आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिनिधी | औरंगाबाद : सिडकाे एन-१ परिसरातील सेंट झेवियर्स शाळेजवळ राहणारे व्यावसायिक नगीन भागचंद संघवी (६८) यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप ताेडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे चोरांना तळमजल्यावरील बेडरूममध्ये कपाट व बेडरूमच्या चाव्यांचा संच एकाच ठिकाणी सापडल्याने सर्व खोल्यांतील प्रत्येक कपाट, बॉक्स तपासून ऐवज चोरून नेला. संघवी हे वीस दिवसांपूर्वी कुटुंबासह अमेरिकेला गेले आहेत. त्यामुळे त्यांनी नोकरांनाही सुट्टी दिली अाहे. त्यांच्या कुटुंबाचे सर्व काम पाहणारे भाईदास रामदास कदम (५२) हे रोज सकाळी साडेदहा वाजता बंगल्यावर जातात. साफसफाई कर्मचाऱ्यांकडून कामे करून दुपारी दोन वाजता परत जातात. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता आल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी तत्काळ संघवी यांच्या शहरातील नातेवाइकांना याची कल्पना दिली. त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांसह श्वानपथक, ठसेतज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बाहेरीला दरवाजाला कुलूप नव्हते चोरांनी गेटच्या कुलपाला हात न लावता सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. बंगल्याला मुख्य दरवाजासमोर एक दरवाजा असून त्याच्या मागे एक मुख्य दरवाजा आहे. आतील दरवाजाला कुलूप लावून समोरील दरवाजा ओढून घेतला जातो, जेणेकरून बंगल्याला कुलूप असल्याचे दिसू नये. तरीही चोरांना बंगल्यात कोणीही नाही, आतील दरवाजाला कुलूप असल्याचे समजले कसे, असा प्रश्न पोलिसांना पडला. चोरांनी कडीकोयंडा वाकवून आत प्रवेश केला. राेख सत्तर हजार व साेन्याचे दागिने गायब : चोरांनी स्वयंपाकघरातून चाकू, बत्ता घेऊन तळमजल्यावरील एका बेडरूमचे लॉक तोडले. तेथेच त्यांच्या हाती घरातील सर्व कपाटे, लॉकर व बेडरूमच्या चाव्या असलेला बॉक्स सापडला. त्यातील प्रत्येक चावीवर ती कुठल्या बेडरूम व कपाटाची आहे, हे लिहिलेले असल्याने चोरांना बेडरूमसह कपाट उघडणे साेपे गेले. चोरीनंतर प्रत्येक दरवाजा व कपाटाला त्याची चावी तशीच ठेवून गेले. कदम यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ७० हजार रुपये रोख, सोन्याच्या दोन अंगठ्या, चेन व इतर महत्त्वाचे साहित्य चोरीला गेले. दर सहा महिन्यांनी परिसरात चोरी : एन-१ मधील सेक्टर एमध्ये असलेल्या या परिसरात सहा महिन्यांपूर्वीच संघवी यांच्या शेजारील घरी चोरी झाली होती. त्यापूर्वी याच सोसायटीत बंगला फोडण्याचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे, सोसायटीत दोन कुत्रे रोज दिवसरात्र संघवी यांच्या बंगल्यामध्ये जाऊन बसत. त्यांना पाणी व दूध दिले जाते. त्यामुळे बंगल्यात कोणीही अनोळखी अाल्यास ते धावून जात. परंतु चोरीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही कुत्रे आढळून आले नाहीत. संभाजी कॉलनीतही घर फोडले : संभाजी कॉलनीतील मनोज सुधाकर दानवे (२८) हे १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पत्नीसह भोकरदन येथे गेले होते. यादरम्यान चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.