Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | mim mla imtiyaz jaleel news in Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसला मनसे चालते; एमआयएम का नाही? इम्तियाज जलील यांचा रोकडा सवाल

फिरोज सय्यद | Update - Mar 13, 2019, 09:26 AM IST

एकीकडे काँग्रेस मनसेला विरोध करते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी मनसेला निमंत्रण देते.

 • mim mla imtiyaz jaleel news in Marathi

  औरंगाबाद - एकीकडे काँग्रेस मनसेला विरोध करते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी मनसेला निमंत्रण देते. मग धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम का चालत नाही, असा सवाल आमदार इम्तियाज जलील यांनी केला. औरंगाबादसह सहा मतदारसंघात एमआयएमचे प्राबल्य असतानाही केवळ प्रकाश आंबेडकरांच्या शब्दाखातर आम्ही त्या जागा सोडल्या आहेत. मात्र, त्यांनीही औरंगाबादच्या कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेता येथून दलित किंवा मुस्लिमालाच उमेदवारी द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


  औरंगाबादमध्ये युती वगळता सर्व पक्षांनी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे, असे दोन आठवड्यांपूर्वी आंबेडकरांनी सुचवले. त्याला एमआयएममधून विरोध होत आहे. तर हे विरोधक म्हणजे बच्चे कंपनी असल्याचे कोळसे पाटील यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर “दिव्य मराठी’ने आ. इम्तियाज यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आंबेडकरांनी सहा जागांवर उमेदवार निश्चित केले आहेत. त्यापैकी औरंगाबाद वगळता अन्य ठिकाणी आम्ही आघाडीचा धर्म पाळू. परंतु, औरंगाबादेत दलित किंवा मुस्लिमच उमेदवार हवा.


  काँग्रेस-राष्ट्रवादीला दलित-मुस्लिमांची मते हवीत पण नेते नकोत : बहुजन वंचित आघाडी किंवा एमआयएमच्या उमेदवारीमुळे युतीलाच फायदा होणार, असा सूर आहे. याबद्दल इम्तियाज म्हणाले की, धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी नको असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेतले पाहिजे. पण त्यांना फक्त दलित-मुस्लिमांची मते हवीत पण नेते नकोत. हे कसे चालेल? २०१४च्या विधानसभेत सोलापूर मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार फक्त ९ हजार मतांनी पराभूत झाला. धुळे मनपा निवडणुकीत आम्हाला ३२ हजार मते मिळाली. चार नगरसेवक निवडून आले. मालेगाव येथे आमचे आठ तर अमरावतीत १२ नगरसेवक आहेत. नांदेड येथेही मोठी संख्या असल्याचे ते म्हणाले.


  औरंगाबादमध्ये सौदेबाजी
  काँग्रेस-राष्ट्रवादीने औरंगाबाद जिल्ह्यात कायम शिवसेना-भाजपशी सौदेबाजी केली आहे. त्यांच्यामुळेच येथे युतीचे प्राबल्य निर्माण झाले आहे. आता ते नष्ट करण्यासाठी एमआयएम तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या दाराने मनसे आली तर चालते मग आम्ही का चालत नाहीत?

Trending