आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोचा मित्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्री हे असं नातं आहे ज्यात जात, धर्म, लिंग असा फारसा विचार न करता आपल्या आवडीनिवडी जुळल्या, विचार, सहवास या गोष्टींमुळे हे नातं निर्माण होत असतं. स्त्री असो किंवा पुरुष आपल्याला अनेक नाती ही जन्मानेच मिळालेली असतात. पण मैत्री हे नातं असं आहे की आपल्याला निर्माण करावं लागतं, टिकवावं लागतं. माणूस म्हणून घडत असताना आपल्याला हे मैत्रीचं नातंच कामी येत असतं. मैत्रीचं नातं हे विश्वास आणि मदतीच्या आधारावर टिकलेलं असतं. मैत्रीत ना वर्णभेद असतो ना लिंगभेद. ना वयाची मर्यादा. हे सगळं आपण बोलत असलो तरी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत मुलींना, महिलांना मित्र असणे याकडे नकारात्मक पद्धतीने पाहिलं जातं. पुरुषाचे मित्र किंवा मैत्रिणी या सहज स्वीकारल्या जातात. पण बाईच्या मित्रांकडे बघण्याची अजून व्यापक नजर निर्माण झाली नाहीये. आजच्या काळात मुलं, मुली शिक्षण किंवा कामानिमित्त एकत्र येतात, त्यांच्यात मैत्री होणं साहजिक आहे. पण लग्नानंतर अनेक स्त्रियांच्या मैत्रीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो याला तशी अनेक कौटुंबिक, सामाजिक कारणं आहेत. नवऱ्याला, सासरच्यांना आवडणार नाही म्हणून लग्नानंतर अनेक स्त्रियांचं मित्रांसोबतच अंतर वाढतं. असं असलं तरी फ्रेंडशिप डेनिमित्त मध्यमवर्गीय, विवाहित, निमशहरी महिलांच्या त्यांच्या मित्रांसोबतच्या या अनोख्या मैत्रीचे अनुभव.
 

मैत्री दिनाला ‘विवाहित महिलांचे मित्र’ या विषयावर अनेकींना बोलतं केलं. विशेष म्हणजे नवऱ्याशी-सासरच्यांशी असलेल्या मोकळ्या संवादामुळे अनेक नवरोबांनी ‘बायकोचा मित्र’ हे नातं निकोप मनानं स्विकारलं आहे. तुमचं काय? स्वच्छ मनाने तुम्ही स्विकारणार का...?
 
 

कौटुंबिक निर्णयात मित्रांचं सहकार्य - पल्लवी सरदेशपांडे
माझे लग्नाआधीही खूप मित्र होते आणि तीच मैत्री लग्नानंतरही टिकून आहे. माझे मित्र माझ्या नवऱ्याचे मित्र झाले आहेत. माझ्या शाळेतले, कॉलेजचे, कामाच्या ठिकाणचे मित्र आहेतच. पण या सर्वांमध्ये जवळचा मित्र म्हणजे डॉ. कुणाल. त्याची आणि माझी मैत्री हॉस्पिटलमध्ये झाली. आम्ही एकमेकांना गेल्या २० वर्षांपासून ओळखतो. आजपर्यंत आमची मैत्री घट्ट आहे. त्याने जेव्हा प्रेमविवाहाचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या घरच्यांचा विरोध होता. त्यावेळी मी आणि माझे पती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. नंतर त्याच्या पत्नीच्या डिलिव्हरीवेळीही  मी त्याच्या पत्नीला पूर्ण मदत केली. आम्ही एकमेकांना नेहमीच मानसिक,भावनिक आधार देत असतो. अनेक वेळा कौटुंबिक निर्णय घेतांना मी माझ्या मित्रांचा सल्ला घेते. जसे माझ्या पतीचा एक मित्र परिवार आहे तसा तो माझाही आहे. जसं आपल्या आयुष्यात नातेवाईकांच स्थान असतं तसं माझ्या मित्रांच पण माझ्या आयुष्यात स्थान आहे.

 मित्रपरिवार मोठा आहे - अमृता वासुदेव
माझ्या पतींचा स्वभाव खूप शांत आहे. त्यांचे मित्र पण खूप कमी आहेत. आता माझेच मित्र माझ्या पतीचे मित्र झालेत. माझे सासू-सासरे जास्त शिकलेले नाहीत. पण विचारांनी अगदी प्रोग्रेसिव्ह आहेत. त्यामुळे मला कधीच काही अडचण आली नाही. त्यामुळे शाळेपासूनच्या मित्र-मैत्रिणींशी मी संपर्कात आहे. माझे जसे मित्र आहेत तसेच मैत्रिणीही खूप आहेत. जॉब करत असल्याने घरापेक्षा जास्त ऑफिसमध्ये वेळ जातो. त्यामुळे ऑफिसमधले सहकारीच चांगले मित्र झाले आहेत. माझ्या कुटुंबात मोकळं वातावरण असल्यामुळं माझे मित्रसुद्धा माझ्याशी अगदी मोकळेपणाने वागतात, बरेच मित्र माझ्या दुसऱ्या शहरात, राज्यात राहतात. कधी कोल्हापूरला आले की ते माझ्या घरी येतात. माझा मित्र-मैत्रिणींचा परिवार मोठा असल्यानं माझ्या मुलीच्या मित्र-मैत्रिणींना समजून घेणं किंवा मुलांना मैत्रीबद्दल, योग्य मित्र कसे निवडावे याबद्दल समजावून सांगण पण सोप्प जातयं.
 
