आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाचे \'विचारधन\' आणि \'झोत\'चे वादळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनमताचा रेटा म्हणा वा आगामी निवडणुकीसाठी मतांची बेगमी, रा. स्वं. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तीन दिवसीय  व्याख्यानमालेत संघाच्या बदलत्या "राजकीय' भूमिकांचे दर्शन घडवत भागवत यांनी काँग्रेस मुक्त नव्हे युक्त भारत, मुस्लिमांसह हिंदू राष्ट्र आदी मुद्दे आग्रहाने मांडले. याच व्याख्यानमालेत त्यांनी "बंच ऑफ थॉट्स' या वादग्रस्त भाषणसंग्रहातून प्रसृत झालेले गोळवलकर गुरूजींचे काही विचार कालबाह्य झाल्याचे म्हटले. योग असा की, ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक डॉ. रावसाहेब कसबे यांचे या पुस्तकाची तर्ककठोर चिकित्सा करणारे "झोत'नावाचे पुस्तक झाले त्या घटनेला या वर्षी ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने झोत'द्वारे प्रसृत विचारांच्या प्रभावाची पुनर्मांडणी करणारा हा लेख...

 

रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर गुरुजी यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ आणि या पुस्तकाची चिकित्सा करणारे डॉ. रावसाहेब कसबे यांचे ‘झोत’, ही दोन्ही पुस्तके गेली काही दशके सतत चर्चेत राहिली आहेत. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कारप्रसंगी डॉ. कसबे यांनी विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या  गोळवलकरांचे काही विचार कालबाह्य ठरवणाऱ्या भूमिकेची चिकित्सा केली. रावसाहेबांच्या मते, संघ तेव्हाही कालबाह्य होता आणि आजही कालबाह्य आहे. आज गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ला बावन्न वर्ष पूर्ण झाली आणि रावसाहेबांच्या ‘झोत’ला चाळीस वर्षे पूर्ण झालीत. चाळीस वर्षांनंतर गोळवलकर गुरुजींचे विचारधन कालबाह्य होते, हे "झोत'चे यश आहे असेही रावसाहेब त्या प्रसंगी म्हणाले. खऱ्या अर्थाने  "झोत'नेे राष्ट्रीय स्तरावर एक वादळ उठवले होते, इतिहासात रमून प्रखर हिंदुराष्ट्रवादाची पेरणी करणाऱ्या संघाची आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या कसोटीवर परखड समीक्षा करण्याचे काम त्यावेळी "झोत'ने केले.  म्हणूनच एका बाजूला  संघ वाढत असला तरीही "झोत'ने उपस्थित केलेले प्रश्नही चाळीस वर्षांनंतर तेवढेच टोकदार आहेत.
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवी दिल्लीत झालेल्या तीन दिवसीय संमेलनातली  सरसंघचालक  भागवत यांची भाषणे चांगलीच गाजली. या भाषणांचा सारांश लक्षात घेता संघ बदलतो आहे, असे माध्यमचित्र उभे करण्यात संघाला यश आल्याचे दिसले. हिंदुत्वाबद्दल संघाची पारंपारिक भूमिका बदलते आहे, असे सूचित करून संघाने युगधर्म मानलेले  मा. स. गोळवलकर गुरुजींचे विचारधन कालबाह्य ठरल्याचे मोहन भागवत यांनी या संमेलनात सांगितले.संघाच्या स्थापनेपासून मुस्लिमद्वेष हा संघाचा अजंडा राहिला आहे. पण असे असूनही भागवत यांनी आपल्या भाषणात मुस्लिमांशिवाय हिंदुत्व पूर्ण होणार नाही, असेही भाष्य केले.   भागवत यांच्या या भाषणांचा वेगवेगळा अर्थ निघू शकतो. संघ खरंच बदलतोय की बदलण्याचे नाटक करतोय? हे येत्या काही दिवसात दिसेलच; परंतु मिळालेली सत्ता हातातून जाईल या भीतीने आज स्वतःच्या विचारप्रणालीला तिलांजली देण्याचे धाडस करून आत्मविसंगत तडजोडी करणे संघाला भाग पडत आहे हेही तितकेच खरे आहे.

