आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री गिरीश महाजनांची अण्णांशी चर्चेची दुसरी फेरीही ठरली निष्फळ; निर्णयावर ठाम -आण्णा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलाेकपाल व इतर मागण्यांकडे माेदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २ अाॅक्टाेबरपासून दिल्लीत उपाेषणाचा इशारा दिला अाहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे मन वळवण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दुसऱ्यांदा अण्णांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, त्यातून काहीही निष्फळ झाले नाही. अापण निर्णयावर ठाम असल्याचे अण्णा म्हणाले. 


१४ सप्टेंबर राेजी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धीत येऊन अण्णांशी चर्चा केली हाेती. मात्र, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे अण्णांनी त्यांना सांगितलेे हाेते. त्यानंतर बारा दिवसांनी बुधवारी सकाळी ११ वाजता महाजन पुन्हा राळेगणसिद्धीत अाले. सुमारे दीड तास त्यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा दुपारी तीनच्या दरम्यान चर्चा सुरू झाली. ती ३.३० ला संपली. दोन टप्प्यात झालेल्या या चर्चेतून मात्र मार्ग निघाला नाही. हजारे आंदोलनावर ठाम आहेत. 


गिरीश महाजन म्हणाले, अण्णांनी दिल्लीत उपोषण केले होते. त्यातील ९० टक्के मागण्या पूर्ण झाल्या आहेत. ठिबक, स्प्रिंकलर यावर जो १२ टक्के जीएसटी आहे, तो ५ टक्के करावा, तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या अण्णांच्या मागण्या रास्त अाहेत. 


शेतीमालाला सरकारने दीडपट भाव जाहीर केला आहे. लोकपाल व लोकायुक्तांसाठी विशेष वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारशी चर्चा करून दोन-तीन दिवसांत त्याबाबत अण्णांना पत्र दिले जाईल. येत्या दाेन- तीन दिवसांत यातून मार्ग निघेल व अण्णा आंदोलन करणार नाहीत, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला. 


राज्य सरकारकडे मागण्या मंजुरीचे अधिकारच नाहीत

महाराष्ट्रातील मंत्र्यांना अामच्या मागण्या मान्य करण्याचा अधिकार नाही. केंद्रीय पातळीवर या सर्व गोष्टी आहेत. महाजन यांनी सांगितले की, तुमचे म्हणणे केंद्रीय पातळीवर मांडले आहे. बऱ्याचशा मागण्या मंजूर आहेत. ज्या बाकी आहेत त्याबाबत दोन-तीन दिवसांमध्ये लेखी स्वरूपात उत्तर देऊ. त्यांचे काय उत्तर येते ते पाहू. तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम आहोत.

- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक. 

बातम्या आणखी आहेत...