आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना १७ ऑगस्ट रोजी मनपाच्या बैठकीत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उपमहापौर विजय औताडे यांच्यासह भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली.
मतीन यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिसांनी ही कारवाई केली. या गुन्ह्यात भाजप नगरसेवकांवरील सर्व कलमे जामीनपात्र हाेती, त्यामुळे त्यांना पाेलिस ठाण्यातच जामीन मिळाला. यात उपमहापाैर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, राज वानखेडे, रामेश्वर भादवे व महिला बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी अदवंत यांचा समावेश अाहे. त्यांच्यावर १ दिवसाची प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते. अटक करण्यात आलेल्यांना जबाब नोंदवल्यानंतर सोडण्यात येईल, अशी पाेलिसांनी माहिती दिली.
काय आहे प्रकरण?
17 ऑगस्ट रोजी औरंगाबाद महापालिका सभागृहात वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावास एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला होता. त्याविरोधात भाजपचे नगरसेवक त्यांच्यावर चालून गेले. बाकांवर चढून लाथाबुक्क्यांनी त्यांना अमानुष मारहाण केली. यात भाजपचे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे आघाडीवर होते.
संध्याकाळपर्यंत मिळू शकतो जामीन
या सर्व नगरसेवकांना संध्याकाळपर्यंत जामीन मिळून त्यांची सूटका होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
उपमहापौरांनी मारली होती लाथ
या घटनेमध्ये भाजपचे उपमहापौर औताडे यांनी टेबलावर चढून मतीन यांना लाथ मारली होती. प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, राजगौरव वानखेडे व रामेश्वर भादवे हे नगरसेवक मारहाणीत आघाडीवर होते.
मतीनविरुद्ध धर्म, वंशावरून शत्रुत्व वाढवल्याचा गुन्हा
मतीन यांच्या विरोधात 17 ऑगस्टरोजी सायंकाळी सिटी चौक पोलिसांत उपमहापौर विजय औताडे यांनी फिर्याद दिली. मतीन यांनी वाजपेयींविषयी अनुद्गार काढून दोन धर्मांत द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य केले तसेच मनपा कार्यालयाबाहेर जमावाला चिथावणी देऊन धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटलेे. त्यावरून मतीन विरोधात भादंवि कलम १५३, १५३ (अ) (धर्म,वंश,जन्म,निवास भाषा इ. कारणावरून निरनिराळ्या गटांत शत्रुत्व वाढवणे ) व २९४ (सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याला चीड आणणारे अश्लील वक्तव्य, शब्द प्रयोग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक डी. एस. शिंगारे तपास करत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, या मारहाणीचा व्हिडिओ व फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.