 

संघाचे स्वरुप १९२५ मध्ये डॉ. हेगडेवार यांनी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. १९४० पर्यंत ते संघाचे सरसंघचालक होते. त्यानंतर १९४०  ते १९७३ अशी तेहतीस वर्षे   मा.स. गोळवलकर गुरुजी हे संघाचे सरसंघचालक राहिले. १९७३  ते १९७७ ही चार वर्षे  बाळासाहेब देवरस यांच्याकडे संघाची धुरा गेली. यातली २१ महिने देवरस कारावासात होते. पुढे प्रा. राजेंद्र सिंह, कृपाहल्ली सुदर्शन ते मोहन भागवत अशी सरसंघचालकांची कारकीर्द सांगता येते. गेल्या नऊ दशकांच्या वाटचालीत संघाची स्वतंत्र अशी लिखित घटना नाही. त्यामुळे एवढया मोठया  सांस्कृतिक संघटनेची तत्वप्रणाली कोणती, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. शिवाय संघाच्या इतर सरसंघचालकांनी काही लिहून ठेवल्याची उदाहरणे नसल्याने  मा.स. गोळवलकर गुरुजी यांनी वेळोवेळी दिलेली भाषणे, मुलाखती हेच संघाचे बौद्धिक मानले जाते. गुरुजींचे ‘विचारधन’ म्हणजे संघाची तत्वे आहेत असे मोठ्या श्रद्धेने सांगितले आणि जपले जाते. गोळवलकर गुरुजींचे विचार आणि संघाची विचारसरणी एकमेकांपासून वेगळे काढणे हे आजपर्यंत संघाच्या स्वयंसेवकांना आणि संघाच्या टिकाकारांनाही शक्य झाले नाही.

 

चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन, मुस्लिमद्वेष आणि हिंदुराष्ट्रवाद या त्रयीवर गोळवलकर गुरुजींचे विचारधन उभे आहे. संघानेही याच गोष्टींना प्राधान्य दिले आहे. मग मोहन भागवत यांच्या अलीकडच्या भाषणांचा अनव्यार्थ संघ बदलतोय असा घेतला तर संघाला खरंच धर्मनिरपेक्ष होता येईल का?आणि महत्वाचे म्हणजे, संघाच्या जन्मातच रुजलेला मुस्लिमद्वेष नाहीसा होईल का?अशा अनेक प्रश्नांना सामोरे जाण्याचे अंगभूत धाडस संघाला आता दाखवावे लागणार आहे. संघ बदलतो आहे असा देखावा करणे संघाला खूप चांगले जमू शकेलही;पण बदलाचे कृतिशील आचरण मात्र संघाच्या मूळ उद्दिष्टांनाच तडे देणारे आहे. संघ बोलतो एक आणि करतो एक असाही इतिहास आहे. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत याची संघ बदलाची नांदी ही एक पोलिटिकल स्ट्रॅटेजी आहे असंही वाटण्याची शक्यता अधिक आहे. संघाच्या व्यासपीठावरून ही स्ट्रॅटेजी केवळ भागवतांनीच वापरली असेही नाही;  बाळासाहेब देवरस यांनीही ती वापरली होती. संघाच्या पूर्वीच्या सरसंघचालकांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन संघ बदलतो आहे अशा घोषणा  केल्या होत्या. त्यामुळे भागवतांची ही घोषणा नवी नाही. २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन मोहन भागवत यांनी दिल्लीतील भाषणात जी विधाने केली, ती संघाच्या राजकीय डावपेचांचा भाग असू शकते, यामुळे संघाला दुहेरी फायदा होईल, असेही संघ समर्थकांना वाटत असावे. भागवतांच्या सर्वसमावेशकतेच्या नाऱ्यामुळे संघाच्या धर्माभिमानी भूमिकेमुळे दुरावलेल्या सहिष्णू हिंदू मतदारांची पुन्हा घरवापसी होईल असेही त्यांना वाटत असावे.यात संघाचे मनसुबे काहीही असो, पण संघाला आता सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका का घ्यावी लागली? हा खरा प्रश्न आहे. यात संघाचे स्वरूप आणि संघाची पोलिटिकल स्ट्रॅटेजी यातला फरक लक्षात घेतला नाही तर सर्वसामान्य मतदारांचा बुद्धिभेद होण्याची शक्यता मात्र अधिक आहे.

