आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालय कँटीन भरती : वाढप्यांच्या १३ जागांसाठी ३६०० उमेदवार; पात्रता चौथी उत्तीर्ण, पदवीधरांनीही दिली परीक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एखाद्या कँटीनमध्ये वाढपी (वेटर) होण्यासाठी लेखी परीक्षा झालेले कधी ऐकिवात नाही. परंतु, महाराष्ट्राच्या मंत्रालयातील कँटीनमध्ये वाढपी पदाच्या १३ जागांसाठी तब्बल ३६०० इच्छुकांनी परीक्षा दिली. त्यातील १३ जणांची गुणवत्ता यादीनुसार निवड झाली आहे. विशेष म्हणजे, याच्या गुणवत्ता यादीचा कटऑफ ९० टक्क्यांवर असून मेरिटच्या उमेदवाराला ९६ टक्के गुण मिळाले आहेत. त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या पदासाठी शिक्षणाची केवळ चौथी इयत्ता उत्तीर्ण ही पात्रतेची अट असताना हजारो पदवीधरांनी अर्ज केले होते. 
मंत्रालय, विधिमंडळ, प्रशासकीय भवन आणि नवी मुंबईतील कोकण भवन या ठिकाणी ७ राज्य सरकारी कँटीन आहेत. सहा कँटीन मुंबईत, तर एक नवी मुंबईत आहे. या कँटीनमध्ये २७५ कर्मचारी काम करत असून रिक्त १३ जागांसाठी मागच्या वर्षी जाहिरात आली होती. या जागेसाठी सात ७ हजार अर्ज आले होते. त्यातील ३६०० उमेदवार लेखी परीक्षेसाठी हजर राहिले. बहुपर्यायी अशी १०० गुणांची परीक्षा होती. त्यातील पहिल्या १३ जणांची निवड झाली आहे. यशस्वी उमेदवारांना ९० ते ९६ असे गुण प्राप्त झालेले आहेत. महाआयटीने या पदासाठी दिलेल्या जाहिरातीत ४ थी इयत्ता उत्तीर्ण, अशी पात्रता ठेवली होती. प्रत्यक्षात बहुतांश उमेदवार चक्क पदवीधर होते. त्यामुळे या पदाचे मेरिट वर गेल्याचे सांगण्यात आले. 

 

यासाठी अट्टहास : सरकारी लाभ, ३० हजार पगार, सहायक मॅनेजरपर्यंत बढती

मंत्रालयातील कँटीनमध्ये नियुक्त झालेला वाढपी नंतर  पदोन्नती मिळवत थेट सहायक व्यवस्थापकपदापर्यंत पोहोचू शकतो. वाढप्याचे पद “ड’ वर्गातील असून ते सरळसेवेने भरले जाते. तसेच कँटीनमधील सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो. या पदाला सध्या दरमहा २५ ते ३० हजारांच्या दरम्यान पगार मिळतो. शिवाय, सर्व कँटीन मुंबईतच असल्यामुळे बदली झाली तरी मुंबईबाहेर जावे लागू शकत नाही. तसेच सरकारी अन्य कर्मचाऱ्यांना लागू असलेले सेवेचे सर्व लाभ मिळतात, त्यामुळे मोठ्या संख्येने वाढपी होण्यासाठी युवक इच्छुक असावेत, असे मंत्रालय उपाहारगृहाचे महाव्यवस्थापक दादासाहेब खताळ यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.  
 

 

ब्रिटिशकालीन कँटीन, विविध मंत्रालयीन विभागांना देते सेवा
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० मध्ये झाली. मात्र, मुंबई प्रांताचे कायदेमंडळ ब्रिटिशांनी १९३५ मध्ये अस्तित्वात आणले. ते गेटवे आॅफ इंडियाजवळील सध्याचे जेथे पोलिस महासंचालक कार्यालय आहे तेथे पूर्वी होते. तेव्हा “चौरस’ नावाच्या कँटीनची स्थापना झाली. ते चौरस कँटीन सध्या मंत्रालयात चालू आहे. मंत्रिमंडळ बैठकांपासून विविध खाती, पत्रकार कक्ष अशा मंत्रालयातील सर्व विभागांत याच कँटीनची सेवा पुरवण्यात येते. या ठिकाणी रोज सुमारे  पाच हजार लोक विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. विशेष म्हणजे, अन्य हॉटेलच्या तुलनेत येथे अत्यंत माफक दरात खाद्यपदार्थ मिळतात. सरकारकडून या कँटीनला अनुदानही दिले जाते. 

 

जातीनिहाय लागलेली गुणवत्ता यादी 

९६ गुण : व्हीजे ए 
९४ गुण : एसटी 
९२ गुण : खुला 
९२ गुण : एनटी डी
९४ गुण : एनटी सी
८८ गुण : महिला 
५० गुण : अपंग उमेदवार