आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा दणका देऊ' - नांदगावकरांचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या टीकेने मनसे नेते संतापले असून एमआयआमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा देण्यात आला आहे. पुन्हा जर टीका केली तर मनसे स्टाइलने दणका देऊ आणि तो कसा असतो ते अबू आझमी यांना विचारा, असेही म्हटले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबतचा व्हिडिओ मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्या अधिवेशनात मशिदीवर भोंगे कशाला? आम्ही घरात पूजा करतो. धर्म घरात ठेवा, असे म्हटले होते. यावर इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांची एंटरटेनर म्हणून खिल्ली उडवत लोक त्यांच्या सभांना येतात, पण मते देत नाहीत. तुमच्या कानाला मशिदीवरील भोंग्याचा 

आताच त्रास का व्हायला लागला, असा प्रश्न केला होता. यावर बाळा नांदगावकर यांनी एमआयएमला इशारा दिला आहे.

व्हिडिओ संदेशात बाळा नांदगावकर म्हणतात, एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे. राज ठाकरे यांच्याबद्दल हीन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. अशी टीका झाली तर मनसे स्टाइलने दणका दिला जाईल. इम्तियाज जलील चुकून लॉटरी लागल्याने खासदार झाले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. या महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या नादाला लागायचे नाही हे आताच लक्षात ठेवा. पाहिजे तर अबू आझमींना विचारा. आमच्या अंगावर येऊ नका. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. तुम्ही प्रयत्न करून तर पाहा, मग तुम्हाला कळेल. आमच्या नादाला लागायच्या फंदातही पडू नका, नाहीतर खूप महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

असदुद्दीन ओवेसी हेच एंटरटेन करतात

एवढेच नव्हे तर बाळा नांदगावकर यांनी पुढे, एंटरटेनर कुणाला म्हणता, असा प्रश्न करीत तुमचे असदुद्दीन ओवेसी औरंगाबादला नाचले. त्यांना आम्ही नाचा बोलू का? ते एंटरटेन करतात. तुमच्या पक्षाचे भायखळ्याचे आमदार वारिस पठाण गणपती बाप्पा मोरया म्हणाले, म्हणून त्यांना माफी मागायला लावली? ही तुमच्या पक्षाची भूमिका आहे. हैदराबादमधून आला आहात तर हैदराबादमध्येच राहा. इकडे नाही ते नाटक करायचे नाही. राज ठाकरे यांच्याविषयी तुम्ही परत बोलला तर ते तुम्हाला अडचणीचे ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...