आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत एमआयएम फुटीच्या उंबरठ्यावर, 10 नगरसेवक काँग्रेसवासी होण्याच्या प्रयत्नात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पहिल्याच निवडणुकीत शहरात एक आमदार व २५ नगरसेवक निवडून देणारा एमआयएम पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे दिसून येत आहे. पक्षात एकाधिकारशाही असल्याचा आरोप करत २५ पैकी १० नगरसेवक काँग्रेसवासी होण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु नाराजी असली तरी एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

 

२०१४ मध्ये एमआयएम पक्षाने शहरात प्रवेश केला. शहरातील तीन विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली. त्यात पूर्व आणि पश्चिममध्ये त्यांना यश येऊ शकले नसले तर मध्य मतदारसंघातून इम्तियाज विजयी झाले. पश्चिममध्ये डॉ. गफार कादरी दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे २५ नगरसेवक विजयी झाले. शिवसेनेनंतर हा दुसरा मोठा पक्ष ठरला. निवडणुकीच्या काही दिवसानंतर लगेचच पक्षात धुसफूस असल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेतेपदावरून फिरोज खान यांना वगळल्यानंतर अलीकडे ही धुसफूस वाढली. त्यामुळे दहा नगरसेवकांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. प्रारंभी ही संख्या १५ इतकी होती. परंतु त्यातील अनेकांशी आमदार इम्तियाज यांनी चर्चा केल्यानंतर पाच जणांनी तूर्तास पक्षात थांबण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र दहा नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत या पक्षात राहणेच नाही, यावर ठाम असल्याचे समजते.

 

या बाबत आमदार इम्तियाज यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षात नाराजी असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र कोणत्याही परिस्थितीत एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा केला. आम्ही म्हणजेच पक्ष अशी काही नगरसेवकांची धारणा झाली आहे. परंतु हे सर्व जण केवळ पक्षामुळेच विजयी झाल्याचे त्यांना विस्मरण झाले असावे, असे इम्तियाज ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले. महापालिकेच्या एका वाॅर्डात झालेल्या मध्यावधी निवडणुकीत एमआयएमचा पराभव झाला होता. तेव्हाच येथे पक्षाचा ऱ्हास सुरू झाल्याची चर्चा होती. पक्षाचा जनाधार नेमका किती हे आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकीत स्पष्ट होईल.
 
लोकसभेचा निर्णय ऐनवेळी घेऊ
एमआयएम हा पक्ष आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे. परंतु लोकसभा लढायची की नाही, याचा निर्णय ऐनवेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन घेतला जाईल, असे इम्तियाज म्हणाले. शिवसेना-भाजप युती व काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी यांचा निर्णय झाल्यानंतर  पक्ष निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...