आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विभागातील पुरामुळे 18 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर- विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मागील चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे विभागातील पुणे, सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्हयातील नद्या दुथडी भरुन वाहत असून बहुतांशी भागास पुराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पुरामुळे बाधित पुणे विभागातील 4 हजार 712 कुटुंबातील 18 हजार 670 नागरिकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुरस्थितीत मदत व पुनर्वसनासाठी पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. 
 
सतत कोसळणारा पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांना पुराचे स्वरुप आले आहे. पुणे जिल्हयातील पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा तसेच, सांगली जिल्ह्यातील कृष्णा, कोयना तर सातारा जिल्हयातील कोयना, तारळी, उरमोडी या नद्यांना पूर आला आहे. पुणे महसूल विभागात आतापर्यंत 125.40 टक्‍के  पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात 199.20 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात 185 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 99 टक्‍के तर सातारा जिल्ह्यात 159 आणि सोलापूर जिल्ह्यात 78 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पूर परिस्थितीबाबत प्रशासन दक्ष असून संबंधित सर्व विभाग सतर्क राहून कार्यरत आहेत.
 
> पुण्यातील मुळा, मुठा व पवना या नद्या पुणे शहरातून जात असल्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे 2 हजार 405 कुटुंबातील 8 हजार 842 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील जुनी सांगवी, दापोडी, रहाटणी, वाकड, रावेत, पिंपरी या परिसरातील काही भाग बाधीत झाला आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, निरा-देवघर, चासकमान, मुळशी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदयांच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.
 
> सातारा जिल्ह्यातील 226 कुटुंबांतील 921 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यामधील कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला असून, या दोन्ही नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे. कोयना धरणातून 1 लाख 3 हजार 600 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा-लोणंद, जुना सातारा-पुणे, तारगाव-नांदगाव रोड, पाटण-मुळगाव, कराड-तांबवे, उंब्रज- मसूर, वाई- मांढरदेव आदी मार्ग पुरामुळे बंद झाले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशा सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.
 
> सांगलीतील कृष्णा व कोयना नदीला आलेल्या पुरामुळे सांगली व मिरज शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सांगली जिल्हयातील 914 कुटुंबातील 3 हजार 907 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
 
> कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुतर्फा वाहत असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराने बाधित कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 167 कुटुंबातील 5 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
 
>सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान कमी आहे. पुणे जिल्हयातील जवळ जवळ सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे उजनी धरणाचा पाणी साठा 73 टक्‍क्‍यांपर्यंत पर्यंत गेला आहे. सोलापूर जिल्हयातील इंद्रायणी नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या ​​​​ नागरिकांना सतर्क राहण्‍याच्या सूचना देण्‍यात आल्या आहेत.

दरम्यान, पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे  आवाहन डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले आहे.