आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्ये मंत्री गुलाबरावांचा प्रवाशांशी संवाद; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवाशांना नेहमी अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागते. या समस्या जाणून घेण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी पाळधी ते जळगाव बसने प्रवास करत बसधील प्रवाशांसह चालक, वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी जळगाव बसस्थानकाची अतिशय बारकाईने पाहणी केली. 


राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीसाठी जळगावात येतांना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासकीय वाहनाएेवजी पाळधी बस स्थानक ते जळगाव बस स्थानकापर्यंत एसटी बसने प्रवास केला. दुपारी १२.४५ वाजेच्या बसने ते पाळधी येथून जळगावात अाले. बसस्थानावर असलेल्या विद्यार्थी व प्रवाशांसोबत त्यांनी संवाद साधत बसमध्ये प्रवेश केला. जळगाव आगाराच्या अमळनेर-जळगाव बसने मंत्री जळगावात पाेहचले. त्यांच्यासोबत महानगराध्यक्ष शरद तायडे, मानसिंग सोनवणे, जनार्दन सपकाळे, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते. या वेळी राज्यमंत्री पाटील यांनी बसमधील प्रवासी, विद्यार्थी यांच्यासह चालक व वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी बसमधील प्रवाशांना दिले. 


बस अडवली 
बस जळगाव बसस्थानकावर आली असता राज्यमंत्री गुलाबराव पाटलांची धारशिरी येथील विद्यार्थ्यांनी अडवून समस्या मांडल्या. मंत्र्यांनी समस्या जाणून घेत त्यांचे लवकरात लवकर निरसन केले जाईल, असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. बसमधून प्रवास केल्यानंतर राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी बस स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहासह इतर सर्व विभागांची पाहणी केली. 


बस पोर्ट होणार 
राज्यातील १३ जिल्ह्यात बसपोर्टला मंजूरी मिळाली आहे. जळगावातील बस स्थानकाचा त्यात समावेश आहे. बसपोर्टसाठी पहिल्या टप्प्याची यादी मंजूर असून त्याचा निधी मिळालेला आहे. दुसऱ्या टप्प्यातील यादी देखील परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंजूर केली अाहे. त्यामुळे जळगावात एअरपोर्ट सारखा बस पोर्ट होण्याचा मार्ग माेकळा झाल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...