आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नडेला इफेक्ट: चार वर्षांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मूल्यात 3 पट वाढ; अॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्ट ठरली जगातील सर्वात मोठी कंपनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- गेल्या आठवड्यातच अॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. शुक्रवारी मायक्रोसॉफ्टचा मार्केट कॅप ५.९५ लाख कोटी आणि अॅपलचा ५.९२ लाख कोटी रुपये होता. मात्र, पाच वर्षांपूर्वीचा विचार करता मायक्रोसॉफ्ट इतक्या लवकर इतकी प्रगती करेल तसेच अॅपलला मागे टाकेल, अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. २०१२ पर्यंत १० वर्षांत मायक्रोसॉफ्टच्या शेअरच्या किमतीमध्ये केवळ तीन टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र, आता वर्षभरातच कंपन्यांच्या शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

मायक्रोसॉफ्टमध्ये नेमके असे काय घडले? या प्रश्नाचे उत्तर २०१४ मध्ये सापडते. या वर्षी सत्या नडेला कंपनीचे सीईओ बनले. तेव्हापासून कंपनीच्या शेअरच्या दरात तीन पट वाढ झाली आहे. 

मायक्रोसॉफ्टने २०१० मध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली होती. अमेझॉनने या आधी चार वर्षांपूर्वीच क्लाउड बाजारात प्रवेश केला आहे. २०१३ पर्यंत मायक्रोसॉफ्टचा व्यवसाय अमेझॉनच्या तुलनेमध्ये अत्यल्प होता. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवरच कंपनीचे लक्ष केंद्रित होते. मात्र, १४ वर्षे सीईओ पदावर राहिल्यानंतर स्टीव्ह बामर यांनी पद सोडल्यानंतर सत्या नडेला यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात अाली. त्या नंतर कंपनीने या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे.

 

 

मायक्रोसॉफ्टने २०१३ मध्ये नोकियाचा मोबाइल व्यवसाय खरेदी केला होता. तत्कालीन सीईओ बामर यांनी हा भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले होते. मात्र, दोनच वर्षानंतर नडेला यांनी हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक या निर्णयामुळे त्यांनी केलेल्या ७,८०० कर्मचारी कपातीमुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. 

 

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रोफेसर डेव्हिड बी. योफी यांनी सांगितले की, नडेला यांनी क्लाउडच्या बिझनेसला पूर्णपणे बदलले आहे. यामुळेच मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा तेजीने वाढ होणारी कंपनी बनली आहे. कंपनीने अॅपल, गुगल आणि सॅमसंगसारख्या स्मार्टफोनमध्ये जगाचे नेतृत्व करत असलेल्या कंपन्यांसोबत स्पर्धा करत बसण्यापेक्षा नवीन अॅप विकसित करणे आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे कंपनीचा सर्वाधिक बिझनेस हा कॉर्पोरेट आधारित आहे. कंपनीचा एक्सबॉक्स व्हिडिओ गेम वर्षाला सुमारे ७०,००० कोटी रुपयांचा महसूल देतो. हा कंपनीच्या महसुलाच्या १० टक्केच आहे.

 

क्लाऊड व्यवसायात दोन वर्षांत दुप्पट वाढ 

नडेला यांनी क्लाऊड व्यवसायाला प्राथमिकतेमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे. त्याचमुळे आज ही कंपनी अमेझॉननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन वर्षांत कंपनीची या व्यवसायातील भागीदारी दुपटीने वाढली असून १३ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांचा विचार केल्यास कंपनीचा बाजारातील शेअर १३ टक्क्यांनी वाढला असून अमेझॉनचा शेअर ३३ टक्क्यांवर स्थिर आहे. जूनमध्ये संपलेल्या वर्षात कंपनीच्या महसुलात १५% वाढ होऊन ७.७ लाख कोटी आणि ऑपरेटिंग प्रॉफिट १३% वाढून २.४ लाख कोटी रुपये झाला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...