 

गुरुजींचे विचारधन
पुनरुज्जीवनवादी धर्मविचार व त्यातून साकारलेली हिंदुराष्ट्रवादाची कल्पना ही  गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे. गोळवलकरांची ही मते  संघाचा आचारधर्म आहेत. आपल्या विचारधनात गोळवलकर गुरुजी म्हणतात की ‘भारतीय समाज पुन्हा समर्थ समाज म्हणून उभा करायचा असेल तर आपल्याला हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण केले पाहिजे. हिंदू धर्मातील या आदर्श समाजव्यवस्थेत प्रत्येक वर्णाला जी कर्मे निश्चित केली आहेत, ती कर्मे त्याने मरणालासुद्धा न घाबरता केली पाहिजे’ यासाठी भगवद्गीतेचा दाखला देत गुरुजींनी म्हटले आहे, ‘धर्माने नेमून दिलेल्या कर्तव्याव्यतिरिक्त कर्म केल्याचे परिणाम भयानक असतात. म्हणून हिंदू जीवनपद्धतीचे पुनरुज्जीवन करणे हाच आपला राष्ट्रधर्म आहे’ गुरुजींचे हे विचार म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन आहे. एकीकडे जातिव्यवस्थेचे अनिष्ट परिणाम गुरुजी मान्य करतात. पण जातीअंताला मात्र विरोध करतात. त्यांच्या मते,’ हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म असून ऋग्वेदात वर्णन केलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वराचेच चतुर्विध स्वरूप आहे. आजची जातिव्यवस्था नष्ट करणे आणि वर्गविहिन समतेवर आधारलेला समाज निर्माण करणे म्हणजे सारे शरीर वर्गहीन करण्यासाठी कापून टाकणे होय. इतकेच नव्हे तर जातिव्यवस्था ही भारतीय समाजाला गेल्या हजार वर्षांच्या इतिहासात उपकारकच ठरली आहे’ असेही गुरुजींचे मत आहे. जातिव्यवस्थेचे समर्थन करत गुरुजी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे असाही सिद्धांत रुजवतात. मुस्लिमद्वेष पसरवत ते भारतीय राष्ट्रवादाला हिंदू व्यवस्थेचा आधार देण्याचा आग्रह धरतात. गोळवलकरांच्या मते आदर्श हिंदू समाजपद्धती वर्णव्यवस्थेवर आधारित असावी, तिथे धर्माला,जातीला आणि कर्माने नेमून दिलेल्या वर्णाला महत्व असावे. याशिवाय गोळवलकरगुरुजींच्या दहा ईश्वर आज्ञाही सर्वपरिचित आहेत. ज्यात वर्णश्रेष्ठत्व, धर्मरक्षण, आणि ईश्वरनिर्मित श्रुती व स्मृतींना महत्त्व दिले आहे. याशिवाय यात हिटलरचा धडा गिरवा, खाजगी संपत्तीचे रक्षण करा, स्त्री-पुरुष समानतेच्या बडबडीला थारा देऊ नका, अशा आज्ञाही गुरुजींनी दिल्या आहेत. गोळवलकरांचे हे विचारधन प्रमाण मानून आजही संघाची वाटचाल चालू आहे. त्यांचे हे विचार संस्कृतीसंघर्षाचे कसे कारण बनली आहे. यामुळे आधुनिक विचारधारा कुंठित करण्याचे प्रयत्न कट्टर हिंदुत्ववादी कसे करतात आणि यातून उद्याच्या लोकशाही समाजवादी समाजरचनेला कसा धोका आहे हे सप्रमाण सांगण्याचा प्रयत्न रावसाहेब कसबे यांनी त्यांच्या "झोत' या पुस्तकातून केला आहे.

