आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Millions Of Illegal Sandstones At Godavari River Edge; Seven People Were Charged

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदावरी नदीकाठच्या गावांत लाखोंचे अवैध वाळूसाठे; 7 जणांवर गुन्हे दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
गोदावरी नदी - Divya Marathi
गोदावरी नदी

वैजापूर : उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्या विशेष भरारी पथकाने गोदावरी नदीकाठच्या पाच ठिकाणी जवळपास ४० लाख रुपये सरकारी मूल्य असलेले वाळूसाठे जप्त केले. तसेच दहा जणांविरोधात तहसीलदारामार्फत थेट पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली. दरम्यान वाळू माफियात प्रशासनाकडे वाळूचे साठे कोणी केलेत व कुठे ठेवली यांची कुंडली देऊन कारवाई घडवून आणणारा मुख्य सूत्रधार कोण यांचा शोध लावण्यात गुंतले आहे.

अख्खे महसूल प्रशासन विधानसभा निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असल्याची संधी शोधून गोदाकाठच्या माफियांनी नदीपात्रातून वाळूचा उपसा करून तो वाहतुकीसाठी दडवून ठेवला होता. मात्र, अवकाळी पावसाच्या कहरामुळे वाळूमफियांना हा अनधिकृत साठा तिथून हलवण्यात नैसर्गिक अडचण आल्यामुळे तसाच पडून असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. सानप यांना मिळाली होती. वाळूची साठेबाजी करण्यासाठी तहसील कार्यालयाऐवजी त्यांच्या कार्यालयातील नायब तहसीलदार आर. बी. महाजन, तलाठी विनोद साळवे, सुनील सरवर, एस. के. जाधव ,जी.पी. मुदिराज यांचे विशेष पथक स्थापन केले होते. पथकाने पुरणगाव शिवारात मधुकर ठोंबरे यांच्या मालकीची गट क्रमांक २५३ मध्ये १० ब्रास, तसेच गट नंबर २६७ व २७७ या क्षेत्रात २०० ब्रास वाळूचे साठे आढळले. हे साठे जप्त करून यात मिथुन ठोंबरे, दत्तात्रय ठोंबरे, युवराज ठोंबरे, दादासाहेब ठोंबरे, अनिल तुवर यांच्यावर वीरगाव ठाण्यात लाडगावचे महसूल मंडळाधिकारी एस. एस. मिसाळ यांच्या तक्रारीवरून अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन व साठवून ठेवल्याच्या आरोपाखाली गुन्हे नोंदवण्यात आले. तसेच या पथकाने दुसऱ्या दिवशी बाभूळगाव गंगा येथे दोन ठिकाणी ११० ब्रासचे वाळूसाठे जप्त करून जालिंदर सोपान कुंजीर, राजेंद्र ऊर्फ सुरेश मधुकर बोर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सावखेड गंगाचे तलाठी राजपूत यांना प्राधिकृत केले. या कारवाईमुळे वाळूमफियाचे हातपाय गळाले तर गावपातळीवर तलाठ्यांना वरिष्ठ कार्यालयाच्या पथकाने गुपचूप धाड टाकून कारवाई केल्यामुळे कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे.

पथकाने कार्यवाही केल्यामुळे तलाठ्यावर कारवाई होणार ?

गोदावरी नदीकाठच्या गावातील सरकारी वाळू घाटातून वाळू उपसा व वाहतूक करण्यास प्रतिबंध आहे. असे असताना तस्कराकडून खुलेआमपणे वाळूचे उत्खनन करून साठेबाजी होत असल्याच्या प्रकारावर या भागात कार्यरत तलाठी कारवाई करण्याऐवजी अर्थपूर्ण तडजोड करून आर्थिक वरकमाई साधत असल्याचे त्यांचे पितळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केलेल्या कारवाईत उघडे पडले. त्यामुळे शासनाच्या गौण खनिजाचे सरंक्षण करण्याऐवजी त्यांची तस्कराच्या मदतीने विल्हेवाट लावणाऱ्या भ्रष्ट मंडळीवर उपविभागीय अधिकारी कारवाईचा बडगा उगारणार का याकडे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांत चर्चा होत आहे.

जप्त केलेल्या त्या वाळू साठ्यातील वाळू लंपास

फर्दापूर : महसुल विभागाने फर्दापूर परिसरात १४० ब्रास अवैधरित्य जमा केलेल्या वाळू साठ्यावर कार्यवाही करूनही वाळू जप्त करून पोलिस पाटलाच्या ताब्यात दिली होती. त्यातील चोरट्यांंनी ९० हजार रुपये किमतीची ३० ब्रास वाळू चोरून गेली. याप्रकरणी पोलिस पाटील यांनी संशयितांच्या नावे तहसीलदारांकडे लेखी स्वरुपात तक्रार केली आहे.

फर्दापूर गावालगत वाघूर नदी पात्रातील वाळू उपसा करून माफियांनी परिसरात मोठे अवैध वाळूचे साठे साठवले होते. अशाच वाळू साठ्यावर महसूल विभागाच्या पथकाने छापेमारी करून येथील गट क्रं. ११५ मध्ये १५ ब्रास गट क्रं. ११ मध्ये १० ब्रास तर पर्यटन महामंडळाच्या संपादित जमिनीवर १४० ब्रास असे १६५ ब्रास अवैध वाळूचे तीन साठे जप्त केले होते. यापैकी पर्यटन महामंडळाच्या संपादित जमिनीवरील कारवाई करून चार लाख वीस हजार रुपये किमतीची १४० ब्रास वाळू जप्त केली होती. विशेष म्हणजे फर्दापूर परिसरात कुठेही शासकीय वाळू पट्टा नाही. तरीदेखील वाळूमाफिया ही वाळू राजरोसपणे नदी पात्रातून अवैधरित्या जेसीबीच्या सहाय्याने व काही मजूर लावून तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने उपसा केला होता. या साठ्यावर छापा मारून जप्त केली होती. जप्त केलेली वाळू फर्दापूर पोलिस पाटलाच्या ताब्यात दिली होती. या वाळूचा तहसीलदार प्रवीण पांडेंनी २२ नोव्हेंबर रोजी लिलाव करून तीन लाखांत विक्री केली होती. मात्र वाळू पडून होती वाळू माफियांनी ३० ब्रास वाळू रातोरात चोरुन नेली आहे.

तक्रार, पण चौकशी नाही

२६ नोव्हेंबर रोजी पोलिस पाटलांनी तहसीलदारांना गावातील संशयित राजकीय युसूफखाॅँ पठाण, शेख फिरोज शेख शैकत, सुनील संपत शेळके यांच्या नावाची तक्रार दिली आहे. तहसीलदारांनी फर्दापूर ठाण्यात तक्रार दिली असून २ दिवस उलटले तरी संशयितांना चाैकशीसाठी न बाेलवल्याने उलटसुलट चर्चेला उधाण अाले अाहे.