 

मित्र हा आधार वाटतो -  शिल्पा हलसूलक
मैत्रीचं नातं हे व्यवस्थित टिकवता आलं पाहिजे. लग्नानंतर माझे बरेच मित्र हे माझ्या नवऱ्याचे मित्र आहेत. पण बरेच मित्र असे आहेत की ते फक्त माझेच मित्र आहेत. माझ्या आवडीनिवडी खूप वेगळ्या आहेत. त्यानुसार माझा मित्र परिवार वेगवेगळा आहे. मित्र-मैत्रिणी हा आपला वेगळा कम्फर्ट झोन असतो. माझा नवरा काही कामानिमित्त बाहेरगावी असताना माझा अपघात झाला. त्या वेळी मी पटकन माझ्या अनिल या मित्राला फोन केला. तो आला. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याची त्या दिवशी खूप मोठी मदत झाली. फक्त मदतीसाठीच मित्रांची गरज नसते. तो एक आधार असतो. मित्रांशी काय बोलायचं, नवऱ्याशी काय बोलायचं ही माझी चॉइस आहे.बऱ्याच मुलींना मित्र-मैत्रिणींशी काय बोलणं होतं वगैरे अशा गोष्टी नवऱ्याशी शेअर करणं बधंनकारक असतं. पण आयुष्यात मित्र-मैत्रिणी निवडण्याचा, मैत्री करण्याचा अधिकार असलाच पाहिजे.
 
 

स्त्री-पुरूष मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन - आस्मा तांबोळी 
 माझ्या शाळेतले मित्र माझ्याशी संपर्कात आहेत. जितेंद्र रावण माझा जवळचा मित्र आहे. मला काही मदत हवी असेल तर मी लगेच त्याला फोन करते. त्याचा संपर्क मोठा असल्याने अनेक क्षेत्रांत त्याच्या खूप ओळखी आहेत. त्यामुळे मला कोणत्याही कामासाठी मदत हवी असेल तर मला जितेंद्रची आठवण येते. वर्गातल्या अनेक मैत्रिणींना पण मदत करण्यासाठी तो धडपड असेे. मध्यंतरी आमच्या एका मैत्रिणीच्या पतीचे निधन झाले. तिला मदत करण्यासाठी तो धडपडला. तो आमच्या सर्वांचाच खास मित्र आहे. मी आणि माझा नवरा त्याला वेळात वेळ काढून भेटतो. मदत करण्याच्या माझ्या मित्राच्या वृत्तीचं मला कौतुक वाटतं. शाळेतल्या दिवसांत आम्ही जास्त बोलतं नव्हतो. नंतर आमची मैत्री वाढत गेली. स्त्री असो किंवा पुरुष त्यांना मित्र-मैत्रिणी असलेच पाहिजेत. ते नातं खूप वेगळं असतं. अनेक मुली लग्नानंतर मित्रांशी बोलणं टाळतात. याला कौटुंबिक, सामाजिक कारणं आहेत, पण मैत्रीचं नातं हे खूप वेगळं असतं. त्याकडे पाहण्याची नजर बदलणं गरजेचं आहे.
 
 

मित्र आहोत याचा अभिमानच वाटतो  -  अॅड.दिलशाद मुजावर 
 मी आज जे काय काम करते, विचार करते यात माझ्या मित्र-मैत्रिणींचा मोठा वाटा आहे. मला ते सतत वेगवेगळ्या पातळीवर प्रोत्साहन देत असतात, कधी काही चुकत असेल तरी ते हक्काने सांगतात. हे मित्र शाळा-कॉलेजपासूनचे आहेत. ही माझी मैत्री ही ३०-३५ वर्षांपासून आहे. मला अभिमान वाटतो की आमची मैत्री अजून टिकून आहे. एकदा मी घरी नव्हते. माझी मुलगी शाळेत होती आणि अचानक आजारी पडली. मी प्रशांत म्हणून माझ्या मित्राला कळवलं. त्याने पटकन शाळेत जाऊन माझ्या मुलीची काळजी घेतली. आजही काय काम करायचं असेल, मला काही सल्ला घ्यायचा असेल तर मी आधी माझ्या मित्रांना फोन करते. बाईचे मित्र हे आजही या नात्याकडे वाईट पद्धतीने पाहिलं जातं, पण आपल्याल माहीत आहे, आपलं नातं कसं आहे. त्यामुळे मैत्री करताना आपण जगाचा विचार करत बसायचं नाही, असं मला वाटतं.
 