 

'झोत'चे वादळ
गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाची चिकित्सा करणारे रावसाहेबांचे ‘झोत’ हे पुस्तक१९७८  सालात मे महिन्यात प्रकाशित झाले.त्यानंतर एक महिन्यातच ९ जून १९७८  ला पुण्यात   संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात संघ कार्यकर्त्यांकडून त्याची होळी करण्यात आली. आणीबाणीनंतर संघ, जनसंघ, आणि जनता पक्ष यांच्या युतीतून राज्यात व केंद्रात जनता पक्षाचे जे सरकार आले त्यामुळे संघ सुखावला होता. तेव्हाही संघ बदलतोय, असे चित्र तयार झाले होते. संघातल्या आणि संघाबाहेरच्या अनेक समाजवाद्यांनाही संघातला हा बदल सकारात्मक वाटत होता. तेव्हाही तत्कालीन सरसंघचालक  बाळासाहेब देवरस यांनी काही लोकप्रिय घोषणा केल्या होत्या,संघात मुस्लिमांना प्रवेश मिळेल, स्त्रियांचा समावेश असेल,आणि सर्व जाती-धर्मीयांचे संघात स्वागत असेल, या त्यातल्या महत्वाच्या घोषणा होत्या. देवरसांच्या या भूमिकेमुळे संघ बदलतोय, असे चित्र तयार होणे स्वाभाविकच होते.

 

संघातल्या या घडामोडींकडे महाराष्ट्रातल्या पुरोगामी संघटना डोळे लावून होत्या. संघाचा विचार आणि व्यवहार हा अनेकांच्या चिंतनाचा विषय बनला असताना समाजवादी युवक दलाने पुढाकार घेऊन संघाचे खरे रूप जनतेसमोर आणण्याच्या हेतूने संघावर महाराष्ट्रातील विचारवंतांचे लेख असणारे एक पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरविले.या पुस्तकासाठी यदुनाथ थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रयत्न करून अनेकांकडून लेखन मागवले पण अन्य लेखकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने हे पुस्तक प्रकाशित होऊ शकले नाही. या पुस्तकासाठी रावसाहेब कसबे यांनी एक दीर्घ लेख पाठवला होता.या लेखाच्या विस्तारातूनच पुढे "झोत'आकाराला आले. हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा महाराष्ट्राच्या विचारविश्वात अनेक घडामोडी घडल्या. पुण्यात संघाच्या समर्थकांकडून ते जाळण्यात आले. संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पुस्तकाच्या विक्रेत्याला व पत्रकारांना मारहाण झाली. पुढे रावसाहेबांच्या भाषणांतही गोंधळ घातले जाऊ लागले. असे अनेक संघर्ष  अंगावर घेत, संघाच्या अंतर्गत विचारात मात्र "झोत'ने मोठी खळबळ उडवली. संघ व संघस्वयंसेवकांना आत्मटीकेला सामोरे जाण्याचा मार्ग दिला आणि पुरोगामी प्रवाहातील अनेक संघटना व कार्यकर्त्यांना धर्मशक्तींना सामोरे जाण्याची विचारशिदोरीही "झोत'ने पुरवली.

 

'झोत'ने निर्माण केलेल्या वादळाचे पडसाद भारतीय राजकारणावर पडले.पुरोगामी चळवळींना दिशा मिळाली आणि संघालाही आपले कुंठित स्वरूप व्यापक करण्याची जनभावना मिळाली. "झोत'चा पहिला दृश्यपरिमाण झाला तो म्हणजे, जनता पक्षातील समाजवादी व संघातील स्वयंसेवक यांच्यात संघर्ष झडला. पुढे हा संघर्ष विकोपाला जाऊन त्याची परिणती जनतापक्ष विघटित होण्यात झाला. भारतीय स्तरावर "झोत'ने एक वादळ उठवले, विचारांची आणि संघर्षाची कवाडे खुली केली, त्यामुळे "झोत' संघात आणि संघाबाहेरही वाचले गेले.गेल्या चाळीस वर्षांत या पुस्तकाच्या असंख्य आवृत्त्या निघाल्या, त्याचा विक्रमी खप झाला. कानडी, तेलगू, हिंदी आणि इंग्रजी भाषेतही त्याची भाषांतरे झाली.


 गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थाॅटस् ‘ची  चिकित्सा करताना संघाने स्वीकारलेला राष्ट्रवाद, संघाची हिंदुत्वाची कल्पना आणि संघाचे राजकारण या विषयांना अत्यंत तर्कसंगतपणे रावसाहेबांनी खोडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. संघाचे हिंदुत्व हे वैदिक ब्राम्हण्याचा पुरस्कार करणारे आहे, ते केवळ राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून अस्पृश्य बहुजन हिंदूंना आपलंसं करण्याचा देखावा करतात. त्यामुळे संघाच्या हिंदुत्वाच्या कल्पनेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही अर्थाने मर्यादा आहेत. असे रावसाहेब कसबे यांनी "झोत'मध्ये नमूद केले आहे.

