आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लैंगिकतेचे पैलू उलगडणारी ‘लिहाफ’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मिनाज लाटकर  

१९४१ सालासारख्या काळात जर इस्मत चुगताई महिलांच्या लैंगिकतेसंदर्भात धाडसानं भाष्य करतात, त्याबद्दल लिहितात आणि हे सगळं उघडपणे लिहिण्या-बोलण्याची किंमतही चुकवतात, तर आजच्या काळात महिलांचं सौंदर्य आणि त्यावर मत मांडताना वापरल्या जाणाऱ्या भाषाशैलीवर किती लक्ष दिलं जायला हवं...? 
‘कहां है भारत की वह महान नारी, वह पवित्रता की देवी सीता, जिसके कमल जैसे नाजुक पैरों ने आग के शोलों को ठंडा कर दिया और मीराबाई जिसने बढ़ कर भगवान के गले में बाहें डाल दीं। वह सावित्री जिसने यमदूत से अपने सत्यवान की जीवन-ज्योत छीन ली। रजिया सुल्ताना जिसने बड़े-बड़े शहंशाहों को ठुकरा कर एक हब्शी गुलाम को अपने मन-मंदिर का देवता बनाया। वह आज लिहाफ में दुबकी पड़ी है या फोर्स रोड पर धूल और खून की होली खेल रही थी।” हे वाक्य आहे भारतातल्या एका महान लेखिकेचे जिने महिलांच्या सशक्तीकरणाचे अनेकविध पैलू तिच्या साहित्यातून पुढे आणले. त्या म्हणजे इस्मत चुगताई. साहित्यात एका वेगळ्या कथाशैलीत त्यांनी स्त्रियांच्या भावनांची गुंतागुंत सोडविण्याचा प्रयत्न केला. ‘अ लाइफ इन वर्ड‌्स मेमोयर्स’ या पुस्तकात इस्मत चुगताई लिहितात,एका लघुकथेने त्यांचे जीवन बदलून टाकले, हा काही चांगला अनुभव नव्हता. त्या लिहितात, माझ्यावर आजपर्यंत लिहाफचीच लेखिका आहे असे लेबल लावले गेले. ही कथा लिहिल्यानंतर माझी खूप बदनामी झाली आणि मला मानसिक त्रास सहन करावा लागला. यामुळे माझे आयुष्य बदलून गेले. ही कथा लिहिल्यानंतर लोकांनी माझा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. लिहाफच्या आधी आणि लिहाफच्या नंतर मी जे काही लिहिलं त्याची कधीच दखल घेतली गेली नाही. पण लिहाफच्या लिहिण्याने माझ्यावर अश्लील लेखिकचा ठपका ठेवण्यात आला. मला प्रसिद्धी नेहमीच बदनामीच्या स्वरूपात मिळाली.

इस्मत चुगताई यांची वादग्रस्त कथा ‘लिहाफ’ ही स्वातंत्र्यापूर्वी १९४१ मध्ये ‘अदब ए लतीफ’ एका उर्दू मासिकात प्रकाशित झाली होती. ही कथा दडपून गेलेल्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या शरीराचं शोषण कसं केलं जातंं यावर आधारित होती. ही त्या काळातली कथा आहे, जेव्हा लग्न म्हणजे मुलींचा व्यापार केला जायचा. महिलांना घरातील एका वस्तूप्रमाणे समजलं जायचं. ही कथा वादग्रस्त ठरली कारण या कथेत स्पष्टपणे वापरली गेलेली भाषाशैली. आज जेव्हा आपण महिलांच्या शरीराबद्दल, लैंगिकतेबद्दल बोलतो त्या वेळी अनेकदा इंग्लिश भाषेची मदत घ्यावी लागते. अनेक वेळा आपल्याला मानवी शरीराची योग्य नावंदेखील माहीत नसतात. इस्मत चुगताई यांनी त्यांच्या लिखाणात मानवी देहाच्या बाबतीत लिहिताना उर्दू भाषेचा प्रयोग केला आहे. आणि त्या काळात भारतात भाषांना धर्मानं जोडलं जायचं. एका मुस्लिम घरंदाज महिलेच्या शरीराबद्दल लिहिल्यामुळे इस्मत चुगताई यांना बेशर्म ठरवलं गेलं. लिहाफ ज्या काळात लिहिली गेली होती त्या काळात समाजात फक्त दोनच प्रकारच्या संबधांना मान्यता होती. एक म्हणजे स्त्री आणि दुसरं म्हणजे पुरुष. समलैंगिक संबधांविषयी काहीच बोलण्याचं स्वातंत्र्य त्या काळात नव्हतं. पण या कथेत रूपकात्मक गोष्टींचा वापर करून पडद्याआडून या विषयाचा खुलासा केला आहे. लिहाफ ही अशी कथा आहे ज्यातून त्या काळातले सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय महिलांची लैंगिकता म्हणजे केवळ विषमलिंगी विवाह संबंध असा नसून यापुढे जाऊन महिलांच्या लैंगिक इच्छा काय असू शकतात हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महिला म्हणजे फक्त घरी ठेवायचे सुंदर शरीर नसून मन आणि मेंदू असलेली माणूस असते. तसेच त्यांच्या भावनांचा आणि स्वप्नांचा उलगडा त्यांनी त्यांच्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. या कथेची किंमत त्यांना अनेक मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करून चुकवावी लागली. पण त्यांनी याबद्दल कधीच माफी मागितली नाही. उलट न्यायालयाची लढाई लढली. जिंकलीसुद्धा.

लेखिकेचा संपर्क : ९९६०५०३६२३