आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeeToo: त्यावेळी ओपन कॅबिन होते, हे शक्यच कसे? संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार -एमजे अकबर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बारा महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर रविवारी सकाळी आफ्रिका दौऱ्याहून परतले. ते दाखल होताच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळाने अकबर यांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला. आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगून ऐन निवडणुकीच्या काही महिने आधीच हे वादळ का उठले? हा निवडणूक अजेंडा आहे का?, असे ते म्हणाले. दरम्यान, आरोप करणाऱ्या महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देत अकबर म्हणाले, पुराव्यांविना आरोप करण्याची सध्या प्रथाच पडली आहे. या खोट्या आरोपांमुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. असत्याला पाय नसतात. परंतु, त्यात एक विष असते, जे उन्मादात बदलू शकते. दरम्यान, ब्रिटनमधील पत्रकार डेव्हीड रूथ यांनीही अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. एका ब्लॉगवर त्यांनी १९९९चा संदर्भ देत अकबर यांनी मसाजच्या निमित्ताने आपल्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता, असे तिने म्हटले आहे. 

 

मोहीम आणि परिणाम | २००६ मध्ये प्रारंभ, २०१७ मध्ये वेग; ८५ देशांत ३ हजार महिलांचे आरोप : २००६ मध्ये सामाजिक कार्यकर्ता तराना बर्क यांनी "मी टू'चा वापर केला होता. २०१७ मध्ये अमेरिकी अभिनेत्री एलिसा मिलानो हिने ते लोकप्रिय केले. हॉलीवूड निर्माता हार्वी वेनस्टेन यांच्यावर ७० महिलांनी आरोप केले. भारतात तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप करत याची सुरुवात केली. ८५ देशांत ३ हजारांवर महिलांनी असे आरोप केले आहेत. 


जगभरात ५० दिग्गजांना फटका, शिक्षा फक्त एकाला : जगभरात ५०हून अधिक दिग्गजांवर मी-टू मोहिमेअंतर्गत आरोप करण्यात आले. मात्र, शिक्षा केवळ एकाला होऊ शकली आहे. पीडितांपैकी बहुतांश महिला कोर्टाची दारे ठोठावत नाहीत. त्यामुळे अमेरिकेतील टीव्ही कलाकार बिल कॉस्बी यालाच आतापर्यंत अशा प्रकरणात १० वर्षांची शिक्षा झाली आहे. 

 

१५ देशांत कायदा बदलण्याचे प्रयत्न 
मी-टू मोहिमेमुळे अमेरिकेसह १५ देशांत कायद्यातील तरतुदी बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतातही समिती नेमण्यात आली आहे. अमेरिकेत याच आधारे विधेयक मांडले गेले आहे. तर चीनने या मोहिमेतील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. 


सर्वाधिक गूगल सर्च स्वीडनमध्ये, मात्र गेल्या आठवड्यात भारत अव्वल : मी-टू मोहिमेबद्दल सर्वाधिक गूगल सर्च स्वीडनमध्ये झाले आहे. मात्र, गेल्या एका आठवड्यात सर्वाधिक गूगल सर्च भारतात झाले आहे. यात अलोकनाथ यांचे नाव सर्वाधिक वेळा सर्च झाले आहे. 


तर्क : मला पोहताच येत नाही, स्विमिंग पुलात पार्टी कशी? 
अकबर म्हणाले, आरोप सर्व काल्पनिक गोष्टींवर आहेत. अंजू भारतीने दावा केला आहे की लैंगिक शोषणाचा प्रकार घडला तेव्हा मी स्विमिंग पूलमध्ये पार्टी करत होतो. मला तर पोहताच येत नाही. मग मी स्विमिंग पूलमध्ये उतरेन कसा?  

 

स्पष्टीकरण: मी काहीच केले नाही असे प्रिया म्हणाली होती 
अकबर म्हणाले, प्रिया रमाणी यांनी अभियान सुरू केले तेव्हा त्यात माझे नाव नव्हते. जे घडलेच नाही त्यात आरोपांचे जाळे का विणले गेले? शुतापा पॉल म्हणते, या माणसाने मला कधीच हात लावला नाही. शुमा राहा पण म्हणते, वास्तविक त्यांनी काहीच केले नव्हते. 
प्रश्न : २१ वर्षे गजाला गप्प का राहिली? अकबर म्हणाले, गजाला वहाबने दावा केला की, २१ वर्षांपूर्वी ऑफिसमध्ये मी लैंगिक शोषण केले. आम्ही एशियन एजमध्ये सोबत होतो तेव्हा मला बसायला बंद केबिन नव्हते. क्युबिकल होते. मी काही केले असते तर इतरांना ते लगेच दिसले असते. हे वास्तव असतानाही आरोप केले जात आहेत. 

 

निर्माते सुभाष घई यांच्याविरुद्ध तक्रार 
मुंबई | एका अभिनेत्रीने निर्माता सुभाष घईंविरुद्ध ठाण्यात तक्रार दिली. ६ ऑगस्टला घरी बोलावून घई यांनी मसाज करण्यास सांगितले व नंतर गैरप्रकार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

 

आता विनोद दुआ यांच्यावरही आरोप... 
पत्रकार निष्ठा जैन यांनी फेसबुकवर पत्रकार विनोद दुआंवर आरोप केले आहेत. १९८९ मध्ये मुलाखतीवेळी दुआ यांनी पार्किंगमध्ये आपली छेड काढली होती, असे निष्ठा यांचे म्हणणे आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...