 

गोळवलकर गुरुजींनी भारतीय इतिहासाची मीमांसा चैतन्यवादी भूमिकेतून केली आहे.लोकशाही समाजवादाच्या विरोधात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याच्या अंतरिक निष्ठेने संघाने जे प्रयत्न केले, ते प्रयत्न आकर्षक आणि मोहित करणारे असले तरी भारतीय लोकशाहीला गतिमान करणारे नाहीत, असेही "झोत'ने स्पस्ट केले आहे. संघाची विशेषतः गोळवलकरांची विज्ञानावर श्रद्धा नाही, ते भौतिक प्रगतीला गौणत्व देतात आणि तसे करणे गोळवलकरांना क्रमप्राप्त होते, असे रावसाहेबांना वाटते. कारण रावसाहेबांच्या मते 'जेव्हा विज्ञानाला आणि समाजवादाला नकार देऊन किंवा गौणत्व देऊन एखादा विचार स्पष्ट करण्याची गरज असते, तेव्हा चैतन्यवादाचा आसरा घेऊन धर्म, परमेश्वर, धर्मग्रंथ इत्यादींना अवास्तव महत्त्व द्यावे लागते.' या अर्थाने संघाला सामाजिक अभिसरणही मान्य नाही. पुनर्जन्मावर व त्यावर आधारित कर्मांवर विश्वास ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आजही संघाकडून पुरस्कृत केल्या जाताना दिसतात. त्यामुळे संघ अजूनही मनाने जातिव्यवस्था स्पष्टपणे नाकारत नाही. तो एकीकडे जसा देशीवादी परंपरांचा अभिमान बाळगतो तसाच दुसरीकडे इतिहासाचे पूजक बनवून तरुणांच्या मनात आक्रमक हिंदू राष्ट्रवादाचे बीजरोपण करतो. संघ हे एक सांस्कृतिक संघटन आहे असे सांगत जे राजकारण संघाचे मंडळी करतात ते संविधानमूलक नाही असेही रावसाहेबांनी सांगितले आहे.

 

संघात मुस्लिमांचे स्वागत करण्याचे जे औदार्य दाखवले जाते, ते आजचे नाही. पण संघाने आज आपले राजकीय हात फैलावण्यासाठी असे म्हटले असले तरी संघाचा मूळ स्वभाव तसा नाही. रावसाहेब कसबे यांना कर्मठ हिंदू आणि कर्मठ मुसलमान दोन्ही मूलतत्त्ववादी आहेत असे वाटते. आधुनिक ज्ञान-विज्ञानाला हिंदू जातिवाद्यांचा असणारा विरोध आणि मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांचा विरोध हा एकाच जातकुळीचा वाटतो. त्यांच्या आत्ममग्नतेने आणि मध्ययुगीन मानसिकतेने त्यांना निष्क्रिय केले आहे असे रावसाहेबांचे मत आहे. म्हणून या दोन्ही धर्मामधला परस्परविरोध पाहता आज संघाने जरी मुस्लिमांसाठी स्वागताची तयारी केली असली तरी मुस्लिम समाज संघात जाईल, याची शक्यता रावसाहेबांना दिसत नाही.

 

