आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारावीतील मुलांना बॉक्सिंगचे धडे देणार माइक टायसन, 29 सप्टेंबर रोजी मुंबईत आगमन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एकेकाळी बॉक्सिंग जगतावर अधिराज्य गाजवलेला, तसेच बॉक्सिंग रिंग आणि बाहेरही आपल्या कारनाम्यांनी चर्चेत असलेला माजी हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसन हा येत्या शनिवारी त्याच्या पहिल्यावहिल्या भारत दौऱ्यावर येत आहे. मिक्स्ड मार्शल आर्टच्या एका नव्या लीगचे उद्घाटन करण्यासाठी तो मुंबईला भेट देणार आहे. या भेटीदरम्यान तो आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील अनेक होतकरू तसेच उदयोन्मुख खेळाडूंना बॉक्सिंगचे धडे देणार आहे. 


माइक टायसन हासुद्धा त्याच्या कुटुंबीयांसोबत झोपडपट्टीतच राहिलेला आहे. त्याचे बालपण अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ब्रुकलीन परिसरातील झोपडपट्टीत गेले आहे. हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन मोहम्मद अली यांच्या खालोखाल माइक टायसनला जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. सर्वात कमी वयात जागतिक स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा मुष्टियोद्धा म्हणून माइक टायसनचा नावलौकिक आहे. 


येत्या २९ सप्टेंबर रोजी त्याचे मुंबईत आगमन होत आहे. कमाइट वन या ग्लोबल मिक्स्ड मार्शल आर्टच्या लीगचे उद्घाटन त्याच्या हस्ते केले जाणार आहे. या लीगचे आयोजक मोहंमद अली बुधवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यानंतर टायसन धारावी परिसरातील उदयोन्मुख बॉक्सर्सना भेटणार असून या भेटीदरम्यान या खेळाडूंना तो काही टिप्सही देणार आहे. 


तळागाळातील खेळाडूंसाठी उपक्रम 
तळागाळातील खेळाडूंना पुरेशा सोयीसुविधांअभावी जागतिक स्तरावर फारशी चमक दाखवता येत नाही. ही बाब हेरून या लीगची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून क्षमता असूनही पडद्याआड राहिलेल्या देशभरातील गुणी खेळाडूंना हेरले जाणार आहे. तसेच विपरीत परिस्थितीत खेळाची आवड जोपासणाऱ्या खेळाडूंनाही मदतीचा हात दिला जाणार असल्याचे बुधवानी म्हणाले. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असून मिक्स्ड मार्शल आर्टचा प्रसार करण्याचाही हा एक प्रयत्न आहे. खुद्द माइक टायसन अशा उदयोन्मुख खेळाडूंना भेटण्यासाठी आतुर झाल्याचेही बुधवानी म्हणाले. 

 

टायसनने वयाच्या २०व्या वर्षी मिळवले होते जागतिक विजेतेपद 
टायसनचा जन्म ३० जून १९६६ रोजी झालेला आहे. त्याच्या नावावर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप (डब्ल्यूबीसी), जागतिक बॉक्सिंग संघटना (डब्ल्यूबीए) आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशन या तीन स्पर्धांमध्ये जागतिक विजेतेपद मिळवण्याचा विक्रम आहे. डब्ल्यूबीसीचा किताब तर त्याने अवघ्या २० वर्षे ४ महिने आणि २२ दिवस इतक्या कमी वयात जिंकला होता. 


मिक्स्ड मार्शल आर्ट
कुस्ती, तायक्वांदो, कराटे, ज्युदो, ब्राझिलियन जीऊजीत्सू, किक बॉक्सिंग आणि बॉक्सिंग असे सर्व प्रकार एक करून मिक्स्ड मार्शल आर्ट हा अनोखा खेळप्रकार तयार करण्यात आला आहे. हा क्रीडाप्रकार जरी नवा असला तरीही फार पूर्वी प्राचीन ग्रीसमध्ये अशा स्वरूपाचा खेळ खेळला जात असे. 

 

बातम्या आणखी आहेत...