आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोसॉफ्टने जपानमध्ये फोर डे वीकचा प्रयोग केला, तीन दिवसांच्या सुटीमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत 40 टक्के वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - भारतात सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून अधिक काम करून घेण्यासाठी त्यांचा कार्यालयीन वेळ ९ तास करण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे संगणक सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांच्याकडून कमी वेळेत काम करून घेतले. कंपनीने कर्मचाऱ्यांकडून आठवड्यातील फक्त चारच दिवस काम करून घेतले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत आश्चर्यकारक वाढ दिसून आली आणि  मागील वर्षाच्या याच महिन्यांतील कार्यक्षमतेच्या तुलनेत त्यात ४० टक्के वाढ झाली.  मायक्रोसॉफ्टने हा प्रयोग आपल्या जपान येथील प्रकल्पात ऑगस्टमध्ये केला होता.  कंपनीने आपल्या २३०० कर्मचाऱ्यांना आठवड्यात शुक्रवारी अतिरिक्त सुटी देत तीन दिवसांची सुटी दिली. अशा रीतीने कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून फक्त चारच दिवस काम केले. कंपनीच्या मते, या प्रयोगामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या इतर सुट्यांची जुळणी करावी लागली नाही. एवढेच नव्हे तर इतक्या सुट्या मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी सुट्याही कमी घेतल्या.  मायक्रोसॉफ्टने या प्रयोगाच्या परिणामाविषयी सांगितले की, ही वाढ बैठकांतील वेळ कमी झाल्याने झाली. कोणतीच मिटिंग ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालली नाही. काही मिटिंग्ज तर समोरा-समोर होण्याच्या ऐवजी ‌व्हर्च्युअल झाल्या. ईमेल्सची उत्तरे लवकर देण्यात आली. इतर निर्णय न टाळता लवकर घेण्यात आले. यामुळे कामाला गती आली आणि उत्पादकता वाढली. एवढेच नव्हे तर या काळात कंपनीतील विजेचा वापर २३.१ टक्के घटला आणि ५८.७ टक्के कागदाचा वापर कमी झाला. यामुळे कंपनीच्या खर्चातही बचत झाली. 

छोट्या कंपन्यातील यशस्वी समीकरण मोठ्या कंपनीतही उपयुक्त

आतापर्यंत आठवड्यातून चार दिवस कामाची संकल्पनेवर छोट्या कंपन्यातच काम व्हायचे. मात्र, मायक्रोसॉफ्टच्या प्रयोगाने सिद्ध केले की, हे समीकरण मोठ्या कंपन्यांतही लागू होऊ शकते, तर व्हर्जिन अॅटलांटिकचे संस्थापक रिचर्ड ब्रानसन यांनी हा आनंद वाढवणारा प्रयोग आहे, असे म्हटले आहे.