संघ बदलतोय?
 २०१४ च्या निवडणुकीच्या तोंडावर संघाचे सरसंघचालक  मोहन भागवत यांनी संघाच्या मुळ विचारसरणीत अंगभूत असलेल्या काही घोषणा पुनरुज्जीवित केल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनाच्या समारंभात ते म्हणाले होते की, ‘पुढच्या पाच वर्षात आपल्याला देशातील देशातील सर्व हिंदूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न करायचे आहेत. सर्व हिंदूंच्या पिण्याच्या पाण्याचे, प्रार्थनेचे आणि मृत्यचे ठिकाण एकत्र असेल असे प्रयत्न केले पाहिजे.' ‘एक भाषा, एक देवता एक संप्रदाय बनना होगा.' असे सांगत  भागवत यांनी गाझियाबादच्या सभेतही 'भारत हे हिंदूराष्ट्र आहे' अशीही घोषणा केली होती. आणि अलीकडे दिल्लीतल्या व्याख्यानमालेत संघाच्या बदलत चाललेल्या भूमिकेचे सूतोवाच करताना मात्र त्यांनी मुस्लिमांसह हिंदू राष्ट्राचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची परिघाबाहेर कल्पना करणाऱ्या  गोळवलकर गुरुजींच्या ‘बॅच आॅफ थॉट्स'ला प्रासंगिक व कालबाह्य ठरवले. संघाच्या मूळ विचार कालबाह्य ठरवून त्याला बाजूला सारणे यात नक्कीच मोठा राजकीय अर्थ दडलेला आहे. केवळ हिंदू धर्माचा नारा देणाऱ्या संघाला आज बहुजन - अस्पृश्य हिंदुंबरोबरच मुस्लिम मतदारांचीही का गरज वाटू लागली आहे? संघ बदलतोय हे खरे मानले तरी तो केवळ राजकीयदृष्ट्या बदलतोय हेही लक्षात घेतले पाहिजे.

 

गेल्या पाच वर्षातले भाजपचे धर्मकेंद्रित राजकारण पाहता विरोधक एकवटले आहेत. समाजवादी, दलित, मुस्लिम, कम्युनिस्ट असे अनेक सेक्युलर राजकीय गट एकत्र आले की सत्तेचा सारीपाट बदलू शकतो, अशी धास्ती भाजपला वाटते आहे. दुसरे म्हणजे, हिंदुत्वाला प्रखर राष्ट्रवादाची जोड देण्याचे मनसुबेही आधुनिक ज्ञान-विज्ञानाने विकलांग केले आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात जात आणि धर्माचे अस्तित्व किती टिकेल असाही प्रश्न आहे. एकूणच भारतीय माणूस बदलतो आहे, प्रसार माध्यमांमुळे आणि समाज माध्यमांमुळे तो जागरूक होत आहे. त्यामुळे भविष्यात जातीचा प्रश्न किती टिकेल हाही प्रश्न आहे. आपल्या सांस्कृतिक संघर्षात जात टोकदार केली जाते हे खरे असले तरी आधुनिकीकरण, जागतिकीकरणआणि भांडवलशाहीत जातीचा प्रश्न विरळ होऊन नव्या प्रश्नांना सामोरे जाण्याची चाहुल सर्वांनाच लागली आहे. जातीची जागा आर्थिक प्रश्नांनी घेतली, आणि भांडवलशाहीने धर्मांचा विळखा सोडवला तर जात आणि धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या दबावगटांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता दिसू लागल्याने संघ आपली चाल बदलतो आहे. हेही लक्षात घेतले पाहिजे.

 

संघ बदलतोय याची इतरही अनेक कारणे सांगता येतील. पण संघाला आपल्या हिंदुत्वाचा विस्तार करायचा आहे हेही महत्वाचे आहे. २७ जानेवारी१९१९ ला साऊथबरो कमिटीपुढे साक्ष देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात हिंदू धर्म एक नसून दोन आहेत असे सांगितले. बाबासाहेबांच्या मते, भारतात हिंदू धर्मात सवर्ण हिंदू आणि अस्पृश्य हिंदू असे दोन स्वतंत्र भिन्न समुदाय आहेत. भारतातल्या अस्पृश्य हिंदूंची घरवापसी करण्याचा प्रयत्न संघाने वारंवार केला आहे. पण अलीकडे बहुजन हिंदू जातीही जागरूक झाल्या आहेत. प्रागतिक चळवळी वैदिक हिंदूंच्या विरोधात उभ्या राहू लागल्या आहेत. अशा वेळी आपल्या हिंदुत्वाचा चेहरा अधिक सर्वसमावेशक करण्याशिवाय संघाकडे दुसरा पर्याय उरला नाही हेही लक्षात घेतले पाहिजे.