 

मित्र ही हक्काची स्पेस -  चारुता शिंद
 एखाद्या स्त्रीने मित्र-मैत्रिणीचं नातं कंटीन्यू  ठेवायचं की नाही हे त्यांच्या सासरच्या लोकांवरून, नवऱ्याच्या स्वभावावरून ठरतं. पण मला हे योग्य वाटत नाही. माणूस म्हणून प्रत्येकाने मैत्रीचं निखळ नातं अनुभवलंच पाहिजे. मी सातारा वाईची. लग्न झाल्यावर कोल्हापूरला आले. त्या काळात सोशल मीडिया वगैरे नसल्यानं संपर्क कमी होत गेला. पण एक दिवस वीस वर्षांनंतर माझ्या कॉलेजमधल्या सुहास पाटील या मित्राने मला अचानक फोन केला. त्या दिवशी मी खूप आनंदात होते. त्यानंतर आमचा ग्रुप तयार झाला. पूर्वीची खंड पडलेली मैत्री ही फेसबुक, व्हॉट्सअॅपमुळे नव्याने सुरू झाली. हे मित्र आणि मैत्री खूप हक्काची वाटते. माझे मित्र-मैत्रिणी ही माझी हक्काची स्पेस मला वाटते. अशी स्पेस प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असली पाहिजे. वयाच्या पन्नास वर्षांनंतर आमची पुन्हा जुनी मैत्री आज आम्ही नव्याने अनुभवतोय.
 
 

स्वच्छ मैत्रं सर्वांनी  स्विकारावं -  क्षितिजा बिडवई 
माझं सर्व शिक्षण औरंगाबादमध्ये  झालं. शालेय जीवनापासूनचे आम्ही सर्व मित्र संपर्कात आहोत. तसेच काम करताना, लग्न झाल्यावर दुसऱ्या शहरात राहायला आलेय तरीही आम्ही संपर्क कमी केला नाहीये. माझे बरेचसे मित्र माझ्याच क्षेत्रातले असल्यानं मला कामानिमित्त मोठी मदत होते. माझी आई औरंगाबादमधे असते. मी नसले तरी माझे मित्र अजूनही तिला भेटण्यासाठी माझ्या माहेरच्या घरी जातात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त काही नाती आवश्यक असतातच, त्यात मैत्रीचं नात हे खूप महत्त्वाचं आहे. पण आपली मैत्री ही स्त्री, पुरुष अशी कोणाशीही असू शकते पण हे नातं टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. लग्नाच्या वेळेपासूनच मी माझ्या सासरी सगळ्यांना माझ्या मित्र, मैत्रिणींबद्दल सांगितलं होत. त्यामुळे सुरुवातीपासूनचं त्यांना कल्पना होती. त्यामु‌ळे मला मैत्री टिकवणं हे जास्त सोपं गेलं. आजही अनेक वेळा स्त्रीला हे सांगणच खूप अवघड जातं की माझे मित्र पण आहेत. आपल्याला मोकळ्या मनाने हे सांगता आलं पाहिजे. म्हणजे समोरच्या व्यक्ती पण हे स्वीकारायला शिकतील. 
 
 

ग्रामीण मानसिकता बदलायला हवी - पूनम भोसले
माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी माझ्या वर्गातल्या एकही मुलाशी कधीच बोलले नव्हते. बऱ्याच मुलांची नावं पण विसरून गेले होते. ग्रामीण भागात मुलीचे मित्र असं काही नसतं. पण दोन वर्षांपूर्वी माझ्या वर्गातल्या सर्वांनी मिळून एक गेट टुगेदर ठेवलं होतं. त्यानिमित्ताने मी कॉलेजमध्ये गेले आणि सर्वांशी पुन्हा भेटले आणि बऱ्याच वर्षांनंतर सर्वांना भेटले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. आता आम्ही सगळे संपर्कात आहोत. शाळा-कॉलेजमधल्या आठवणींबद्दल खूप बोलतो. इतक्या वर्षांनंतर आता मला कळतंय माझ्या वर्गातली ही सगळी मुलं कशी होती. ग्रामीण भागात अजूनही मुलीला मित्र-मैत्रिणी असणे म्हणजे ती मुलगी चांगली नाही किंवा वाया गेली अशा अर्थाने बघितलं जातं. पण आता हे सगळं बदललं आहे असं वाटतं असलं तरी फारसं बदललं नाही. मुलींच्या मैत्रीकडे खूप संशयाने पाहिलं जातं.त्यामुळे मुलांविषयी भलतेच गैरसमज निर्माण होत राहतात. मुलीच्या मित्र परिवारात मुलं,मुली असतील  किंवा तृतीयपंथी समुदायातील व्यक्ती असो, सगळ्यांसोबत मुलींची मैत्री असू शकते हे  विशेषकरून ग्रामीण भागातील लोकांनी स्वीकारलं पाहिजे.
 
 

बातम्या आणखी आहेत...