आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री गुलाबराव म्हणाले, 'माणूस मेल्यानंतरही जर जागे हाेत नसाल तर तुम्ही कसले डाॅक्टर?'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे अपूर्ण बांधकाम, रुग्णालयांमध्ये उपस्थित राहत नसलेले डॉक्टर्स, सिव्हिलमधील औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कट प्रॅक्टिस तसेच तोट्यात असलेले परिवहन महामंडळ, विभागातील खिळखिळ्या बसेस, फेऱ्यांमधील कपातीचे धोरण, प्रवासी निवाऱ्यांची थांबलेली कामे, या आरोग्य व परिवहनाच्या विविध विषयांवर असलेल्या तक्रारींबाबत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत अधिकाऱ्यांची बोलतीच बंद केली. 'माणूस मेल्यानंतरही जागे हाेत नसाल तर तुम्ही कसले डाॅक्टर? ' अशा शब्दात त्यांनी अाराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा पाणउतारा केला. 


अजिंठा शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी झालेल्या अाराेग्य व परिवहन विभागाच्या बैठकीच्या सुरुवातीला धरणगाव व जळगाव तालुक्यातील कामे अपूर्ण असलेल्या आरोग्य केंद्रांचा आढावा घेत छोट्या गावांसाठी आरोग्य प्रश्नी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही अधिकारी त्याचा पाठपुरावा करत नसल्याबाबत सहकार मंत्री पाटील यांनी संताप केला. उपलब्ध निधीनुसार एबीसीप्रमाणे कामांची गती ठेवण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांना केल्या. विभागाकडून पाठवलेला प्रस्ताव शासनाकडे पोहचत नाही, ही शोकांतिका असून त्याचा पाठपुरावाही केला जात नाही. आरोग्य विभाग खिन्न झाला असल्याचे सांगत पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी वागण्याची पद्धत शिकण्याची गरज असल्याचे सांगितले. म्हसावद, धरणगावसह आसोदा, अंजनविहीरे आदी गावांमधील उपकेंद्राचाही त्यांनी आढावा घेतला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पवन सोनवणे, रावसाहेब पाटील, जगन्नाथ पाटील, विश्वनाथ पाटील, श्याम तायडे, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते. 


डॉ. पवार, डॉ. वायकोळेंना नोटीस 
जिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे, व्हॅन्टिलेटर मशीन बंद आहे. डॉक्टरांचे रुग्णालयापेक्षा कट प्रॅक्टिसकडे अधिक लक्ष असते. त्यामुळे रुग्णालयाचे वाटोळे झाले आहे. डीपीडीसीतून निधी दिला. मात्र, तो संबंधित कामासाठी खर्च होत नाही, हे अधिकाऱ्यांचे अपयश आहे. रुग्ण न तपासता ते खासगी रुग्णालयात पाठवले जातात. रुग्णालयात दलाल कार्यरत आहेत. त्यांचा शोध घेण्याच्या सूचना देत प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यासाठी खाटांची संख्याही वाढवण्याचे आदेश दिले. दरम्यान, बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या डॉ. मिलिंद पवार, डॉ. वायकोळे यांना तत्काळ नोटीस देण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या. 


स्वाइनफ्लूच्या मृत्यूनंतरही टीम पोहचत नाही 
दोन दिवसापूर्वी पिलखेडा येथे स्वाइनफ्लूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवस होऊनही गावात कोणतीही फवारणी करण्यात अाली नाही. डॉक्टरची टीमही तेथे पोहचली नाही. तुम्ही मेल्यानंतरही जागे होत नसाल, तर तुम्ही कसले डॉक्टर? अशा शब्दात मंत्र्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले. सरपंचांनी बैठकीत फोन करुन गावात कोणतेही पथक पाेहचले नसल्याचा खुलासा दिला. आरोग्य केंद्रास टीएमओ भेट देत नसून आरोग्य अधिकारीही याची दखल घेत नसल्याबाबत मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी पिलखेड, म्हसावद, कानळदा येथील नागरिकांनी तक्रारी मांडल्या. आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, डॉ. संजय चव्हाण, हिवताप अधिकारी डॉ. अर्पणा पाटील यांनी विविध प्रश्नांबाबत माहिती दिली. 


डॉ. खैरे यांच्यावर अागपाखड...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यावर तोफ डागत तुम्ही आल्यापासून सिव्हिलचा बट्ट्याबोळ झाला आहे. तुमच्याबाबत अनेक तक्रारी असून केवळ एसीमध्ये बसून तुम्ही काम पाहतात. प्रसूतीगृहाची दैनावस्था झाली असून कधी तेथे जात नाहीत, तुमचे डोळे मरून गेले आहेत का? असा संतप्त प्रश्न करत शासनाचा नुसता पगारच घेतात का? असे विनाहृदयाचे अधिकारी काय कामाचे? असा त्रागा व्यक्त करत एकेरी शब्दात मंत्री पाटील यांनी डाॅ. खैरेंची चांगलीच कानउघाडणी केली. 

बातम्या आणखी आहेत...