 

रावसाहेबांचे इशारे
देशात पुरोगामी चळवळी सुरू होऊन शंभर-दीडशे वर्षे लोटली, पण अजूनही लोकशाही व समाजवादी मूल्यांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रागतिक प्रवाहाने जडवादाचे विज्ञाननिष्ठ आकलन भारतीय तरुणांच्या मनात नीट रुजवले नाही. विशेषत: भारतात समाजवादी व कम्युनिस्टांंकडून भारतीय इतिहासाची भौतिकवादी मीमांसा नीट न झाल्याने गोळवलकरांनी मांडलेला विकृत इतिहास सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला. यात दोष केवळ गोळवलकरांचा नाही तर समाजवादी व साम्यवादी यांच्या क्षेत्रातील कर्तव्यशून्यतेचाही आहे असे रावसाहेबांनी "झोत'मध्ये म्हटले आहे. आजही हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या इतिहासाच्या मांडणीची नीटपणे चिकित्सा झाली नाही  तर भारतीय समाजजीवनात अनेक गडबडी होतील, असा महत्त्वाचा इशारा रावसाहेब देतात.
सध्या भारतात राष्ट्रवादाची खूप चर्चा होत आहे. परंतु वर्गीय वर्चस्व टिकवणारा तथाकथित राष्ट्रवाद टिकवण्याचा प्रयत्न संघाने आजपर्यंत केला आहे. पण भारतातल्या सामान्य माणसाला सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून देणाऱ्या समाजाची निर्मिती करणारा लोकशाही समाजवादी विचारांचा व्यापक राष्ट्रवाद हवा आहे. म्हणून भारतात मानवतावादी राष्ट्रवाद रुजवण्याचा प्रयत्न पुरोगामी प्रवाहांकडून अधिक जोमाने व्हायला हवा. म्हणून आज उभ्या राहिलेल्या सांस्कृतिक वर्चस्ववादी विचारसरणींना तोंड द्यायचे असेल तर भारतीय संविधानाच्या प्रामाणिक अमलातूनच आजच्या धार्मिक राष्ट्रवादाला तोंड द्यावे लागेल असेही रावसाहेबांना वाटते.
मूलतत्त्ववाद ही भारताची डोकेदुखी आहे. म्हणून हिंदू जातीवादी आणि मुस्लिम मूलतत्त्ववादी या दोघांच्याही न्यूनगंडाने पछाडलेल्या भांडणात सर्वसामान्य कष्टकरी माणसाचा मात्र बळी जात आहे. म्हणून आज भारतातल्या मध्यमवर्गाने कठोर उपाय शोधल्याशिवाय त्यांचे जगणे सुरक्षित राहणार नाही आणि त्यांचा भौतिक आणि सांस्कृतिक विकास होणार नाही असा पर्याय रावसाहेब देतात.
रावसाहेबांनी "झोत'मधून दलित चळवळीलाही काही मूलभूत इशारे दिले आहेत. ऊठसूट ब्राह्मण व्यक्तिद्वेषात न अडकता ब्राह्मणद्वेष आणि ब्राह्मण्यद्वेष यात फरक केला पाहिजे अशी रावसाहेबांची भूमिका आहे.  ब्राह्मण कुळातील सर्वच व्यक्ती ब्राह्मणी वर्चस्वासाठी धडपडणाऱ्या आहेत, असे रावसाहेब मानत नाहीत. जन्माने ब्राह्मण असूनही काही माणसे सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहून पुरोगामी चळवळींचे नेतृत्व करतात, वेळप्रसंगी तेही हिंदुत्ववाद्यांच्या टीकेचा विषय बनतात, महाराष्ट्रात आगरकरांपासून ते भाई वैद्य यांच्यापर्यंत अशी उदाहरणे सांगता येतील. म्हणून पुरोगामी प्रवाहांनी ब्राह्मणी वर्चस्व टिकवू पाहणारे ब्राह्मण आणि त्यांच्या आश्रयाने वर्गीय स्वार्थ टिकवणारे काही ब्राह्मणेतर यांच्यात आणि ब्राह्मणी वर्चस्वासहित कोणत्याही वर्चस्वाला नकार देणारे ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात फरक केला नाही तर आपल्या चळवळी केवळ जातींचे संघटन बनून त्यात कमालीचे साचलेपण येईल असा धोकाही रावसाहेबांनी चाळीस वर्षांपूर्वी व्यक्त केला होता.
म्हणूनच रावसाहेब कसबे यांनी चाळीस वर्षांपूर्वी "झोत'मध्ये दिलेले इशारे आजही तेवढेच महत्त्वाचे  वाटतात, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न तेंव्हाही समकालीन होते आणि आजही ते तेवढेच टोकदार आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...