा बाजार भांडवलाचा आकडा आेलांडण्यात कंपनीला यश आले. जवळपास अर्ध्या तासापर्यंत कंपनीचे बाजार भांडवल १ लाख कोटी डाॅलरच्या वर राहिले.


बुधवारी भांडवल बाजारातील व्यवहार संपले त्या वेळी हे मूल्य ९५.९१ हजार काेटी रुपये नाेंद झाले. काेणत्याही कंपनीचे बाजार भांडवल हे त्या कंपनीची समभाग किंमत आणि समभाग संख्यांच्या गुणाकारातून माेजले जाते. त्यामुळे शेअर बाजारातील चढ-उताराबराेबरच बाजार भांडवलाची पातळीही खाली-वर हाेत असते. मायक्राेसाॅफ्टच्या अगाेदर जगातल्या तीन अन्य कंपन्यांनी एक लाख काेटी डाॅलर बाजारमूल्याचा आकडा पार केला हाेता. त्यामध्ये चीनमधील पेट्राे चायना ही सरकारी कंपनी हे यश संपादन करणारी जगातील पहिली कंपनी ठरली. शांघाय शेअर बाजारात नाेंदणी असलेल्या या कंपनीने २००७ मध्येच हे यश संपादन केले हाेते. त्यानंतर अमेरिकेतील आघाडीची अॅपल ही दुसरी, तर अॅमेझाॅन ही तिसरी कंपनी ठरली. या दाेन्ही कंपन्यांनी २०१८ मध्ये एक लाख काेटी डाॅलरच्या बाजारमूल्याच्या आकडा पार केला हाेता.


महसुलात १४ टक्के वाढीमुळे समभाग किमतीत तेजी :

तिमाहीतील चमकदार आर्थिक निकालामुळे मायक्राेसाॅफ्टच्या समभाग किमतीत तेजी आली. मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात १४ % वाढ हाेऊन ताे ३,०६० काेटी डाॅलरवर (जवळपास २.१ लाख काेटी रु.) क्लाऊड सेवेच्या महसुलात ४१ टक्के वाढ झाली. अजुरे, आॅफिस ३६५, लिंक्डइन या कंपन्यांना मायक्राेसाॅफ्ट व्यावसायिक क्लाऊड सेवा देते.


तीन अव्वल कंपन्यांचे बाजार भांडवल भारताच्या जीडीपीपेक्षा जास्त
भारत जगातील पाचवी सर्वात माेठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. हंगामी अर्थसंकल्पानुसार भारताचा जीडीपी २.७ लाख काेटी डाॅलर (१८८ लाख काेटी रु.) आहे. परंतु जगातील सर्वात माेठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील अॅपल, मायक्राेसाॅफ्ट आणि अॅमेझाॅन या तीन कंपन्यांचे बाजार भांडवल देशाच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. या तीन कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल २.८७ लाख काेटी डाॅलर (सुमारे २०१ लाख काेटी रु.) आहे.


रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी : बाजारमूल्याच्या बाबतीत मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात माेठी कंपनी आहे. तिचे मूल्य १२.४५ हजार काेटी डाॅलर (८.७२ लाख काेटी रुपये) आहे.

X
COMMENT